शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी मागं एका दैनिकाचं नाव घेऊन म्हणाले होते की,… या दैनिकात जेव्हा शेतकऱ्याच्या बाजुनं काही चांगलं लिहून येईल,तेव्हाच शेतकरी संघटनेला खरा धोका असेल.गिरीश कुबेराच्या बाबतीत असंच म्हणता येईल की,ते जेव्हा कोणत्याही गोष्टीचा सकारात्मक विचार करतील,चळवळींच्या ,शेतकऱ्यांच्या बाजुनं लिहितील तेव्हाच चळवळींना खरा धोका असेल.ज्यांना मुळात शेतकरीच काय पण क फल्लक झालेल्या बडया कलावंतांबद्दलही घृणा आहे अशा संपादकाच्या लिखाणावर आपण कशासाठी एवढी चर्चा करतो आहोत.ते स्वतः कार्पोरेट जीवन जगतात,त्यामुळं गरिब,गरिबीशी त्याची ओळख असणं शक्य नाही.अशा स्थितीत त्यांना एकजात सारे शेतकरी धनदांडगे वाटणं अगदीच स्वाभाविक आहे.बळीराजा या शब्दातला केवली राजाच त्याना दिसत असावा.सातत्यानं बळी जाणारा बळी त्यांना दिसत नाही.तो त्यांच्या दृष्टीदोषाचा भाग आहे हे नक्की.ज्याचं नुकसान झालं ते सारे बडे बागायतदार शेतकरी आहेत असं कुबेराचं म्हणणं असावं,राज्यात पाण्याखाली येणारं क्षेत्र आणि झालेलं नुकसान पाहिलं तर त्याचं म्हणणं किती बोगस आहे याचा अंदाज आपणास येऊ शकेल.
शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सवलती हा विषय नेहमीच कुबेरांची चिंता वाटविणारा आहे.राज्याच्या तिजोरीची महाराष्ट्रात फक्त त्यांनाच एकट्याला काळजी आहे असा त्यांचा आव असतो.तो फसवा यासाठी आहे की,जेव्हा उद्योगपतीवर सवलतीची खैरात होते,जेव्हा भ्रष्ट लोकप्रतिनिधीही कोट्यवधींची माया सरकारी तिजोरीतून लुटतात तेव्हा कुबेर गप्प असतात.यावरचा त्यांचा युक्तीवााद असा असतो की,एका गटाला सवलती दिल्या म्हणून काय दुसऱ्या गटाला द्यायच्याच काय.हा युक्तीवादही बोगस आणि भांडवलदारांची तळी उचलून धरणारा आहे.त्यांची भांडवलदारधार्जिणी भूमिका वारंवार समोर आल्यानं,आणि आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत हे दाखविण्याची त्यांची जुनी खोड असल्यानं आपण त्यांच्या अग्रलेखानं व्याकुळ व्हायचं काही कारण आहे असं मला वाटत नाही.त्यांनी अग्रलेखातून शेतकऱ्यांबद्दल कितीही तिरस्कार व्यक्त केला तरी सरकार कुबेर याचे अग्रलेख वाचून चालत नाही.हे आपण विसरून चालणार नाही.