काळकर्ते शि.म.परांजपे 

0
2228

रायगड प्रेस क्लबनं काळकर्ते शि.म.परांजपे यांच्या चित्राचं एक कॅलिंडर काढलं .त्याचं प्रकाशन 15 डिसेंबर 2013 रोजी नागपूर इथं तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झालं.प्रकाशन तर झालं होतं पण  शि.म.परांजपे रायगडचे असल्यानं कॅलेंडरचा लाकार्पण सोहळा रायगडमध्ये करावा असा  निर्णय़ रायगड प्रेस क्लबन घेतला .त्यासाठी शि.म.प रांजपे यांच्या जन्मभूमीत  महाड इथं एका कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं.शहरातील एका कॉलेजमध्ये हा कार्यक्रम झाला.अकरावीपासून एम.ए.च्या वर्गात शिकणारे दोनशेवर विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.शि.म.परांजपे यांच्या कॅलेंडरचं प्रकाशन असल्याचं  तर त्यांना माहित होतं पण हे शि.म.परांजपे कोण ? कोणालाच माहिती नव्हतं. .शि.म.परांजपे कोण होते? आणि त्यांचा महाडशी संबंध काय होता? हे ज्याना माहिती आहे त्यांनी हात वरती करावा असं सांगितलं गेलं तेव्हा दोनशे विद्यार्थ्यापैकी एकाही विद्यार्थ्यांनं हात वर केला नाही. आम्हाला माहिती  नाही  असंच त्यांनी सूचित केलं.हे चित्र उपस्थित पत्रकारांना आणि इतरांना अस्वस्थ करणारं होतं.अर्थात चूक विद्यार्थ्यांची नाहीच.चूक सरकार आणि समाजाची आहे.ज्या व्यक्तींनी कधी काळी काळ घडविला,काळावर राज्य केलं अशा अनेक महापुरूषांचा सरकार आणि समाजाला  विसर पडलाय हे वास्तवय.इतिहासकालिन महापुरूषांच्या स्मृती जतन कराव्यात यासाठी सरकार आणि समाजही काहीच करीत नाही ही शोकांतिका आहे. विविध क्षेत्रात ज्यांनी आपल्या कर्तृत्वानं नवे मापदंड निर्माण केले अशा व्यक्तीची स्मारकं किमान त्यांच्या जन्मगावात तरी असावित अशी अपेक्षा असते.दुर्दैवानं ते ही होत नाही. आकाशाला गवसणी घालणारे अनेक महामानव कोकणानं देशाला दिले मात्र अपवाद वगळता त्यांच्या स्मृती जतन केल्या गेल्यात असं कोणत्याही गावात दिसत नाही. प रिणामतः नव्या पिढीला आपल्या गावातील महान व्यक्तीची देखील ओळखच उरली नाही. शि.म.परांजपे हे केवळ पत्रकारितेशी  संबंधितच असं  नाव नाही.ते झुंजार पत्रकार तर होतेच पण निबंधकार आणि प्रखऱ राष्ट्रीय बाण्याचे साहित्यिक ,अमोघ  शैलीत बोलणारे ख्यातकीर्त वक्तेही होते.राष्ट्रवादी विचारांचे बीजारोपण करण्यासाठी टिळक-आगरकरांच्या कालखंडात ज्यांनी मौलिक कार्य केलं,त्यातील शि.म.परांजपे हे अग्रगण्य प्रज्ञावंत होते.अलौकिक प्रतिभेचा विलास ज्यांच्या लेखनातून दिसून येतो .समाजाला जागृत करण्यासाठीच त्यांनी आपली लेखणी आयुष्यभर वापरली.प्रकांड पंडित आणि प्रखर राष्टभक्त असलेल्या शि.म.परांजपेंना त्यांच्या गावातच आज कोणी ओळखत नाही,हे चित्र नक्कीच चांगलं नाही.शि.म.प रांजपे यांचा जन्म ज्या वास्तूत झाला आणि ज्या ठिकाणी त्यांचं बालपण गेलं ते घर तरी खरं तर राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करायला हवं होतं.तसंही झालं नाही.त्यामुळं महाड हे शि.म.परांजपे यांचं गाव आहे हे काही पत्रकार सोडले तर कुणालाही माहिती नाही.सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाला धन्यवाद द्यायला हवेत की,मराठी पत्रकार परिषदेच्या आग्रहामुळं का होईना,कोकणात पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या पत्रकारास काळकर्ते शि.म.परांजपे यांच्या नावानं पुरस्कार दिला जातो.तेवढीच आठवण.

दक्षिण रायगडमध्ये सावित्रीच्या काठावर महाड हे टुमदार शहर वसलेलं आहे.निसर्गाचं वरदहस्थ लाभलेल्या महाडचा इतिहासही समृध्द आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधनी असलेला रायगड किल्ला,तसेच समर्थ रामदासांचं वास्तव्य जिथं होतं ती शिवथर घळ महाडच्या समर्थ इतिहासाचे साक्षीदार आहेत.नंतरच्या काळात महाड हे परिवर्तनवादी चळवळीचं केंद्र बनलं.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह  महाडमध्ये झाला.मनुस्मृतीचं दहनही महाडमध्ये केलं गेलं आणि नंतर  तेथून देशभर सामाजिक समतेचं आंदोलन अधिक वेगानं सुरू झालं . भारत छोडो चळवळीचं जिल्हयाचं नेतृत्वही  क्रांतिसिंह  नाना पुरोहित, आणि मोहन धारियाच्या रुपानं महाडकडं होतं.जंजिरा मुक्ती लढयाचं नेतृत्वही महाडनंच केलं होतं. महाडचा परिसर लढवय्या विरांचा आहे.पहिल्या महायुध्दापासून आज पर्यत असंख्य तरूणांनी लष्करात जाऊन देशांच्या सिमांचं रक्षण केलेलं आहे.फौजी आंबवडे हे गाव तर असं आहे की,या गावातील प्रत्येक घरातला एक तरी तरूण लष्करात आहेच आहे.शौर्याबरोबरच बुध्दीचंही वरदान महाड परिसराला लाभलेलं आहे. ज्यांनी इतिहास संशोधनाच्या माध्यमातून देशभर महाडचं नाव दिगंत केलं ते महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार हे महाडजवळच्या बिरवाडीचे.अशा शौर्य आणि बुध्दीचं वरदान लाभलेल्या  पवित्र भूमीत शि.म.परांजपे यांचा जन्म 27 जून 1864 रोजी झाला.शिवराम महादेव परांजपे हे त्यांचं पूर्ण नाव.महादेव परांजपे हे त्यांचे वडिल एक प्रतिथयश वकिल होते.आईंचं नाव पार्वतीबाई.शिवरामपंतांचं प्राथमिक शिक्षण महाडलाच झालं.माध्यमिक शिक्षणासाठी काही दिवस ते रत्नागिरीला होते.नंतर त्यांना पुण्याला पाठविलं गेलं.विष्णूशास्त्री चिपळूणकर,लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी राष्ट्रीयवृत्ती निर्माण करण्यासाठी स्थापन केलेल्या  न्यू इंग्लिश स्कूलमध्ये परांजपे यांचे पुण्यातलं शिक्षण झालं.महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन आणि डेक्कन कॉलेजात झालं.निःस्वार्थ देशसेवा करण्याचे सस्कार त्यांच्यावर याच ठिकाणी झाले.1884मध्ये शिवरामपंत मॅट्रिकची परिक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.संस्कृतची जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळविणारे ते पहिलेच विद्यार्थी ठरले.1890 मध्ये डेक्कन कॉलेजमधून ते बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले.1892 मध्ये ते एम.ए. झाले.या परीक्षेतील यशाबद्दल त्यांना   दोन संस्कृत विषयातील शिष्यवृत्या प्राप्त झाल्या.शिक्षण चालू असतानाच 1875 मध्ये म्हणजे वयाच्या जेमतेम अकराव्या वर्षी ते गोरेगाव येथील गणेशपंत गोखले यांची कन्या बयोताई हिच्याशी विवाहबध्द झाले.

 मुलतःाच वाचनाची आवड असलेल्या शिवरामपंतांनी विद्यार्थी दशेतच अनेक पाश्चात्या ग्रंथांचं परिशिलन केलं.पारतंत्र्यांतून मुक्त होण्यासाठी ज्या देशांनी स्वातंत्र्य लढे उभारले त्या देशांचा त्यंानी इतिहास अभ्यासला.त्यातून त्यांना नवीदृष्टी गवसली.अर्ज विनत्या करून स्वातंत्र्य मिळत नाही,त्यासाठी शीर तळहातावर घेऊनच संघर्ष करावा लागतो याचं मर्मही त्यांना इतिहासाच्या पुस्तकातूनच मिळालं.शिवरामपंतांचा राष्ट्रवादी पिंंड अशा अभ्यासातूनच तयार झाला.शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी नव्यानंत पुण्यात स्थापन झालेल्या  महाराष्ट्र कॉलेजात   दोन वर्षे संस्कृतचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली.( 1896-1897).नोकरीत असताना लोकमान्याच्या प्रत्येक चळवळीत ते समरसतेनं सहभागी होत.मात्र महाराष्ट्र कॉलेजच्या व्यवस्थापनाला परांजपे यांनी अशा प्रकारे टिळकांच्या चळवळीत सहभागी होणं अडचणीचं ठरू लागल्यानं त्याना प्राध्यापकाच्या नोकरीवर पाणी सोडावं लागलंं .नोकरी सोडल्यानंतर त्यानी प्रवचंनं,कीर्तनं,व्याख्यानाच्या माध्यमातून लोकजागृतीचं महान कार्य सुरू केलं.हेच काम पुढं सुरू टेवता यावं यासाठी 1998 मध्ये  काळ नावाचे साप्ताहिक सुरू केलंय. काळ सुरू झाला तो दिवस होता 25 मार्चचा.त्या दिवशी चैत्री पाडवा होता,आणि वार शुक्रवार होता.  पुण्यातील जुन्या मंडईजवळच्या कानडेंच्या वाड्यातून शि.म.परांजपे यांच्या काळ साप्ताहिकाचा पहिला अंक बाहेर पडला.तेथून बारा वर्षे काळने वृत्तपत्र आणि वाडंःमयाच्या जगतात एक अद्भभूत पराक्रम घडवून आणला. काळचे वैशिष्टय म्हणजे वक्रोक्ताविलास  आणि ते अंकाच्या शिर्षभागी ठळकपणे उद्‌घृत केलेल्या  सा रम्या नगरी महान्‌स नृपती…कालाय तस्मै नमः  या संपूर्ण श्लोकापासून लक्षात येईल.टाइम्सच्या नावावरून त्यांनी आपल्या वर्तमानपत्राला काळ हे समर्पक नाव दिलं असावं.त्यानी घेतलेलं नाव किती प्रभावी आणि परिणामकारक होतं हे नंतरच्या कालखंडात दिसून आलं. काळ कशासाठी आहे याचं विवेचन त्यांनी काळच्या पहिल्या अंकातच केलंय.ते म्हणतात,ङ्लोकात दृढमूल व रूढ झालेल्या कित्येक राजकीय कल्पनांच्या उच्छेदनासाठी काळचा जन्म झालाय ङ्धार्मिक,एतिेहासिक ,राजकीय,सामाजिक आणि वाडंमयीन व़िषयाची निःपक्षपातीपणे व निर्भयपणे चिकित्सा करण्याचं काम काळ करील असंही त्यांनी जाहीर केलं होतं.दिलेल्या शब्दाप्रमाणं काळच्या प्रत्येक अंगात सरकारवर विदारक टिका  असल्याचं पाहून ते अंक ज्या छापखान्यात छापत त्या जगद्‌हितेच्छू कारखान्याचे मालक घाबरले आणि त्यांनी वर्षभरातच काळ छापून देण्यास नकार दर्शवला.त्यानंतर परांजपे यांनी  एक जुना कारखाना विकत घेतला आणि मग तेथून काळाचा प्रवाह अविरत वाहू लागला.एक शिवरामपंत आणि एक कामगार एवढीच काळची कचेरी होती.अंकाच्या घड्याघालायला घरचे मदत करीत.शुक्रवारी काळ बाहेर यायचा त्या दिवशी पहाटेच शे-दिडशे लोकतरी काळ कार्यालयासमोर बसलेले असत.काळ काय म्हणतोय ही त्यांची उत्सुकता.प्रारंभी 600वर्गणीदार असलेल्या काळचा खप 16 हजार वर्गणीदारांपर्यत गेला.सहा ते आठ हजार अंकाची फुटकळ विक्री व्हायची.काळ हे वर्तमानपत्र  लोकमान्यांच्या जहाल विचारांचा पुरस्कार करणारं जरूर होतं,पण त्यात अनुकरण नव्हतं.शिवरामपंतांनी काळ घडविला आणि काळावरही प्रभूत्व गाजविलं काळ मधील निबंधात देशाच्या स्वातंत्र्याची आकांक्षा आणि प्रखर राष्ट्रीय बाणा याचा प्रभावी अविष्कार झालेला आहे.लोकांच्या आणि समाजाच्या व्यथा मांडताना त्यांनी वक्रोक्ती आणि व्याजोक्तीचा धार असणारी लेखणी एखादया अस्त्राप्रमाणं वापरली.त्यांच्या प्रतिपादनात भावनांना आवाहन असे.सद्‌भिरूचीसंपन्न आणि कला विलास प्रकट करणारे प्रभावी आणि प्रवाही लेखन वाचताना वाचक मंत्रमुग्ध होत.साधारणतः असं म्हटलं जातं की,साप्ताहिक किंवा दैनिकाची दुसऱ्या आठवड्यात किंवा दुसऱ्या दिवशी रद्दी होते.मजकुरही संदर्भहिन होतो.काळच्या बाबतीत असं नव्हत.काळमधील लेखांना वाडमयीन मुल्य होतं.अभिजित लेखन शैलीसाठी आजही काळमधील त्यांचे निबंध मराठी वाड्‌ःमयात मोलाचे ठरतात.( साहित्यसंग्रह मध्ये त्यांचे संशोधनपर आणि रसग्रहणपर साहित्यविषयक लेख उपलब्ध आहेत ) काळमधील अनेक निबंधातून परांजपेंच्या चिकित्सक संशाधकांचं जसं दर्शन घडतं तसंच त्यांच्यातील प्रतिभाशाली व्यक्तीमत्वाचीही निवंघ वाचताना अनुभूती येते, शिवाजींचे पुण्याहवचन,व शिवाजींची एक रात्र या लेखांमधून त्याचं उत्कट स्वातंत्र्यप्रेम प्रकट झालं आहे.गरिबांची उपासमार,संपत्तीचा दुरूपयोग,दुष्काळाला कारण कोण? पावसानं अतिशय घाण केली,एका खडी फोडणाऱ्याची गोष्ट,एका शेतकऱ्याचा उद्दार या साऱ्या लेखांमधून गरिबांची दुःख व्यक्त होतात.गरिबांसाठी त्यांचं तिळतिळ तुटणारं मनही लेखांतील प्रत्येक शब्दातून व्यक्त होताना दिसतं.भासांची भवितव्यता व कालिदासांनी लिहिलेलं शाकुंतल या लेखांमधून त्यांच्यातील समीक्षक आपणास भेटतो.काळमधून त्यांनी वक्रोक्तीचा एवढ्या खुबीनं वापर केला की.ते सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करतात हे देखील इंग्रजांच्या लवकर लक्षात आलं नाही.वक्रोक्तीचावापर  एवढ्या विपूल प्रमाणात मराठी साहित्यात शिवरामपंतांच्या पूर्वी कोणी केला नव्हता नंतरही तो तसा कोणी केला नाही.कधी ग्रीक इतिहासातील कथा,कधी सृष्टीचमत्काराचे रूपक,कधी कल्पित कथा,आकर्षक आणि औत्सुक्य निर्माण करणारे मथळे,पहिल्या वाक्यात इंग्रजांची कौतुकानं पाठ थोपटलेली आढळेल तर लेखाच्या शेवटच्या भागात तीच पाठ जमिनीवर लोळत असलेली आढळेल.अशी अदंभूत करामत त्यांनी सतत दहा वर्षे केली.तरीही ही  सारी चलाखी  जास्त काळ सरकारच्या नजरेतून सुटणं शक्य नव्हतं.1908मध्ये काळमधील काही मजकुरावर आक्षेप घेत सरकारनं त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवला.या खटल्यात त्यांना 19 महिन्याच्या कारावासाची शिक्षा झाली.तथापि चार महिने अगोदरच म्हणजे 5 ऑक्टोबर 1909मध्ये त्यांची सुटका झाली. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे सहकारी खरे आणि सोमण यांनी काळ जिवंत ठेवला ,खरा पण परांजपे सुटून आल्यानंतर काळचा अंत घडवून आणायचाच्या   विचारानं पछाडलेल्या सरकारनं परांजपे यांच्या कडं 1910 मध्ये  दहा हजार रूपयांचा जामिन मागितला.परांजपे यांनी  तो भरला असता तरी तो जप्त करून पुन्हा आणखी रक्कम मागायची हे सरकारनं ठरविलेलं असल्यानं  परांजपे जामिन भरण्याच्या भानगडीत पडले नाहीत.त्यामुळं काळ साप्ताहिक त्यांना बंद करावं लागलं.काळला जेमतेम बारा वर्षांचं आयुष्य लाभलं पण शि.म.परांजपे यांच्याशी काळचं नाव कायमचं जोडलं गेलं.काळकर्ते शि.म.परांजपे अशीच लोकमानसात त्याची ओळख रूढ झाली.जामिन न भरता आल्यानं काळ बंद पडले पण सरकारचं तेवढ्यानं समाधान झालं नाही.1900 ते 1908 या कालावधीतील काळमधील निवडक निबंधाचे दहा खंडही सरकारनं जप्त करून काळचं नामोनिषान मिटविण्याचा प्रयत्न केला.पुढं मुंबई प्रांतातील सरकारनं 1937 साली दहावा खंड निर्बंधमुक्त केला.सर्व खंड निर्बन्धमुक्त व्हायला 1946 साल उजाडलं.सर्वच खंडांवरील निर्बन्ध उठल्यानंतर या खंडांचं पुनर्मुद्रणही केलं गेलं.शि.म.परांजपे हाडाचे पत्रकार असल्यानं काळ बंद पडल्याचं मनस्वी दुःख त्यांना  झालं हे वेगळं सांगण्याची गरज नाही.1910 मध्ये काळ बंद पडल्यानंतर तब्बल दहा वर्षांनी टिळकांच्या निधनानंतर 12 ऑगस्ट 1920 रोजी स्वराज्य हे नवं साप्ताहिक त्यांनी  सुरू केलं.त्यातून महात्मा गांधी यांच्या असहकारितेचा त्यांनी जोरदार पुरस्कार केला.तथापि काळची लोकप्रियता स्वराज्यला लाभली नाही.शि.म.परांजपे आता उतारवयाकडं झुकले होते हे ही त्याचं कदाचित कारण असू शकेल.मात्र नंतर त्यांनी हे साप्ताहिक 1927 मध्ये शंकरराव देव यांच्या स्वाधिन केलं.स्वातंत्र्य पूर्व काळातील पत्रकार हे चळवळीतले कार्यकर्तेही असत.आंदोलनं,चळवळीत त्यांचा  सहभाग असे.शि.म.परांजपे यांचाही अनेक चळवळीत थेट सहभाग होता.टिळकांच्या चळवळीत तर ते होतेच होते त्याच बरोबर अनेक लोकहिताच्या चळवळीत बिनीचे शिलेदार बनून त्यांनी आपली भूमिका पार पाडलीय.1 मे 1922 रोजी मुळशीच्या सत्याग्रहात ते सहभागी झाले .त्यासाठी त्यांनी सहा महिन्याचा कारावासही भोगला.सायमन कमिशनला विरोध कऱण्यासाठीही सुरू असलेल्या चळवळीत ते सहभागी झाले होते महात्मा गांधींनी सुरू केलेल्या असहकारितेच्या आंदोलनातही  त्यांनी सर्कीय सहभागही नोंदविला

साहित्यविश्व समृध्द केलं

काळ बंद पडल्याचं दुःख त्यांना होतंच होतं पण ते केवळ दुःखाचे कढ काढत बसले नाहीत.त्यांची साहित्य सेवा सुरूच होती.1910 ते 1920 या दहावर्षांच्या कालखंडात कादंबरी,नाटकं,साहित्यविषयक लेख असं विविधांगी मुबलक लेखन केलं.नागानंद,अभिज्ञानशाकुंतल,मृच्छकटिक या संस्कृत नाटकांवर त्यांनी  लिहिलेले टिकात्मक लेख वाचनीय आहेत.मोरोपंतांची भगवदं गीता,श्रीनामदेवकृत ज्ञानेश्वरांची समाधी,प्रियदर्शिका,विष्णूसहस्त्रनाम यातून त्यांनी आपल्यातील चिकित्सकवृत्तीचा प्रत्यय आणून दिलेला आहे.गोविंदाची गोष्ट ( 1918)  आणि विंध्यांचल (1924) या त्यांच्या कादंबऱ्या आहेत.बाणाच्या कादंबरीवर आधारित संगीत कादंबरी त्यांनी लिहिली. शेक्सपिअऱच्या मॅकबेथवर  नाटकावर आधारित मानाजीराव (1898) ऍडिसनच्या केटोवर आधारलेले रामदेवराव (1906) आणि पहिला पांडव हे कर्णाच्या जीवनावरचे नाटकही त्यांनी लिहिले.देशभक्तीची प्ररेणा त्यांच्या नाटकातून मिळते.फितुरीेचे कोणते परिणाम राष्ट्राला भोगावे लागतात तेही त्यांनी आपल्या नाटकांमधून सांगण्याचा प्रयत्न केलाय.संगीत मीराबाई,महाराष्ट्र लक्ष्मी,राजसिंह आणि पद्मी ही आणखी काही त्यांनी लिहिलेली नाटकं.अण्णासाहेब किर्लोस्करांच्या सौभद्रचं त्यांनी संस्कृतमध्ये भाषांतर केलं.  परांजपेंची ही नाटकं प्रयोगानुकूल नाहीत अशी टीका त्यांच्या नाटकावर केली जाते.काही अंशी ते खरंही आहे.याचं कारण त्यांच्या नाटकाची भाषा बोजड आहे.सामांन्यांना ती समजायला कठिण जाते असं या संदर्भात सांगितलं जातं. .साहित्य क्षेत्रातील त्यांच्या अजोड कामगिरीमुळंच त्यांना 1929 मध्ये बेळगाव इथं भरलेल्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषविण्याची संधीही मिळाली होती.दुर्दैवानं बेळगावहून  परतल्यानंतर त्यांच्या  कानात दुखायला सुरूवात झाली.त्यांच्यावर उपचार केले गेले पण त्यांना मधुमेहाचा त्रास असल्यानं उपचारांचा उपयोग झाला नाही.24 सप्टेंबर रोजी त्यांना डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यानंतर तर त्यांची प्रकृत्ती अधिकच बिघडली.25 सप्टेंबरला ते मधुमेहजन्य बेशुध्दीत गेले.ऑक्शीजन आणि अन्य उपचार सुरू झाले पण कशाचाच उपयोग झाला नाही.अखेर शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 1929 रोजी सकाळी 7 वाजता त्यांनी  अखेरचा श्वास घेतला.मृत्यूसमयी ते पासष्ट वर्षाचे होते.

काळ दर शुक्रवारी प्रसिध्द होत असे.शि.म.परांजपे यांचे निधन शुक्रवारीच झाले.त्यांच्या अंत्ययात्रेत  अलोट जनसागर जमला होता.पन्नास  हजारावर लोक अत्यंयात्रेत सहभागी झाले होते.अशा प्रकारे जीवनाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करून परांजपे यांनी  काळावर आपला अमिट  ठसा उमटविला होता आणि आपले  सव्यसाचित्वही सिध्द केले होते.लेखणीचा गरिबांच्या हितासाठी तलवारीसारखा वापर करणारे सिध्दहस्त पत्रकार,कृतिशील प्रज्ञावंत,जाज्वल्य देशभक्ती रोमारोमात भिनलेले देशभक्त,व्यासंगी लेखक अशा विविध रूपानं आपण त्यांना ओळखतो.शि.म.पराजपे यांचं निधन झालं तेव्हा त्यांचे पट्टशिष्य  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर रत्नागिरी इ थं बंधनात अडकून पडलेले होते. निधनाची बातमी त्यांना समजल्यानंतर त्यांनी तार पाठविली, परांजपेे गेले,काळकर्ते अमर आहेत.सावरकरांच्या शोकसंदेशातील ही वाक्य नंतर खरी ठरली.काळकर्ते म्हणून शि.म.परांजपे  आजही जिवंत आहेत हे नक्की.

एस.एम.देशमुख 

संदर्भ- शिवराम महादेव परांजपे याचं चरित्र-शि.ल.ओगले.

– मराठी विश्वकोश- खंड,9

– मराठी विश्वचरित्र कोश- खंड 2

– महाराष्ट्राच्या कालमुद्रा

—————————————————————————————————–                                                            लेखांक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here