पत्रकारांचा लढा यशस्वी
पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा कऱण्याच्या आपल्या घोषणेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत पुनरूच्चार केला.ते म्हणाले,कायद्याचं प्रारूप तयार कऱण्यास सांगण्यात आलं असून एक महिन्यात मसुदा तयार झाल्यानंतर सर्वसंबंधितांशी चर्चा करून कायदा कऱण्यात येईल.कायद्यासाठी दोन्ही सभागृहातील विरोधी पक्ष नेते तयार असल्याने कायदा कऱण्याच्या दृष्टीने आता काही अडचण येईल असे आपणास वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ठ केले.मागच्या आठवडयात पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीशी बालताना मुख्यमंत्र्यांनी कायदा करण्याचे आश्वासन दिले होते.तसेच एक महिन्यात कायद्याचा मसुदा तयार करण्याचे आदेशही अधिकार्यांना दिले होते.त्यानंतर विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पत्रकारांवरील वाढत्या हल्लयाचा प्रश्न उपस्थित करून पत्रकार संरक्षण कायदा करण्याची मागणी केली होती.त्यावर गृहराज्य मंत्र्यांनी एक महिन्यात कायद्याचा मसुदा तयार करण्यात येईल असे आश्वासन दिले होते.आता मुख्यमंत्र्यांनीच सभागृहात ही माहिती दिल्याने आता पत्रकारांच्या प्रदीर्घ लढ्यास यश येणार आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायदा होणार हे स्पष्ट झाले आहे.कायद्याच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेणारे सरकार आणि विरोधी पक्षांचे आम्ही पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने आभार व्यक्त करीत आहोत-