निवडणूकपूर्व ओपिनियन पोल घेणाऱ्या काही संस्थांनी अनुकूल अंदाजासाठी पैसे घेतल्याचा दावा एका वृत्तवाहिनीने केला आहे. या वृत्तवाहिनीच्या दाव्याची निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली असून चौकशी करण्याची घोषणा केली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी ही माहिती दिली. देशातील ११ संस्थांनी घेतलेले निवडणूकपूर्व ओपिनियन पोल वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. न्यूज एक्स्प्रेस या वृत्तवाहिनीने एका स्टिंग ऑपरेशनद्वारे हा भांडाफोड केला आहे. यासंदर्भात आयुक्त संपत म्हणाले, ‘ओपिनियन पोल संदर्भात निवडणूक आयोगाने २००४ मध्ये सर्वपक्षीय बैठक बोलाविली होती. आयोगाने आपल्या शिफारशींबरोबर राजकीय पक्षांची मते देखील जाणून घेतली होती. या शिफारशी आणि मते सरकारला पाठविण्यात आली होती. आता त्यावर सरकारने कृती करण्याची गरज आहे.’
न्यूज एक्स्प्रेसच्या आरोपाबाबात विचारले असता, ‘या आरोपांकडे लक्ष दिले जाईल. त्यावर सध्याच्या कायद्यानुसार, कोणती कारवाई करता येऊ शकते, हे तपासले जाईल.’, असे उत्तर संपत यांनी दिले.
..