एस.एम.देशमुख याना विधान परिषदेवर पाठवा’ही
राज्यातील पत्रकारांची मागणी योग्यचः खा,श्रीनिवास पाटील
पाटणः राज्यातील पत्रकारांसाठी एस.एम.देशमुख यांचे योगदान मोठे असल्याने विधान परिषदेवर त्यांची निवड करावी ही आपली मागणी योग्य असल्याचे मत सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले आहे.पाटण तालुका पत्रकार संघानं आज श्रीनिवास पाटील यांची भेट घेऊन राज्यपाल कोटयातून एस.एम.देशमुख यांची विधान परिषदेवर नियुक्ती करावी अशी मागणी त्यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.त्यावेळी श्रीनिवास पाटील बोलत होते.खासदार श्रीनिवास पाटील पुढे म्हणाले,एस.एम.देशमुख, किरण नाईक यांच्या अथक प्रयत्नांमुळेच राज्यात पत्रकार संरक्षण कायदा झाला.पत्रकारांना कायदेशीर संरक्षण देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले.एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शांततेच्या मार्गानं झालेल्या आंदोलनाचे हे यश आहे.त्यामुळे पत्रकारांसाठी मोठे योगदान देणार्या एस.एम.देशमुख यांची विधान परिषदेवर निवड व्हावी ही राज्यातील पत्रकारांची मागणी योग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.विधीमंडळात पत्रकारांना प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे या मताचे आपण असल्याचे श्रीनिवास पाटील यांनी स्पष्ट केले.राज्याच्या विधीमंडळात काही पत्रकार जरूर गेले मात्र सर्वसामांन्य पत्रकारांच्या हक्कासाठी तेथे कोणीही आवाज उठविला नाही.आज पत्रकारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने एस.एम.देशमुख तळमळीने त्यांच्या प्रश्नांसाठी लढत आहेत हे मला चांगले ठाऊक आहे.पत्रकारांना पेन्शन मिळवून देतानाचा त्यांचा संघर्ष आपण पाहिला आहे.शिवाय त्यांचे सामाजिक कार्यातील योगदान ही उल्लेखनिय असल्याने एस.एम. यांना विधान परिषदेत पाठविण्याची आपली मागणी योग्य असल्याचेही खासदार श्रीनिवास पाटील यांनी स्पष्ट केले.श्रीनिवास पाटील यांना भेटावयास गेलेल्या शिष्टमंडळात पत्रकार संघाचे अध्यक्ष विलासराव माने,उपाध्यक्ष योगेश हिरवे,पी.के.कांबळे,नितीन खैरमोडे,सुरेश संकपाळ,संजय कांबळे,विद्या म्हासुर्णेकर,शेंकर मोहिते आदिंचा समावेश होता.