1 मे रोजी एस.एम.देशमुख यांचे आत्मक्लेष आंदोलन
अर्ज – विनंत्या केल्या, आंदोलनं झाली , हजारो इमेल पाठवून प़श्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.. मात्र पत्रकारांच्याप्रती सरकार उदासिन असल्याचे वारंवार दिसून आलं.. पत्रकारांकडे सरकार अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याने आणि पत्रकारांना वेळेत आणि योग्य उपचार मिळत नसल्याने पत्रकारांचे कोरोनानं मृत्यू होत आहेत.. हा आकडा 113 झाला आहे.. क्षणाक्षणाला तो वाढतोय.. जवळचे मित्र एकापाठोपाठ सोडून जात असल्याने माध्यम जगतात मोठी काळजी भिती व्यक्त केली जात आहे..सरकार मात्र बेफिकीर आहे..
सर्व वयोगटातील पत्रकारांना लस द्यावी, कोरोना बळी ठरलेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळावी, पत्रकारांसाठी रूग्णालयात ऑक्सीजन, व्हेटिलेटरचा बेड राखीव ठेवावा आणि योग्य उपचार मिळावेत अशा मराठी पत्रकार परिषदेने मागण्या केलेल्या आहेत..त्यासाठी आंदोलनही केले.. मात्र मागण्या पूर्ण होत तर नाहीतच पण सरकारने अगोदरची सवलत रद्द करून मुंबईत लोकलनं प़वास करण्यासही पत्रकारांना आडकाठी आणली आहे.. हे सारं हेतूतः होतंय का? अशी शंका घ्यावी एवढी उदासिनता दिसते आहे.. . एकीकडे पत्रकारांबददलची ही सरकारी उदासिनता आणि दुसरीकडे माध्यम समुहांनी पत्रकारांना कामावरून कमी करण्याचा किंवा बेकायदा वेतन कपातीचा सपाटा लावलेला आहे..थोडक्यात सारं वातावरण भिती वाटावं असं आहे.. .. दुर्दैवानं कोरोनानं सगळ्यांना घरातच जेरबंद केल्याने रस्त्यावर येता येत नाही.. काही करता ही येत नाही.. ही अगतिकता अस्वस्थ करणारी आहे…तणाव वाढविणारी आहे..
सरकारच्या पत्रकारांप़तीच्या निष्काळजीपणाचा निषेध करण्यासाठी मी 1 मे रोजी म्हणजे महाराष्ट्र दिनी आत्मक्लेष आंदोलन करीत आहे.. 1 मे रोजी मी दिवसभर माझ्या गावीच घरात बसून आणि लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून हे आंदोलन करणार आहे.. आंदोलनाचा एक भाग म्हणून दिवसभर अन्नत्याग करणार आहे.. सकाळी 6 वाजता माझे हे आंदोलन सुरू होईल ते सायंकाळी 6 पर्यत चालेल..मला माहिती नाही माझ्या या आत्मक्लेष आंदोलनाने सरकारवर काही फरक पडेल की नाही पण पत्रकारांच्या संतप्त भावना किमान जनतेपर्यंत नक्की पोहोचतील..
मराठी पत्रकार परिषद आणि राज्यातील तमाम पत्रकारांनी आंदोलनासाठी मला पाठिंबा द्यावा ही विनंती आहे..
एस.एम.देशमुख