एसेमबद्दल थोडंसं….

0
1697

SM. माझा मित्र, पती…सर्वस्व…

लढावू पत्रकार,उत्तम संघटक, विचारवंत, राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ता.. शेतीची आवड आणि उत्तम जाण असणारा ‘कृषीमित्र’, गरजूंच्या मदतीला धावून जाणारा संवेदनशील माणूस अशी SM ची  विविध रूपं आहेत .. या सर्वापेक्षाही महत्वाचं म्हणजे हाती घेतलेलं काम निर्धारपूर्वक तडीस नेणारा पत्रकारांचा आक्रमक नेता म्हणून  एसेम महाराष्ट्रात लोकप्रिय आहे.एस.एम.नं एखादं लोकहिताचं  काम हाती घेतलंय आणि ते अर्धवट सोडलंय असं कधी झालं नाही.मार्गात कितीही अडथळे आले आणि व्यक्तीगत नुकसान झालं तरी  कधी माघार घेतली नाही.यश खेचून आणलं.एसेमची ती खासियत आहे असंच म्हणावं लागेल.

मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी कोकणातील पत्रकारांना बरोबर घेऊन तो  सलग पाच वर्षे लढला.. शेवटी यशस्वी झाला..रस्त्याचं काम सुरु झालं .या महामार्गामुळं कोकणच्या विकासाला नवा आयाम मिळणार आहे. पत्रकारांवर हल्ले व्हायचे,त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न व्हायचा.हे चित्र एसेमला अस्वस्थ करायचं.हितसंबंधी हल्ले करायचे,अन मोकाट सुटायचे.प्रचलित कायदे त्यांना शिक्षा करण्यात असमर्थ ठरायचे.त्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी एसेमनं सर्वप्रथम केली. राज्यातील पत्रकारांना बरोबर घेऊन तो रस्त्यावर उतरला. सलग बारा वर्षे तो संघर्ष करीत राहिला.अखेर सरकारला एसेमची मागणी मान्य करावी लागली.. हा लढा लढताना त्यानं  अनेकांना अंगावर घेतलं.. चांगल्या पगाराच्या दोन नोकरया गमवाव्या लागल्या.. त्यानं पर्वा केली नाही.. नोकरया गमवूनही तो पत्रकारांसाठी लढत राहिला.. ज्येष्ठ, निवृत्त पत्रकारांची अवस्था पाहून अस्वस्थ होणारया SM नं ‘पत्रकारांना पेन्शन मिळालीच पाहिजे’चा नारा दिला,त्याचा  तब्बल वीस वर्षे पाठपुरावा केला. सरकारला ही मागणी देखील मान्य करावीच लागली. मराठवाडा दुष्काळानं होरपळतो आहे.. अशा परिस्थितीत फेसबूकवर पोस्टी टाकून कोरडे उमाळे व्यक्त करण्यापेक्षा प्रत्यक्ष मैदानात उतरून दुष्काळाशी दोन हात करण्याचा निर्धार त्यानं केला..आपल्या देवडी या  गावातील नद्यांवर बंधारा बांधून मातृभूमी  कायमची  दुष्काळमुक्त करण्याचं काम त्यानं आपले बंधू दिलीप देशमुख यांच्या मदतीनं सुरू केलं. त्यासाठी सकाळ रिलिफ फंडानं आर्थिक मदत केली.. देवडी गावाला ‘सुजलाम सुफलाम’ करण्याची क्षमता असलेला आडी बंधारा पूर्ण होत आहे. त्यासाठी एसेम ४५ डिग्री सेल्सिअस उन्हाची तमा न बाळगता दोन महिने गावात तळ ठोकून आहे..मागण्यांसाठी रस्त्यावर उतरणं,बंधारे बांधणं हे काय पत्रकारांचं काम आहे काय? असा प्रश्‍न  वातानुकूलीन संपादकांना पडू शकतो .त्यावर एसेमचं उत्तर असतं ‘सामाजिक बांधिलकी हा पत्रकारितेचा आत्मा आहे आणि त्यासाठी जे जे करावं लागेल ते पत्रकारांनी केलं पाहिजे’ .तो याच जाणिवेतून पत्रकारिता करीत आला आहे.त्यामुळंच गावात पाणी नाही हे पाहून त्यानं बंधार्‍याचं काम हाती घेतलं.ते गावात पाय रोवून पूर्णही केलं.मराठवाडयीतल शेकडो गावांपैकी एक गाव एसेममुळं दुष्काळमुक्त होत आहे यासारखी आनंदाची दुसरी बातमी आमच्यासाठी नाही.एस. एम.च्या हातालाच यश आहे असं म्हणावे लागेल. त्यानं  विविध दैनिकात नोकरया केल्या.. जिथं,जिथं तो संपादक म्हणून गेला त्या दैनिकाला त्यानं नवी ओळख करून दिली.. दैनिकात विविध प्रयोग राबवून ती दैनिकं लोकाभिमुख केली, त्यांचा खप आणि दबदबाही वाढविला.. थोडक्यात जे काम हाती घेतले ते जिद्द, चिकाटी,कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर यशस्वी करून दाखविलं.. अपयश  त्याला माहिती  नाही.. म्हणूनच त्याचे मित्र त्याला SM म्हणजे Successful Man म्हणूनच ओळखतात.

बीड सारख्या कायम दुष्काळी जिल्ह्यातून आलेल्या एस. एम. नं जाणीवपूर्वक पत्रकारितेचा खडतर मार्ग  निवडला. या खडतर मार्गावरून प्रवास करताना अनेक संकंटं आली,..त्यात स्वाभाविकपणे संसाराची देखील होरपळ झाली..अनेकदा असं वाटायचं की या ठिकाणी अन्य कोणी असतं तर मोडून पडलं असतं पण त्यानं प्रत्येक संकटावर मात करीत महाराष्ट्राच्या पत्रकारितेत स्वतःचं वेगळं स्थान आणि एसेम या नावाचा दबदबा निर्माण केला. एसेमनं विविध मान्यवर दैनिकात सलग 23 वर्षे संपादक म्हणून उल्लेखनिय कार्य केले.सात मौलिक ग्रंथांचं लेखन केलं.अनेक टीव्ही चचेॅत सहभाग घेऊन वैचारिक क्षैत्रातही नावलोकीक मिळविला.विविध विषयांवर राज्याच्या वेगवेगळ्या भागात अनेक व्याख्यानं दिली.प्रतिष्ठीत व्याख्यानमालेतून प्रचलित विषया वरची आपली परखड मतं मांडली.पत्रकारितेतील अशा उल्लेखनिय कार्याबद्दल त्याला मान्यताप्राप्त संस्थांचे  वीस पुरस्कार मिळाले.शेती विषयक लिखाणाबद्दल राज्य सरकारकडून दिला जाणारा  कृषी मित्र पुरस्काराचाही तो मानकरी ठरला.असंघटीत पत्रकारांना संघटीत करून एसेमनं महाराष्ट्रात पत्रकारांची चळवळ उभी केली.. पत्रकारांची शिखर संस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचं दोन वेळा अध्यक्षपद स्वीकारून संघटनेला नवा आयाम मिळवून दिला..पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या माध्यमातून राज्यातील पत्रकारांच्या सोळा संघटनांना एका झेंड्याखाली आणण्याची किमया त्यांनं साधली. राज्यात पत्रकारांची भक्कम एकजूट करण्यात एसेमचा सिंहाचा वाटा आहे.. विविध शासकीय कमिटयांवर काम करून पत्रकारांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी त्यानं निष्ठेनं पार पाडली..म्हणूनच महाराष्ट्रातील पत्रकारांना एसेम आपल्या हक्काचा माणूस वाटतो.. आधार वाटतो..

एसेमनं राज्यात असंख्य पत्रकार घडविले, त्यांना ऊभं केलं, बळ दिलं.. प्रेम दिलं आणि आधारही दिला.. पत्रकार आणि पत्रकारिता हा त्याचा विकपॉइंट.. ‘पत्रकार जगासाठी जगत असला तरी व्यक्तीगत आयुष्यात तो एकटाच असतो.. पत्रकारांवर वेळ येते तेव्हा ना सरकार त्याच्याबरोबर असते, ना मॅनेजमेंट, ना समाज.. अशा प्रसंगी पत्रकारांनीच पत्रकाराच्या पाठिशी उभं राहिले पाहिजे.’. असं त्याचं सांगणं असतं.. तसे प्रयत्न तो स्वतः देखील करतो .. राज्यातील अनेक पत्रकारांना त्यानं मदतीचा हात दिला .. नवजीवन दिलं .. त्यामुळंच कोणी नसलं तरी एसेम है नं चा विश्वास पत्रकारांमध्ये  निर्माण झाला .. म्हणून अडचणीत आलेल्या पत्रकाराला सर्वप्रथम आठवण येते ती एसेमची.पत्रकारांची हाक आली की,एसेमनं धावून जायचं हे नेहमीचंच असतं.पत्रकारांचा विषय असेल तर त्यानं कधी कंटाळा केला नाही,टाळाटाळ केली नाही.फोन टाळला नाही.घरचं काम असल्यासारखंच तो वागला.वागतो.पूर्णेच्या पत्रकारावर रात्री हल्ला झाला.त्याचा रात्री अडीच वाजता फोन आला,तो ही न कंटाळता त्यानं घेतला.त्याला न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा केला.पत्रकारांसाठी मोर्चे,आंदोलनं,घेराव,आमरण उपोषणं हे सारं त्यानं केलं. एसेम ही सारी नस्ती उठाठेव का करतो? असा प्रश्न अनेकांना पडतो. आरंभी मलाही तो पडायचा.. पण इतरांना मदत करणं हा त्याचा स्वभाव आहे.. तो आता आम्ही अ‍ॅक्सेप्ट केला आहे.. त्यात त्याला आनंद मिळतो.. त्याच्या आनंदात आम्ही आनंदी असतो.. लोकांसाठी धडपड करताना घरासाठी फार काही करता आलं नाही याची त्याला खंत.. तो अनेकदा माझ्याकडं व्यक्तही करतो.. मी, सागर, सुधांशू आणि  रूपलला मात्र असं वाटत नाही.. एसेमनं आम्हाला भरभरून दिलं याची जाणीव आम्हाला आहे.. पत्रकार आणि तो ही चळवळीतला पत्रकार म्हटल्यावर आम्ही फार अपेक्षा ठेवलेल्या नव्हत्याच.. जे मिळालं त्यात आम्ही सुखी, समाधानी आहोत..त्यामुळं अडचणीत असताना ना आम्ही कधी दुःखाचे उमाळे दिले,ना सुखात असताना कधी माज दाखविला.कायम जमिनीवर पाय ठेऊनच आम्ही दोघेही आणि आज मुलंही वागली किंवा वागताहेत .त्यामुळं आज आमच्यासारखं सुखी कोणी नाही..

संघर्ष हा एसेमचा स्थायीभाव आहे.. त्याचं सारं आयुष्याच संघर्षात गेलं.एसेमनं जी संकटं झेलली ती अनेकदा इतरांवरील अन्यायासाठीच.ज्या नोकर्‍या सोडल्या त्या इतरांवर होणारा अन्याय सहन न झाल्यानंच.परंतू या संघर्षाचे प्रखर चटके स्वाभाविकपणे आम्हालाही बसले.चार-दोन वर्षाला नोकरी बरोबर गाव बदलण्याची वेळ यायची.त्यामुळं होणारी ससेहोलपट नक्कीच त्रासदायक होती. आयुष्यात काही प्रसंग तर असे आले की, घरातील भांडी आणि इतर वस्तू विकून आम्हाला दिवस काढावे लागले..कठीण प्रसंगातही एसेमनं कधी तत्त्वांशी तडजोड केली नाही, लाचारी केली नाही,कोणाच्या चरणी आपला स्वाभिमानही गहाण टाकला नाही. किंवा कोणाच्या दयेवरही तो जगला नाही. पत्रकारिता हे सतीचं वाण समजूनच तो पत्रकारिता जगला.. पत्रकारितेचा गैरवापर त्यानं कधी केला नाही किंवा पत्रकार असल्याचा माजही त्यानं कधी दाखविला नाही.. लोकसेवेचे  माघ्यम म्हणूनच त्यानं प्रामाणिकपणे पत्रकारिता केली.आपल्या लेखणीच्या माध्यमातून अनेकांचे अश्रू पुसण्याचं काम केलं.कित्येकांना न्याय मिळवून दिला.कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यानं हे सारे केलं . अधिस्वीकृती समितीवर सतत वीस वर्षे राहिलेल्या आणि ३५ वषेॅ पत्रकारिता केलेल्या एस. एम. कडं आज साधी अधिस्वीकृती पत्रिका देखील नाही… यातच सारं आलं..पण एसेमच्या या बाणेदारपणाचा ,प्रामाणिकपणाचा आम्हा कुटुंबियांना सार्थ अभिमान आहे..वारंवार नोकरी गेली तरी एसेमच्या कतृत्वावर विश्‍वास होता.त्यामुळं आमची बॅग भरलेली असायची.यासर्व घटनांकडं जेव्हा मी मागं वळून बघते  तेव्हा गंमत वाटते.मुलांनं मागितलेलं फाईव्ह स्टार चॉकलेट आम्ही त्याला घेऊन देऊ शकलो नाही याचं खंत तेव्हा वाटायची पण ‘आज काय दिवस होते ते’ ?..असं म्हणून आम्ही ते प्रसंगही एन्जॉय करतो.एसेमनं आत्मचरित्र लिहावं असं वाटतं,असं झालं तर अनेकांचे बुरखे फाडले जातील.पण ‘मी जे भोगलं आहे ते बहुतेक पत्रकारांच्या वाट्याला येत असतं त्यात नवं असं सांगण्यासारखं काय आहे’? असं म्हणून तो हा विषय टाळत असतो.

एसेमची आणि माझी भेट सोलापूर तरूण भारत मध्ये झाली..अगोदर कॉलेज प्रतिनिधी आणि नंतर उपसंपादक म्हणून आम्ही एकत्र काम केलं. तरूण भारतमध्ये तो अठरा-अठरा तास काम करायचा.सुटीच्या दिवशीही बातमीच्या शोधात भटकायचा. पत्रकार म्हणून त्याची सतत चाललेली धडपड,प्रश्‍नांबद्दलची संवेदनशीलता,लोकांबद्दलची आदराची भावना,इतरांना मदत करण्यासाठीची तळमळ.. मनाला भावली आणि आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला. पुढं एसेमचा वाढदिवसाच्या दिवशीच म्हणजे १३ मे रोजीच आम्ही विवाहबध्द झालो.. त्यामुळं एसेमचा वाढदिवस आणि आमच्या लग्नाचा वाढदिवसही इकाच दिवशी म्हणजे आजच आहे.. एसेम पहिल्यांदा मला भेटला तेव्हा तो जसा होता तसाच तो आजही आहे.. शरीरानं , मनानं आणि स्वभावानंही..एसेम थोडा रागीट आहे.. शिघ़कोपी आहे.. बोलताना समोर कोणीही असलं तरी त्याची भिडमूवॅत न ठेवणारा आहे.कोणाच्या पुढं पुढं करण्याची सवय त्याला नसल्यानं अनेकांना  तो गर्विष्ठही वाटतो..अनेकांना त्याच्यात ‘देशमुखी ताठा’ दिसतो..थोडा भांडखोर स्वभाव आहे..त्यामुळं  कारण नसताना लोकांना अंगावर घेत राहतो. म्हणूनच तो  बाहेरून आल्यावर ‘आज किती नवीन शत्रू निमा॓ण करून आलास रे बाबा’ हा त्याला आमचा  हमखास प्रश्न असतो. खरे सांगू ? पण  एसेम तसा  नाही. मनानं तो निर्मळ आणि प्रेमळ आहे..त्यानं आयुष्यात कधी दुष्टपणा केला नाही.कोणाच्या पोटावरही कधी पाय दिला नाही. शक्य होईल तेव्हा आणि तशी त्यानं लोकांना मदतच केली. .मित्र जमा करणं हा त्याचा छंद आहे.. मित्रांच्या, पत्रकारांच्या हाकेला अधयाॅरात्री धावून जाणे ही त्याची आदत आहे… त्यामुळं अख्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रबाहेरही त्याचा मित्र परिवार आणि चाहता वर्ग विखुरलेला आहे. .एसेम हे नाम माहिती नाही असा एकही पत्रकार महाराष्ट्रात नसेल.राज्याच्या वेगवेगळ्या भागातून येणारे पत्रकारांचे फोन,त्यांची गार्‍हाणी,त्यांचे प्रश्‍न शांतपणे ऐकून घेणं आणि ते सोडविण्यासाठी आपल्या परीनं प्रयत्न करणं यात त्याचा दिवस जातो..राज्यातील पत्रकारांचा जो विश्‍वास एसेमवर आहे,पत्रकारांचं जे प्रेम एसेमला मिळालं हे भाग्य क्लचितच कोण्या पत्रकाराच्या वाट्याला आलं असेल. त्याचा आनंद आम्हाला नक्कीच आहे.किंबहुना पत्रकारांचं एसेमवर असलेलं प्रेम हेच आमचं धन आहे,हेच आमचं भांडवल आहे आणि हीच आमची आयुष्याची पुंजी आहे.लौकिकार्थानं आम्हाला फार काही ‘जमवता’ आलं नाही पण आम्ही जे मिळवलं आहे ते कोणत्याच पत्रकाराला  मिळविता आलेलं नाही.म्हणूनच आमच्यासारखं आणि आमच्याएवढं श्रीमंत आज कोणीच नाही.फक्त एकच चिंता असते,एसेमचं पत्रकारांच्या प्रश्‍नांसाठी सततच फिरणं,स्वतः गाडी चालवत 300-300 किलो मिटर जाणं,जाग्रणं,अवेळी जेवणं,गोळ्या घेण्याकडं होणारं दुर्लक्ष आणि प्रकृत्तीची सुरू असलेली हेळसांड या सर्वांची आम्हाला काळजी  वाटते.बंधार्‍याच्या कामासाठी गेली दोन महिने त्यानं प्रकृत्तीकडं पूर्णतः दुर्लक्ष केलं.उन्हामुळं तो काळा ठिक्कर पडलाय.अर्धा झालाय. अर्थात त्याला बोलून किंवा  सांगून काही उपयोग नसतो ,त्याच्यावर आमच्या बोलण्याचा काही  परिणाम होत नाही . त्याला आवरणं  ‘हमारे बस की बात नही’ ..त्यामुळं ‘देवाक काळजी‘ असं  म्हणतच आम्ही त्याची धावपळ आणि धडपड ‘सहन’ करीत असतो..

जगासाठी अहोरात्र धडपडणार्‍या एसेमला घरच्या कामाचा मात्र तेवढाच कंटाळा.बाजारात जाणं, भाजी घेऊन येणं, कपडे खरेदी करणं, मार्केटिंग करणं हे त्याला कधी जमत नाही..त्याचे कपडेही मलाच खरेदी करावे लागतात.अलिबागला असताना पोरांना कधी तरी तो बिचवर घेऊन जायचा पण तेवढंच..पोरांच्या प्रगतीपुस्तकावर स्वाक्षरी करायचं कामही मीच करायचे. हे आमच्या खटकयांचं कारण नक्की असतं.. काम नसेल तर घर आवरायला मात्र त्याला आवडतं.. सारं कसं शिस्तीत आणि जागच्या जागी असलं पाहिजे यासाठी तो आग्रही असतो.. मला मात्र ते जमत नाही..आमचं घर जर टापटीप असेल तर त्याचं श्रेय मात्र एसेमचं. बाकी खाण्याबद्दल त्याच्या कोणत्याच आवडी-निवडी नाहीत.समोर येईल ते गूपचूप पोटात ढकलायचं हा त्याचा स्वभाव आहे.अलिबागला कधी तरी आम्ही त्याच्या मित्रांच्या हॉटेलवर जेवायला जायचो.पुण्यात एकदाही ते शक्य झालेलं नाही.कार्यकर्त्याला संसारात तुम्ही फार गुरफटून ठेऊ शकत नाही.त्यात हा पठ्ठया कार्यकर्ता आणि पत्रकारही.त्यामुळं गेली तीस वर्षे आम्ही हे सारं गृहीत धरलेले आहे.त्यातूनच संसारासाठी आम्ही काही तडजोडी केल्या.मी देखील तरूण भारत,लोकमत, नवभारत,सामना,चित्रलेखा  आदि दैनिकांसाठी पत्रकार म्हणून काम केलं आहे.पण पोरांची आबाळ व्हायला नको म्हणून मी नोकर्‍या सोडल्या.हा सतत बाहेर असायचा.अशा स्थितीत कोणी तरी घर सांभाळणं आवश्यक होतं.ते काम मी स्वीकारलं. आज केवळ आकाशवाणी करतेय.मी माझ्या करिअरवर पाणी सोडलं असं मात्र मला वाटत नाही.कारण एसेमचं आणि माझं करिअर मी वेगळं मानतच नाही.त्याच्या करिअरमध्येच माझं करिअर सामावलेलं आहे अशी माझी भावना आहे.म्हणूनच घरससार आकाशवाणी आणि मुक्ता दिवाळी अंकाचं काम सांभाळून त्याच्या चळवळीना जेवढी मदत करता येईल तेवढी मदत मी करीत असते. 

एसेमचा आज वाढदिवस.. तो साजरा करायलाही तो तयार नसतो..केक कापणे वगेरे त्याला मंजूर नाही .. ‘मी एक सामांन्य पत्रकार, कार्यकर्ता  आहे.. असले कौतुकाचे चोचले पुढारयांना शोभतात मला नाही . असं तो बोलतो.. त्यामुळं वाढदिवसाच्या दिवशी आम्ही दूर कोठे तरी निघून जातो.. यावर्षी देखील आम्ही बाहेर आहोत .  पुढचया वर्षी मात्र आम्ही एसेमची एकषष्ठी दणक्यात साजरी करणार आहोत.. त्याला मान्य असो नसो..

एसेमला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आमची कुलस्वामिनी आंबाबाईकडं एकच मागणं आहे.. एसेमला निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि त्याच्या हातून  पत्रकारितेची आणि समाजाची सेवा निरंतर घडत राहो..

शोभना देशमुख.. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here