छोटया व मध्यम वृत्तपत्रांचे आंदोलन यशस्वी
मुख्यमंत्र्यांना राज्यभरातून पाठविले 3 हजारांवर एसएमएस

 मुंबई दिनांक 15ः सरकारच्या नव्या जाहिरात धोरणास विरोध कऱण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेच्या आवाहनानुसार करण्यात आलेल्या एसएमएस आंदोलनास आज राज्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.राज्यभरातून तीन हजारच्या वरती एसएमएस मुख्यमंत्र्यांना पाठवून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या गेल्या.तसेच नव्या धोरमास विरोध करणारी जाहिरात राज्यातील 200च्यावरती छोटया आणि मध्यम वृत्तपत्रांनी प्रसिध्द करून आपल्या एकीचे दर्शन घडविले.आंदोलनास सहभागी झाल्याबद्दल एस.एम.देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
सरकार नवे शासकीय संदेश प्रसार धोरण 2018 लागू करणार आहे.त्याचा मसुदा सरकारनं तयार केला असून तो प्रसिध्द केला गेला आहे.त्यावरच्या हरकती पाठविण्याचा आज शेवटचा दिवस होता.राज्यभरातून हजारच्यावरती हरकती पाठविण्यात आल्या असून आज मुख्यमंत्र्यांना दोन हजार एसएमएस पाठविण्याचे आवाहन  केले गेले होते.त्यानुसार आज राज्याच्या प्रत्येक जिल्हयातून शंभरच्यावरती एसएमएस मुख्यमंत्र्यांना पाठविले गेले.तीन हजारच्यावरती एसएमएस राज्यातून पाठविण्यात आले आहेत.तसेच राज्यातील 200च्या वरती वृत्तपत्रांनी सरकारी धोरणास विरोध करणार्‍या जाहिराती छापून हे आंदोलन यशस्वी केले आहे.या आंदोलनानंतर तरी सरकार जागे होईल आणि छोटया वृत्तपत्रांसाठी डेथ वॉरंट ठरणारे जाहिरात धोरण मागे घेईल असा विश्‍वास एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केला आहे.राज्यातील विविध संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या छोटी आणि मध्यम वृत्तपत्रं बचाव समितीने देखील सर्वांचे आभार मानले आहेत.
छोटया व मध्यम वृत्तपत्रांच्या आंदोलनास विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडे यांनी देखील पाठिंबा दर्शविला असून धनंजय मुंडे यांनी सरकारला पत्र पाठवून नवे जाहिरात धोरण मागे घेण्याची विनंती सरकारला केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here