एका मृत्यूलेखानं करिअरची दिशाच बदलून गेली..
शनिवारचा दिवस होता तो..अग्रलेख नसल्यानं थोडा निवांतच होतो.नेहमीपेक्षा उशिराच म्हणजे साडेअकराच्या सुमारास ऑफीसमध्ये आलो.वृत्तसंपादक असल्यानं जाता-येता किंवा बाहेरून आल्यावर लेगचे पीटीआय काय बातमी देतेय हे डोकावून पहायची सवय होती.त्या दिवशीही आल्या- आल्या पीटीआयवर नज़र टाकली .बातमी धडधडत होती.अण्णा गेल्याची.्अण्णा म्हणजे अनंत भालेराव.सारा मराठवाडा अनंत भालेरावांना अण्णा या नावानचं ओळखत होता.अण्णा म्हणजे मराठवाड्यातील तरूण पत्रकारांसाठी केवळ आदर्शच नव्हते तर दीपस्तंभ होते .पत्रकारितेत येताना ‘आपल्याला अण्णा सारखा पत्रकार व्हायचंय’ ही स्वप्न घेऊनच अनेक तरूण पत्रकारितेत येत.मी देखील याचं पंथाचा.भक्त हा शब्द आज फार वाईट अर्थानं वापरला जात असला तरी माझ्या सारखे अनेक तरूण पत्रकार तेव्हा अण्णांचे भक्त होते.ज्यांना प्रत्यक्षात अण्णांचा सहवास लाभला नाही असे असंख्य पत्रकार दुरूनच स्वतःला अण्णांचे शिष्य म्हणवून घेत.अण्णा चळवळीतले पत्रकार होते.मराठवाडा मुक्ती संग्रामात त्यांचा महत्वाचा वाटा होता.अण्णांची लोकप्रियता प्रचंड होती.एखादया पत्रकाराला एवढी लोकमान्यता मिळाल्याचं उदाहरण मराठी पत्रसृष्टीत तरी अपवादात्मकच दिसते.अण्णांबद्दलचं प्रेम,जिव्हाळा,आपलेपणा माझ्या पिढीतल्या प्रत्येक पत्रकारांच्या मनात खचाखच भरलेला होता.त्यामुळं अण्णा गेल्याची बातमी वाचत असताना दुःखावेग आवरत नव्हता.पत्रकारांचं आयुष्य असं असतं की,वाईटातली वाईट बातमी त्याला पचवावी लागते। सारे विसरुन कामाला लागावे लागते.मी ही तेच केलं.तेव्हा मोबाईल नव्हते.शिपाई पाठवून भराभर काही उपसंपादकांना बोलावलं.अण्णांवर पुरवणी काढायचं ठरविलं होतं.त्यासाठी सारी जमवाजमव सुरू होती.तेवढ्यात औरंगाबादहून लोकपत्रचे मालक कमलकिशोर कदम यांचा फोन आला.अण्णांवरचा अग्रलेख कोण लिहिणार ? असा त्यांचा प्रश्न होता.माझं उत्तर होत “तुम्ही सांगा”.कारण आमचे संपादक संतोष महाजन लोकपत्र सोडून गेले होते.मी वृत्तसंपादक होतो पण अग्रलेख लिहिण्यापासून संपादकांची सारी कामं मी सांभाळायचो.त्या अर्थानं मी ज्युनिअर होतो.अण्णांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वावर मी अग्रलेख लिहू शकेल यावर कमलबाबूंचा विश्वास नव्हता.कमलकिशोर कदम राजकारणी असले तरी ते चोखंदळ वाचक आहेत .वर्तमानपत्रातील बारिक-सारिक चुकाही त्यांच्या नजरेतून सुटत नसत.वृत्तपत्रांच्या मांडणीपासून मथळ्यांपर्यंत त्याचं लक्ष असायचं.येणार्या बहुतेक वर्तमानपत्रांचे अग्रलेखही ते न विसरता वाचायचे.त्यामुळं अण्णांवर मी अग्रलेख लिहू शकणार नाही असं त्यांनामनोमन वाटत होतं.ते म्हणाले , ‘तुम्ही दत्ता भगत यांच्याकडं जा आणि त्यांना अनंतरावांवर अग्रलेख लिहियला सांगा’ .मी भाग्यनगरीतील भगतसरांच्या घरी गेलो.तेही बातमीनं अस्वस्थ होते आणि अत्ययात्रेसाठी औरंगाबादला जायच्या तयारीत होते.ते म्हणाले,’मला शक्य नाही मी औरंगाबादला निघालोय’.ही माहिती ऑफिसात येऊन कमलबाबूंना कळविली.नंतर त्यांनी ज्येष्ठ साहित्यिक भुंजग वाडीकरांचं नाव सूचविलं। मी त्यांच्याकडंही गेलो.ते म्हणाले,’अण्णांच्या निधनाचा मोठा धक्का मला बसलेला असल्यानं मी अग्रलेखच काय एक ओळही या दुःखात लिहू शकणार नाही’.पुन्हा ऑफिसात आलो,कमलबाबूंना फोन करून ही हकिकत सांगितली.कमलबाबुंचा नाईलाज झाला.मला म्हणाले,’लिहा आता तुम्हाला जस जमेल येईल तस ‘
मी ही देखील अस्वस्थ झालेलो होतोच.त्यात पुन्हा मालकांनी असा अविश्वास दाखविल्यानं होता नव्हता तो आत्मविश्वास गमावून बसलो . अग्रलेख तर लिहावाच लागणार होता.माझी सुटका नव्हती.त्यामुळं पुरवणीची जबाबदारी अन्य सहकार्यांवर सोपवून मी स्वताःला 1च्या सुमारास केबिनमध्ये कोंडून घेतले.तब्बल दोन तास प्रयत्न केल्यावर अग्रलेख लिहून झाला.मात्र तो मलाच आवडला नाही.सारी कागदं फाडून टाकली.पुन्हा लिहायला बसलो.आणखी दोन तास लिहित राहिलो.मग मात्र भट्टी चांगलीच जमली. साडेचार तासानं बाहेर आलो.सर्व सहकार्यांना अग्रलेख वाचायला दिला.सर्वांनीच सांगितलं.’छानच जमलाय’.अग्रलेखाचं शिर्षक महत्वाचं होतं.एस.एम.जोशी गेले तेव्हा अण्णांनी त्यांच्यावर मराठवाडामध्ये जो अग्रलेख लिहिला होता त्याला ‘हे मृत्यो तुलाच अपवाद का नसावा’? असा मथळा दिला होता.अण्णांच्या मृत्यूलेखाला यापेक्षा दुसरा चांगला मथळा असूच शकत नाव्हता.त्यामुळं मी पहिल्या पानावर अण्णांच्या दोन कॉलम फोटोसह तो अग्रलेख माझ्या नावासह छापला.’हे मृत्यो तुलाच अपवाद का नसावा’? हा मथळा अनेकांच्या त्यावेळच्या भावनांच व्यक्त करणारा होता.त्यामुळं तो बहुतेक वाचकांना भावला.सकाळपासूनच घरचा फोन सारखा खणखणत होता.’अग्रलेख वाचताना आम्हाला आमचे अश्रू आवरता आले नाहीत’ असं प्रत्येक वाचक आणि मित्र सांगत होता.लोकपत्रचा अंक सकाळी दहाच्या सुमारास औरंगाबादला जात असे.अकरा वाजले तरी मालकांचा फोन येत नव्हता.थोडा बैचेन होतो.बहुतेक मालकांची सवय अशी असते की,दुसर्यानं चांगलं म्हटलं म्हणजे ते चांगलं म्हणतात.कमलबाबुंना खरं तर अग्रलेख भन्नाट जमला असल्याचे फोन मला जेवढे आले नसतील तेवढे कमलबाबूंना गेले होते.त्यांना हे सारं अनपेक्षित होतं.’जमेल तसं लिहा’ म्हणून सांगणारे कमलबाबू दुसर्या दिवशी माझ्यावर एवढे खूष झाले की,त्यांनी मनोमन मला सपांदक करण्याचा निर्णय घेतला होता.मला फोन करून अर्थातच त्यांनी माझं अभिनंदन केलं.मला म्हणाले, ‘ज्या ज्या दैनिकांनी आज अण्णांवर अग्रलेख लिहिलेत त्यात सर्वात सरस अग्रलेख आपला झाला आहे.अगदी अण्णांच्या मराठवाडा तील अग्रलेखापेक्षाही आपला अग्रलेख छान जमलाय’.मालकांचं हे प्रमाणपत्र मला अण्णा गेल्याचं सारं दुःख नक्कीच विसरायला लावणारं होतं.प्रसंग दुःखाचा असला तरी माझं ज्या पध्दतीनं कौतूक होत होतं ते पाहून मी हवेत होतो.नंतर अग्रलेख आवडल्याची वाचकांनी किमान शंभर पत्रं मला आली.ती फाईल आज 26 लर्षानंतही माझ्याजवळ आहे.शिवाय हा सारा प्रसंग माझ्या ह्रदयाच्या कोपर्यात कायम घर करून बसलेला आहे.ज्या मृत्यूलेखानं माझं सारं करिअर बदलून टाकलं तो अग्रलेख मी नंतर माझ्या लोकपत्रमधील अग्रलेखांच्या पुस्तकातही घेतला.हार आणि प्रहार असं या अग्रलेखांच्या संग्रहाचं नाव.
दोन-चार दिवसांनी कमलकिशोर कदम आणि बाबुराव कदम लोकपत्रमध्ये आले.मला बोलावलं आणि ‘तुम्ही संपादकपदाची सूत्रे कधी पासून घेता’? असा पृश्न मला विचारला .आमचा नव्या संपादकाचा शोध आता संपला,तुम्ही संपादक होण्यास सक्षम आहात हे अण्णांवरील अग्रलेखानं आणि सतोष महाजन गेल्यानंतर ज्या पध्दतीनं अंकाचा खप वाढविलात त्यावरून दिसून आलंय.अर्थात हे सारं मला अनपेक्षित होतं.मी एवढया अनपेक्षितपणे संपादक होईल असा विचार अगदी स्वप्नातही मी केला नव्हता.त्यामुळं असं जबाबदारीचं पद स्वीकारण्याची माझी मानसिक तयारी झालेली नव्हतीच. मी तेव्हा जेमतेम तीस वर्षांचा होतो.पत्रकारितेत येऊन मला अजून सातही वर्षे झालेली नव्हती .अनुभव कमी होता.त्यामुळं ‘साहेब,मला थोडा वेळ द्या,कारण एकदा मी संपादक झालो आणि तुमचं माझं जमलं नाही, तुम्ही मला काढून टाकलं किंवा मी राजीनामा दिला तर बाहेर मला कोणी संपादकांची नोकरी देणार नाही.पुन्हा मागे फिरणं मला जमणार नाही.त्यामुळं माझी अवस्था दोर कापल्यासाऱखी होईल.’ त्यावर कमलबाबू म्हणाले,’असा विचार का करता ? तुम्ही येथेच निवृत्त होणार आहेत’.तरीही मी एक महिन्याची मुदत मागून घेतली.मित्रांशी,घरच्यांशी चर्चा केली.सार्यांचं मत पडलं ‘संधी आलीच आहे तर सोडू नकोस’ .पुढचं पुढं बघू.नंतर मी हो म्हटलं आणि 1991च्या जानेवारी महिन्यात कार्यकारी संपादक म्हणून अंकावर माझं नाव यायला सुरूवात झाली.त्यानंतर तीन वर्षे नांदेड लोकपत्रला होतो.पण नंतर 23 वर्षे संपादक म्हणून काम करीत राहिलो.अण्णा गेल्याचं दुःख मराठवाड्यातील प्रत्येक नागरिकाला आणि पत्रकाराला जेवढं झालं होतं तेवढंच मलाही झालं होतं.पण अण्णांवरील एका अग्रलेखानं मी संपादक झालो होतो हे मी विसरलो नाही.एका मृत्यूलेखानं माझ्या करिअरची दिशा बदलून गेली होती.
या सार्या घटनेतला क्लायमॅक्स पुढंच आहे.मी जेव्हा संपादकपदाची ऑफर स्वीकारली तेव्हा मला पगारवाढ किती दिली गेली माहितंय ? केवळ 500 रूपये.कमलाबाबू म्हणाले,’पगाराची चर्चा बाबूरावांशी करा’.बाबूरावांनी सांगितलं ‘देशमुख तुमचा पगार आता 3500 नव्हे 4000 असेल’.एवढया कमी पगारात काम करणारा संपादक तेव्हाच्या काळात कदाचित मीच असेल.करोडोंची उलाढाल करणारे मालक संपादकांना पगार देतान किती व्यवहारी होतात याचा पहिला झटका मला बाबुरावांनी दिला होता.नंतरच्या आयुष्यात वारंवार असे अनुभव येत गेले
एस.एम.देशमुख