आजचा दिवस खरोखरच वाईट होता.आज मी दोन मित्र गमविले.सकाळी बातमी आली ती औरंगाबादचे छायाचित्रकार नरेंद्र लोढे यांच्या निधनाची.औरंगाबाद लोकमत सुरू झाल्यानंतर पहिल्या टीममध्ये जी मंडळी होती,त्यात माझ्या बरोबर नरेंद्र होता.मी शहर प्रतिनिधी आणि तो फोटोग्राफर आम्ही अनेक प्रसंग एकत्रित कव्हर केले.लोकमत सोडून मी पुण्याला आलो त्यानंतर त्याची माझा फारसा संपर्क राहिला नसला तरी लोकमतमध्ये त्याचे फोटो पहायचो.आज अचानक त्याच्या निधनाच्या बातमी आली त्याचा धक्का बसला.जुने दिवस आठवले.वाईट वाटले.नरेंद्रला विनम्र श्रध्दांजली.
नरेंद्रच्या निधनाच्या बातमीच्या धक्क्यातून सावरतो न सावरतो तोच रायगडमधील माणगाव येथील प्रकाश काटदरे यांच्या निधनाची बातमी अंगावर येऊन धडकली.ती धक्का देणारीच होती.साधारणतः तीन महिन्यापुर्वी त्यांना फोन केला होता.तेव्हा आईची तब्यत चांगली नाही असे ते म्हणाले होते.नंतर बोलणं झालं नाही.ते आजारी आहेत याबद्दलही कोणी बोललं नाही.त्यामुळे आज जेव्हा निधनाची बातमी अंगावर येऊन धडकली तेव्हा फार वाईट वाटलं
मी 1994 मध्ये अलिबागला गेल्यानंतर ज्या पत्रकारांशी माझा जिव्हाळा निर्माण झाला होता त्यात प्रकाश काटदरे होते.कोणाला आवडो न आवडो ते आपली मतं स्पष्टपणे मांडत.रोखठोक स्वभावाप्रमाणेच त्यांच्या बातम्याही रोखठोख असत.माझ्या स्वभावाशी जुळणारा त्यांचा स्वभाव असल्याने आमचं नातं केवळ संपादक आणि वार्ताहर एवढंच राहिलं नाही तर ते मैत्रीचं नातं बनलं.मुळात काटदरे घाटावरून आलेले असले तरी त्याचं कोकणावर प्रचंड प्रेम होतं.माणगावचे अनेक प्रश्न त्यांनी हिरीरिने मांडले,त्यांचा पाठपुरावा केला ते करताना काही पुढाऱ्यांचा रोषही त्यांनी ओढवून घेतला.मात्र त्याची पर्वा त्यांनी कधी केली नाही.सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या प्रकाश काटदरे यांनी आमच्या सर्व आंदोलनात बिनीचा शिलेदार म्हणूनच भूमिका बजावली.महामार्ग रूदीकरणासाठी पाच वर्षे आंदोलनं केली.त्या प्रत्येक आंदोलनात ते अग्रभागी होते.पनवेल ते वर्षा या पत्रकार रॅलीतही त्यांचा सहभाग होता.माझ्या खाद्याला खांदा लावून ते आंदोलनात सहभागी होत.आंदोलनंच नाही तर पत्रकार दिनाचा कार्यक्रम असेल किंवा अन्य कार्यक्रम असतील काटदरे अनुपस्थित राहिल्याचे मला आठवत नाही.चळवळ हा प्रकाश काटदरे यांच्या रक्तातच होती.
प्रकाश काटदरे कधी कोणासमोर लाचार झालेत,त्यांनी कोणत्याही कारणांनी कधी कोणासमोर हात पसरलेत,कोणाकडे आपल्या व्यक्तिगत जीवनातील दुःखाचे कड काढलेत असं कधी झालं नाही.एकदा स्थानिक पोलिसांनी त्यांना खोट्या गुन्हयात अडकविण्याचा प्रय़त्न केला .त्यांचा रात्री मला फोन आला.खरं काय ते त्यांनी सांगितलं.ते म्हणाले,देशमुख साहेब मी कोणासमोर लाचार होणार नाही.तुम्ही माझे संपादक आहात म्हणून तुम्हाला सांगितले,आता काय करायचे ते तुमचे तुम्ही ठरवा.मला अटक होणार असली तरी त्यासाठी माझी तयारी आहे.नंतर मी एसपींशी बोलून तो विषय मार्गी लावला.मात्र अडचणीच्या वेळेसही त्यांनी स्वाभिमानाला तिलांजली देत लाचारी पत्करली नाही.
माहिती जमविण्याचा,त्यांचा संग्रह कऱण्याचा त्यांना छंद होता.मुंबई-गोवा महामार्गावर कोणत्या महिन्यात,कोणत्या वर्षात किती अपघात झाले,किती ठार झाले याची आकडेवारी त्यांच्याकडे असायची.त्यांना फोन केला की,ते काही मिनिटात माहिती देत.त्यांच्या बातम्याही वस्तुनिष्ठ,माहितीपूर्ण असतं.अठरा वर्षात एकदाही त्यांच्या बातमीचा खुलासा करायची वेळ माझ्यावर आली नाही.
ते केवळ चांगले पत्रकारच होते असं नाही तर माणूस म्हणूनही ते चांगले होते.त्याचा प्रत्यय अनेकदा मला आला.माझ्यावर आलेल्या कोणत्याही प्रसंगात रायगडमधील जी मंडळी तातडीने माझ्या भोवती जमा व्हायची त्यात प्रकाश काटदरे यांचा प्रामुख्यानं उल्लेख करावाच लागेल.देशमुखांशी असलेली मैत्री तुम्हाला सोडायची नसेल तर तुम्हाला वार्ताहरशीप सोडावी लागेल असा पेच जेव्हा त्यांच्यासमोर टाकला गेला तेव्हा हवं तर मला वार्ताहरपदावरून काढून टाका पण देशमुखसाहेबांबरोबर असलेले संबंध मी तोडणार नाही असं ठणकावून सांगणारा हा मित्र होता.त्यांच्याशी एक कौटुंबिक जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालेलं होतं.ते असं अचानक तुटल्यानं आज दिवसभर अस्वस्थ होतो.त्यांच्या निधनानं माझी व्यक्तिगत मोठी हानी झाली आहे.हक्कानं काटदरेंना हाक द्यायची आणि काटदरेंनी ओ म्हणत तयार राहायचं हा शिरस्ताच ठरला होता.ते सारं आता संपलं आहे.त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी आणि माझी पत्नी शोभना तसेच सारे कुटुंबिय सहभागी आहोत.प्रकाश काटदरे यांना विनम्र श्रध्दांजली.