एका पत्रकाराचं ” जाणं..”.

0
1151

[divider]
अलिबागमध्ये असतानाचा माझा एक जुना सहकारी बापू आफळे याचं निधन झाल्याची बातमी मन अस्वस्थ करून गेली.खरं तर बापूचं वय काही जाण्यासारखं नव्हतंच.आत्ताच तो साठीत होता.त्यामुळच त्याचं अवचित जाणं जिवाला चटका लावून गेलं.
बापूनं ऐक्य,ग्रमोध्दार,कृषीवलमध्ये पत्रकारिता केली.हाडाचा पत्रकार असलेल्या बापूला वार्ताहराकडून आलेली बातमी मोजक्या शब्दात कशी लिहायची यात हातखंडा होता.उत्तम अक्षर,आणि बातमीत एकही खाडाखोड नसलेली बापूची कॉपी असायची.चार-पाच महिने आम्ही अलिबागला आरसीएफ कॉळनीत राहायचो. या काळात बापूनं आणलेला डबा आम्ही अनेकदा शेअर केलेला आहे.बापू चांगला पत्रकार तर होताच पण त्याच बरोबर तो एक चांगला माणूसही होता.त्याच्या लिखाणातूनही माणुसकीचा हा गहिवर बघायला मिळायचा. अगदी तीन-चार महिन्यापूर्वी बापूची रत्नागिरीत भेट झाली होती.दाढी वगैरे वाढलेली. दाभाडं बसलेली आणि भेदरलेली नजर बापूंसमोर अनेक समस्या आहेत हे दाखवून द्यायची.नोकरीच्या शोधात असलेल्या बापूची मी तेथे उपस्थित असलेल्या एका मालक-संपादकांकडं शिफारसही केली होती.संपादकांनी लगेच ये असंही सांगितलं होतं पण नंतर कळलं की,कोकणात पुन्हा जाण्याचं बापूल ा जमलंच नाही.
काल त्याच्या निधनाची बातमी आल्यावर एक चांगला पत्रकार मित्र गेल्याचं दुःख अनावर झालं.आयुष्यभर पत्रकारिता केल्यानंतरही कफल्लक अवस्थेतच बापू गेला.राज्यात अनेक पत्रकारांची अवस्था बापू पेक्षा वेगळी नाही. दुदैर्वानं सरकार आणि समाजाला काही सुखवस्तू आणि उपद्वव्यापी पत्रकारच दिसतात.त्यांच्याकडं बोट दाखवतच साऱ्यांची तुलना होते.त्यामुळं बापूसारखे पत्रकार उपेक्षेचे धनी ठरतात.असो.
बापू महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा संचालक होता.निधीतून त्यांच्या कुटुबियांना काही मदत मिळेल अशी अपेक्षा आहे.जिल्हा पत्रकार संघ तसेच साताऱ्यातील पत्रकारांनाही नम्र विनंती आहे की,बापूचं कुटुंब रस्त्यावर येणार नाही यासाठी काही निधी जमा करता आला तर पहावा.सरकारच्या पत्रकार कल्याण निधीकडून काही अपेक्षा नाही.तिथंली बरीच सरकारी मंडळी मदत देण्याऐवजी मदत कशी देता येणार नाही यावरच काथ्याकूट करीत असतात.हा अनेकदा आलेला अनुभव आहे.बापूंचे दोष काढत बसण्याची ही वेळ नाही हे आपण साऱ्यांनीच लक्षात ठेवावं.नाही जमत एखादयाला व्यवहार .. नाही जमत एखादयाला चांगलं जगणं म्हणून साऱ्याचं खापर त्याच्याच माथी फोडण्यात अर्थ नाही.बापूलाही तसंा जमला नाही म्ङणून आता तेच उगळत बसणं योग्य नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here