एका नदीचं मरण
माझं गाव दोन नद्यांच्या काठावर वसलेलं आहे.. एक राणुबाईची नदी, दुसरी खडकाळी.. तो काळ असा होता,दोन्ही नद्यांना पाडव्यापर्यंत पाणी खळखळत राहायचं.. सुट्ट्यांमध्ये गावी आलो की, राणुबाईच्या नदीत परणधुण्यावर असलेल्या म्हसोबाच्या डोहात तासंतास मनसोक्त डुंबत राहण्याचा आमचा कार्यक्रम ठरलेला.. .. मी पट्टीचा वगैरे पोहणारा नसलो तरी चांगलं पोहतो.. ..उन्हाळ्यातही नदयात पुरूष, दोन पुरूष पाणी नक्की असायचं.. पावसाळ्यात दोन्ही नद्यांना जर एकाच वेळी पाणी आलं तर गावकरी रात्र जीवमुठीत घेऊन काढायचे.. कधी गावात पाणी शिरेल याचा नेम नसायचा.. दोन्ही नद्यांची पात्रं विस्तीर्ण.. छान वाळू असायची.. उन्हाळ्यात या वाळूत आमचे खो-खो, हुतूतूचे खेळ रात्री उशिरापर्यंत चालायचे.. मज्जा यायची..
गेल्या ४० – ४५ वर्षात सारंच बदललं.. नद्या मृत्युमुखी पडल्या..त्यांचे अगोदर ओढे झाले ..नंतर त्या नाले बनल्या.. दोन्ही नद्यांवर वरती धरणं झाल्यानं मोठा पूर येणं बंद झालं. त्याचा परिणाम असा झाला की, दोन्ही बाजुंनी नद्यांवर जेवढं आक्रमण आणि अतिक्रमण करता येईल तेवढं केलं गेलं.. वाळूला सोन्याची किंमत आली.. गावात जेसीबी, ट्रॅक्टर आल्याने या ओढयातून जेवढा उपसा करता येईल तेवढा होऊ लागला .ओढयात पाहावे तिकडे खड्डे खोदले गेले.. पर्यावरणाचा विचार करण्याची संवेदनशीलता उरली नाही. .. परिणाम स्वरूप पावसाळयात पाऊस थांबला की नद्या कोरड्या पडू लागल्या.. नदीला पूर येणं ही गोष्ट ही आप्रुपाची झाली..भर पावसाळ्यात म्हणजे बैलपोळयाला नदीत बैलं धुणं बंद झालं.. कारण पाणीच नसतं.. नदीची ओळख आणि वैभव ही लोप पावलं .. त्याची फिकीर कोणाला नाही.. स्वार्थानं पछाडलेल्या मंडळीना नदयांचं मुक आक्रंदन ऐकू येण्याचं कारण नव्हतं.. नाही..
खडकाळी नदी माझ्या शेताजवळून वाहते.. नदीत ठिकठिकाणी खडक आहेत म्हणून ती खडकाळी.. माझ्या शेताच्या बाजुला खडक असल्याने आमच्या शेताला नैसर्गिक कवच लाभलं आहे..म्हणजे नदीला पूर आला तरी पाणी शेतात येत नाही.. नदीच्या काठावर शेत असणं हे किती आनंद देणारं असतं हे लहानपणापासून अनुभवतो आहे.. मी गावी असतो तेव्हा बहुतेक वेळ शेतातच असतो.. सायंकाळच्या सुमारास मग नदीच्या काठावर असलेल्या खडकावर येऊन बसतो.. एकटाच असतो.. जाणीवपूर्वक मित्रांना टाळतो..मग तासभर नदीच्या काठावर आमची “विपश्यना” सुरू होते.. पाण्याचा खळाळ आणि सोबतच्या झाडावर आपल्या पिलांना अन्न भरणारया पक्षांची किलबिल ऐकताना देहभान हरवून जायला होतं.. दिवस भरातील सारे ताणतणाव एका तासाच्या या एकांतवासानं कुठल्याकुठे पळून जातात.. .. मी जेंव्हा नदीकाठी असतो तेव्हा माझा मोबाईल बंद असतो…पाण्याचं मंजुळ संगीत ऐकत असताना मध्येच वाजणारी मोबाईलची रिंग देखील कर्णकर्कश्य वाटते..तासभर तरी नक्कोच ते.. पण हे सुख ही फक्त पावसाळ्यातच मिळतं.. एरवी नदी कोरडीठाक असते.. उन्हाळ्यातल्या तिच्या रूपाकडं बघवत देखील नाही..मग मी नदीच्या शेतात जायचंच टाळतो..
विकास म्हणजे काय असतं? गावात वीज आली, मोबाईल टॉवर आले, रस्ते झाले, झोपड्या जाऊन इमारती उभ्या राहिल्या,प्रत्येक दारात गाडी ऊभी राहिली, जेसीबी आले म्हणजे विकास झाला का? हाच विकास असेल तर कोणता मोबदला देऊन आम्ही हा विकास साधला? नैसर्गिक वैभव आम्ही गमविलं , सुकून, शांती, समाधान या गोष्टींना तिलांजली देऊन झालेला विकास काय जाळायचाय? खडकावर बसून एक एक खडा नदीच्या डोहात टाकत असताना उठणारे तरंग आणि मनात निर्माण झालेला असंख्य प्रश्नांचा कोलाहल मन अस्वस्थ करीत होता.. परिस्थिती बदलू शकत नाही याची अगतिकता देखील बेचैन करीत होती..भाबडं मन उगीच कल्पना करीत होतं “सारी फिल्म रावाइंड झाली आणि आपण पन्नास वर्षे मागे गेलो तर” खरंच तसं झालं असतं तर काय मज्जा आली असती नाही ? पण ते अशक्य असतं ..या वास्तवाची जाणीव मनाला करून देत मग त्याला जबरदस्तीने वर्तमानात घेऊन येतो.. वर्तमानातलया भयाण वास्तवाला सामोरं जाण्यासाठी..
काळोख पडला आहे, आणि पावसाचे थेंब ही तुटायला लागले आहेत.. अंगावर पडणारया थंडगार थेबानं तंद्री भंग झाली….मग आता उठावं लागणार होतं.. “पुन्हा उदया येईल” चा वादा करून मग घरची वाट धरली.. अजूनही मनात चाललेली घालमेल थांबलेली नाही..
एस.एम.देशमुख