एका दैनिकाचा मृत्यू
आफ्टरनूनला टाळे लागले..
दुःखद बातमीय..आणखी एका दैनिकाचा अकाली मृत्यू झालाय..’आफ्टरनून डिस्पॅच अॅन्ड कुरियर’ हे ते इंग्रजी दैनिक.काल या दैनिकाच्या व्यवस्थापनानं नोटीस काढली..आज कार्यालयाला टाळे ठोकले.दैनिक चालविणं परवडत नाही असं व्यवस्थापनाचं म्हणणंय..’गेली बारा वर्षे आम्ही तोट्यात आहोत..तो तोटा भरून काढण्यासाठी भरपूर प्रयत्न केला ..यश आलं नाही’ असा व्यवस्थापनाचा दावा आहे.बुरे दिन संपतील,अच्छे दिन येतील या भरवश्यावर आम्ही दैनिक चालवत होतो ..आता पाणी नरडयाशी आल्यानं दैनिक बंद केल्याशिवाय पर्याय उरला नाही असंही मॅनेजमेंट सांगतेय..परिस्थिती सुधारण्याची आशा आता मावळली त्यानंतर हा टोकाचा निर्णय घ्यावा लागल्याचं कंपनीचं सांगणं आहे.उद्या 20 तारखेपासून आफ्टरनून कायम स्वरूपी बंद करीत असल्याचं व्यवस्थापनानं कर्मचार्यांना कळविलं आहे.त्यामुळं आजपासून आफ्टरनूनशी जोडलेले शेकडो पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचारी रस्त्यावर येणार आहेत.
आफ्टरनून बंद झालंय..या रांगेत इतरही दैनिकंही आहेत.अगदी मोठ्या दैनिकांनी या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पानं कमी केलीत.काहींनी अंकाची छपाई कमी केलीय..याचं कारण जाहिरातीचं प्रमाण कमी झालंय हे आहे.अनेकदा सरकारी धोरणंही याला कारणीभूत आहेत.सत्तेच्या विरोधी भूमिका घेतल्यानं सरकारनं अनेक मोठ्या आणि प्रतिष्ठीत दैनिकांच्या जाहिराती बंद केल्या आहेत.त्यात टाइम्स,हिंदू सारख्या प्रतिष्ठीत दैनिकांचाही समावेश आहे.मुळात प्रिन्टची वाचकसंख्या कमी झालीय.खपही कमी झालाय.त्याचा फटका दैनिकांना बसतो आहे.नांदेड जिल्हयातील लोहा येथील एक वितरक मध्यंतरी भेटले त्यांनी सांगितलं सर्वच वर्तमानपत्रांच्या खपावर परिणाम झालाय.त्याचा फटका प्रिन्टला बसायला लागलाय.नवी पिढी ऑनलाईन न्यूजपेपर वाचते.भविष्यात ऑनलाईन मिडियाचीच चलती आहे.त्यामुळं ऑनलाईन मिडियाचं मोठं आव्हान प्रिन्टला आहे.यातून मार्ग काढण्यासाठी बहुतेकांनी आपली ऑनलाईन इडिशन सुरू केली आहे.छोटया दैनिकांनी हा मार्ग अवलंबिला पाहिजे.प्रिन्टला मरण नाही असं सांगणारे दिशाभूल करताहेत..लगेच हे होईल असं नाही पण काळानुरूप बदलावंच लागेल.प्रिन्टची विक्री कमी होत गेली तर देशातील हजारो वृत्तपत्र वितरक मोठ्याच संकटात सापडतील.पत्रकारांनी देखील आता काळाची दिशा ओळखून नवीन मार्ग अवलंबिला पाहिजे.असं झालं तरच आपला टिकाव लागेल.