अश्विन मुळे,गेवराई
एका जिद्दी तरूण शेतकर्याची ‘सक्सेस स्टोरी’
शेती क्षेत्रातील समस्यांना अंत नाही..वीज आहे तर पाणी नाही,पाणी आहे तर विज कधी आणि किती दिवस बेपत्ता होईल याचा नेम नाही,निसर्गाचीही साथ नसल्याने कधी दुष्काळ तर कधी गारपीट किंवा अतिवृष्टीचा फटका बसत असतो.सरकारची धोरणंही शेतकरी पूरक नसल्यानं जेव्हा शेतकर्यांकडंं विक्रीसाठी माल असतो तेव्हा त्याचे भाव पडलेले असतात.सरकारला मध्येच झटका येतो आणि सरकार रास्त भावात शेतकर्यांचं धान्य खरेदी करते पण पैसे देण्याच्या नावानं बोंब..गेल्या वर्षी ज्या शेतकर्यांनं तुरी दिल्या त्याचे दाम आजही मिळालेले नाहीत.शेतीत काम करायला मजूर नाहीत,आधुनिक यंत्राच्या सहाय्यानं शेती करायची तर त्यासाठी भांडवल नाही,शेतकर्यांना लुटणार्या टोळ्यांची तर वाणवाच नाही..थोडक्यात अनेक ‘व्याधींनी’ घेरलेला हा शेती व्यवसाय आहे.वर्षभर कष्ट केल्यानंतरही शेतकरी कंगाल असतो..त्यामुळं बर्याचदा शेतकरयावर आत्महत्येची वेळ येते, आणि शेतकर्यांच्या मुलांची लग्न होणंही अवघड होते . हे सारं विदारक वास्तव असलं तरी शेतीच्या क्षेत्रात थोडया प्रमाणात का होईना सकारात्मक घटना घडू लागल्या असून तरूण शेतकरी शेतीत नवनवे प्रयोग करून शेतीबद्दलच्या परंपरागत कल्पनाना फाटा देवू लागले आहेत.आधुनिक तंत्राच्या सहाय्यनं, कमी पाणी लागेल अशी पिकं घेऊन,अनेक तरूण शेती करतानाचे आशादायक चित्र महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिसायला लागलं आहे.बीडमध्येही असे कवडसे दिसू लागले आहेत त्याचं स्वागत करावंच लागेल.बीड हा कायम दुष्काळी जिल्हा.पाऊस जेम तेम 500 ते 600 मिली मिटर पडतो.तो देखील अनिश्चित.मात्र निसर्गाच्या या लहरीपणावर मात करून शेतीत नवे प्रयोग अगदी बीडमध्येही सुरू आहेत.गावागावांमधून शेततळी उभारली जात आहेत.पाणी अडवाचे प्रयोग सुरू आहेत.श्रमदानातून गावातील नद्याचं खोलीकरण सुरू आहे..हे सारे बदल नक्कीच उत्साह वाढविणारे आहेत..शेती पूरक व्यवसाय आणि फळबागांच्या माध्यमातून बीड जिल्हयात परिवर्तन घडताना दिसत आहे..चित्र बदलायला थोडा वेळ लागेल पण सर्वत्र प्रामाणिक प्रयत्न होताना दिसत आहेत.
मागील आठवडयात गेवराई येथील तरूण प्रगतीशील शेतकरी अश्विन मुळे याच्या शेतावर जाण्याचा योग आला.गेवराई शहराच्या जवळ आणि महामार्गाला लागूनच त्याची शेती आहे.अश्विन हा पदवीधर तरूण आहे.लष्करात जाऊन देशाची सेवा करण्याचं अश्विनचं स्वप्न होतं.त्यासाठी एनडीएत प्रवेश मिळविण्यासाठी त्यानं पुण्यात राहून प्रयत्नही केले.मात्र हे स्वप्न साध्य होत ऩाही असं दिसल्यावर अश्विननं नोकरीच्या मागं न लागता थेट गाव गाठलं आणि शेती करण्याचा निर्णय घेतला.वडिलोपार्जित शेती होती तरी शिकल्या -सवरलेल्या बामनाच्या पोरानं नोकरी करावी हे काय भिकार डोहाळे आठवायला लागलेत ? असं सूर व्यक्त होऊ लागले.अनेकजण शेती विकून शहराचा रस्ता धरताहेत, शेती करतोय म्हटल्यावर कोणी पोरगीही देणार नाहीची भितीही दाखवली गेली.मात्र अश्विनचा निर्णय पक्का होता.निर्धारही होता..शेतीची सूत्रं हाती घेऊन परंपरागत शेतीला टप्याटप्यानं फाटा देत आणि आधुनिकतेची कास धरत त्यानं शेती करायला सुरूवात केली.खिसा तर रिकामाच होता.त्याही परिस्थितीत न डगमगता त्यानं थोडा थोडा बदल करीत आज एक यशस्वी आणि प्रगतीशील शेतकरी असा तालुक्यात नावलौकिक मिळविला आहे.अश्विनकडं आज तीस-पस्तीस एकर जमिन आहे.या शेतीत फळबाग करून त्यानं मोठा लाभ मिळविला आहे.पेरू,सिताफळ,चिंच यासारखी तुलनेत कमी खर्चीक फळं घेऊन त्यानं तरूणांना नवा आदर्श घालून दिला आहे.अश्विन एवढयावरच थांबला नाही.आज त्यानं नर्सरी सुरू केली आहे.कोणताही पुर्वानुभव नसताना त्यानं हे शिवधनुष्य उचलंलं आणि ते यशस्वी करून दाखविलं आहे.गेवराई तालुक्यात आज अश्विनला नर्सरीच्या क्षेत्रात कोणी स्पर्धक नाही.नर्सरित जवळपास सर्वच फळांची रोपं त्यानं तयार केली आहेत.त्याला मागणीही मोठी आहे.नर्सरी वाढवून ती आधुनिक पध्दतीनं करण्याचं त्याचं स्वप्न आहे.शेतकर्यानं परंपरागत शेतीला फाटा देऊन फळ बागायतीकडं वळावं असं त्याचं सांगणं आहे.त्याच्या नर्सरीला आता शासकीय मान्यता मिळाल्यानं मागणी वाढली आहे.अगदी जेवायलाही आज त्याच्याकडं वेळ नाही.. अश्विनकडं काही म्हशी देखील आहेत.शेतीला त्याचा उपयोग होतो.शेती,नर्सरी आणि दुग्धव्यवसाय या माध्यमातून अश्विननं बारा-पंधरा जणांना रोजगार उपलब्ध करून दिलाय.पाण्याची कमतरता आहेच पण पाण्याचा योग्य वापर करून त्यानं या टंचाईवर मात केलीय.पाण्याचा थेंब ही वाया जाणार नाही याची काळजी अश्विन घेतो.सौर उर्जेच्या माध्यमातून त्यानं विजेच्या लपंडावातून स्वतःची कायमस्वरूपी सुटका करून घेतली आहे.एकही बैलजोडी नसताना ट्रॅक्टरच्या सहाय्यानं अश्विन सारी शेती करतो.आज त्याची शेती पाहण्यासाठी दूरदुरून शेतकरी त्याच्याकडं येतात.
थोडक्यात नोकरीच्या मागं न लागता गेवराईसारख्या दुष्काळी भागात राहून त्यानं शेती देखील उपजिविकेचच नव्हे तर समृध्दीचं साधन होऊ शकते हे स्वकतृत्वानं सिध्द करून दाखविलं आहे.आज वडिल अनिलराव मुळे आणि धाकटा भाऊ उमेश मुळे याचीही चांगली साथ अश्विनला मिळले.हे सारं कुटुंबंच आज शेतीत रमलंय..अन हो अश्विन शेती करतो म्हणून त्याचं लग्न थांबलं नाही..लग्न झालं आणि चांगली बायको देखील त्याला मिळाली. थोडक्यात जिद्द,चिकाटी,परिश्रम करण्याची तयारी,आधुनिकतेची कास धरत जर शेती केली तर शेती परवडत नाही हे रडगाणं थांबविणं फार अवघड नाही हे अश्विननं दाखवून दिल आहे.
अश्विनचं अभिनंदन आणि शुभेच्छा.
अश्विनचा मोबाईल नंबर 9423691232