उरणला जाणं कधी काळी “काळ्या पाण्याच्या” शिक्षेपेक्षा कमी नव्हतं..एकेरी रस्ता,त्यावर गुडघाभर खड्डे,ट्रॉलर आणि ट्रक्सच्या उरात धडकी भरायला लावणार्या रांगा,त्यातच एखादं वाहन बंद पडलं तर मग विचारायलाच नको.. पळस्पे फाटा ते उरण या 20-22 किलो मिटरच्या अंतरासाठी मग कधी दोन तर कधी तीन तास आरामात लागायचे. .सारंच कंटाळवाणं, वैताग आणणारं.. .अलिबागला असताना असंख्य वेळा मी या वाहतूक कोंडीचा आणि जीवघेण्या प्रवासाचा अनुभव घेतला आहे.त्यावर रकानेच्या रकाने भरून लिहिलं ही होतं.पण काहीच उपयोग व्हायचा नाही.मला उरणकर जनतेच्या सहनशीलतेचं तेव्हा आश्चर्य आणि कौतूक ही कारण आम्ही एका भेटीनं वैतागून जायचो.. उरणची मंडळी वर्षानुवर्ष अशा स्थितीत कशी जगत असेल हा प्रश्न कायम पडलेला असायचा.. अनेक प्रकल्प उरण परिसरात आहेत.एलिफन्टा केव्ह्ज सारखा जगविख्यात ऐतिहासिक वारसा स्थळं या भागाचं वैभव आहेत.. आणि निसर्ग तर पर्यटकांना सारखा खुणावत असतो.. हे सारं होतंच.. शिवाय मुंबई हाकेच्या अंतरावर असताना देखील उरण तालुका कायम दुर्लक्षित आणि उपेक्षित राहिला.असं का? हा प़श्न मला कायम सतावत राहायचा.. उरणच्या जनतेची तरी चूक काय? त्यांनी सत्ता सर्वांना आळी पाळीनं देऊन पाहिली.. पण पालथ्या घडावर पाणी.. उपयोग होत नव्हता.”नेते निष्क्रीय आणि जनता हतबल” अशी उरणची स्थिती होती.मला आठवतंय रायगड प्रेस क्लबनं उरणच्या बुनियादी प्रश्नांकडे व्यवस्थेचं लक्ष वेधण्यासाठी पत्रकार जगदीश तांडेल आणि अन्य पत्रकार मित्रांच्या मदतीनं “महाचर्चा” हा कार्यक्रम घेतला होता.संकल्पना अशी होती की,लोकांनी प्रश्न विचारायचे आणि लोकप्रतिनिधींनी त्यांची उत्तरं द्यायची.दोन-तीन तास चाललेल्या या चर्चेत लोकांनी रस्त्यावरून लोकप्रतिनिधींना आडवे केले होते..नंतर आम्ही त्यावर एक अहवाल तयार करून तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना पाठविला.. रस्त्यासारखे बुनियादी प्रश्न तरी सोडवा अशी विनंती केली.. मात्र त्याचा ही उपयोग झाला नाही.रस्त्याचं रडगाणं सुरूच राहिलं.मी अलिबाग सोडल्यानंतर उरणच्या समस्यांचा विषय देखील माझ्यापुरता संपला होता.. अलिबाग सोडल्यानंतर उरणला जायचं काम उरणार नाही असं मी गृहित धरलं होतं.मात्र एका महा़भागाच्या कृपेनं गेली दोन -तीन वर्षे सातत्यानं “उरण दर्शन” घडतंय..उरणची भौगोलिक स्थिती माहिती असल्यानं उरणला जायचंय या कल्पनेनंच कापरं भरायचं..पुण्यापासून जेमतेम 140 किलो मिटरच्या अंतरावर असलेल्या उरणला जायला चार तास तर कसेही लागायचे.मात्र काल जेव्हा मी उरणला गेलो तेव्हा आश्चर्याचा सुखद धक्का बसला.पुण्याहून निघाल्यानंतर चक्क अडीच तासात उरणला पोहोचलो.पळस्पे फाट्यावर मुंबई-गोवा महामार्गावरून जाणार्या पुलाचं काम पूर्ण झालंय,पुढचा रस्ता 8 लेन झालांय..उरण शहराच्या जवळ असलेल्या पुलाचं कामही मार्गी लागलंय.हे दोन्ही चौक पार करायला कसाही एक तास जायचा.काल मात्र तीन मिनिटात हे अंतर पार करता आलं.तिकडनं नवी मुंबई महापालिकेपासून उलवे मार्गे जो रस्ता येतोय त्याचंही काम वेगात सुरूय आणि उरणकडून नवी मुंबईकडे जाणारा पूल देखील पूर्ण झाल्यानं हा रस्ता देखील दोन मिनिटात पार करता आला..गव्हाण फाट्यावर कोठून कसं जायचं हे ही समजत नाही… विरार-अलिबाग हा दहा पदरी महामार्ग याच परिसरातून जाणार असल्यानं पुढील काळात उरणला मोठं महत्व येणार आहे.उलवा-पनवेल पट्टयात आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे आणि वाशी-उरण ही रल्वे आज बामणडोंगरी स्थानकापर्यंत जाऊ लागली असली तरी ती नजिकच्या काही दिवसांतच उरणला पोहोचणार असल्यानं उरण-सीएसटी हे अंतर दोन तासात पार करणं शक्य होणार आहे.हे सारे बदल सुखावून टाकणारे आहेत.मी उरणला किमान शंभर वेळा गेलो असेल पण काल उरणला जाताना तीन-चार वेळा तरी मला रस्ता विचारावा लागला.एवढया झपाट्यानं हा सारा परिसर बदलतोय.. रोजगार वाढतोय, बाहेरून येणारयांनी संख्या वाढतेय.. नव्या वस्त्या उदयाला येताहेत.. या भागातील गावं देखील झपाटयानं कात टाकत आहेत.. उलवे हे गाव आता आंर्तरबाह्य बदलून गेलंय..उलवे आता खेडं राहिलं नाही.. रेल्वेनं जोडलं गेल्यानं ते मुंबईचं उपनगर झालंय.. ..पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या की विकासाला वेग येतो हे या भागात गेल्यानंतर दिसून येतं.उरणच्या अवती-भवती हे चित्र दिसत असलं तरी उरण शहराची अवस्था मात्र “जैसे थे” अशीच आहे..अरूंद रस्ते,अतिक्रमणं,वाहतूक कोंडी,रस्त्यावरील खड्डे हे वीस वर्षापुर्वीचं चित्र आजही कायम आहे.उरण परिसरात मोठे प्रकल्प आल्यानं त्याचा ताण उऱण शहरावर पडला..मात्र त्या तुलनेत पायाभुत सुविधा निर्माण करता न आल्यानं उरणची अवस्था “बकाल वस्ती” अशीच आहे.उरणचं महत्व लक्षात घेऊन उरण शहरचा विकास व्हायला हवा त्यासाठी अतिरिक्त निधीही सरकारनं द्यायला हवां अन्यथा तालुक्यातील अन्य गावं उरणच्या पुढं निघून जातील आणि उरण केवळ तालुक्याचं कुंकू लावून आहे त्या स्थितीत नांदत राहिल..उरणच्या तुलनेत अलिबाग शहराचं रूपडं पार बदलून गेलंय..रस्ते रूंद झालेत,अतिक्रमणं हटविली गेलीत.वाहतूक कोंडीतून अलिबागची जवळपास सुटका झालीय.परिणामतः अलिागला येणार्या पर्यटकांच्या संख्येत मोठीच वाढ झाली आहे.उरण या अवस्थेत कधी पोहोचेल माहिती माहिती नाही.. उरण शहराकडं देखील लक्ष देण्याची गरज आहे.. एस. एम.
7Sanjaykumar Joshi, Sharad Katkar and 5 others1 Share