सीमा भागातील मराठी पत्रकारांनाही महाराष्ट्र
सरकारची अधिस्वीकृती मिळालीच पाहिजे.
सीमा भागातील मराठी जनतेला कोणी वाली नाही. याचा अनुभव मराठी माणसं वर्षानुवर्षे घेत आहेत.महाराष्ट्र सरकारकडून केवळ कोरडया सहानुभुती शिवायही काही मिळत नाही.त्यामुळे मराठी जनतेत एकप्रकारे नैराश्याची भावना परिसरात दिसते. जी अवस्था सामांन्यांची तीच सीमा भागातील मराठी पत्रकारांचीही.बेळगाव,निपाणी आणि परिसरात जे मराठी पत्रकार मराठी वृत्तपत्रांसाठी काम करतात त्यांना साधी अधिस्वीकृती पत्रिका देण्याचे सौजन्यही महाराष्ट्र सरकारने किंवा आतापर्यंतच्या अधिस्वीकृती समितीने दाखविलेले नाही.महाराष्ट्र सरकार सीमा भागातील मराठी वृत्तपत्रांना जाहिराती देते मात्र अधिस्वीकृती देत नाही हा अजब प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहे.त्याबद्दल मोठी नाराजी या भागातील पत्रकारांमध्ये आहे.एकीकडे कर्नाटक सरकार सीमा भागातील कन्नड भाषिक पत्रकारांसाठी अधिस्वीकृती तर देतेच त्याच बरोबर मासिक आठ हजार रूपये पेन्शनही कर्नाटक सरकार देते.मराठी भाषिक पत्रकारांना मात्र सीमा भागात कोणत्याच सुविधा मिळत नाहीत.हे संतापजनक आहे.
सीमा भागातील मराठी पत्रकारांवर होणारा या अन्यायाला काल कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी वाचा फोडली. ‘सीमा भागात मराठी वृत्तपत्रांसाठी काम कऱणारे पन्नासही पत्रकार नसतील.शिवाय महाराष्ट्र सरकारच्या अधिस्वीकृती पत्रिकाधारक पत्रकारांना महाराष्ट्रात ज्या सुविधा मिळतात त्या कर्नाटकात काही मिळणार नाहीत.त्यामुळे सीमा भागात मराठी पत्रकारितेची पताका फडकवित ठेवल्याबद्दलचा सन्मान म्हणून ही अधिस्वीकृती दिली पाहिजे’ अशी सूचना किरण नाईक यांनी केली. परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख,जेष्ठ सदस्य योगेश जाधव , योगेश त्रिवेदी आदिंनी या मागणीचे जोरदार समर्थन केले.’या संबंधीचा ठराव मंजूर करावा आणि तो शासनाकडे पाठवून अधिस्वीकृती समितीने त्याचा पाठपुरावा करावा’ अशी सूचना योगेश त्रिवेदी यानी केली। हा ठराव अध्यक्ष यदू जोशी यांनी मांडावा अशी सूचनाही त्यांनी केली.त्यानुसार अध्यक्षांनी या संबंधीचा ठराव मांडला आणि तो टाळ्यांच्या गजरात एकमताने मंजूर केला गेला.( मात्र यातही एक दोन सदस्यांनी त्यांच्या सवयीप्रमाणे आडवा पाय घालण्याचा प्रयत्न केला.पण त्याचा उपयोग झाला नाही. हा विषय किरण नाईक यांनी उपस्थित केल्यानंतरही अधिस्वीकृती समितीच्या इतिवृत्तांत त्याच्या नावाचा उल्लेख असेलच असे नाही.किंबहुना तो नसेलच.)
तत्पुर्वी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या एका शिष्टमंडळाने सकाळी परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख ,किऱण नाईक,पुढारीचे योगेश जाधव आदिंची भेट घेऊन ‘सीमा भागातील पत्रकारांवर अधिस्वीकृतीच्या बाबतीत होत असलेला अन्याय दूर करावा’ अशी मागणी करणारे निवेदन सादर केले.’या मागणीचा आपण पाठपुरावा करू’ अशा शब्दात देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.या शिष्टमंडळाचे नेतृत्व परिषदेचे कोल्हापूर विभागीय सचिव समीर देशपांडे यांनी केले.शिष्टमंडळात बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर,उपाध्यक्ष सुहास हुद्दार,कार्यवाह प्रकाश माने,कार्यकारिणी सदस्य शेखर पाटील आदिंचा समावेश होता.5 एप्रिल रोजी देखील पत्रकार संघाच्या पदाधिकार्यांनी एस.एम.देशमुख यांची कोल्हापूर येथे बैठक घेऊन सीमा भागातील मराठी पत्रकारांना पत्रकारिता करताना येणार्या अडचणींबाबत चर्चा केली होती.