मराठा समाजाच्या मूक मोर्चावर आक्षेपार्ह व्यंगचित्र काढल्याप्रकरणी ‘सामना’चे संपादक तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कार्यकारी संपादक संजय राऊत, राजेंद्र भागवत व व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांच्यावर मंगळवारी पुसद न्यायालयाने समन्स बजावला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने राज्यभर मूक मोर्चा काढून आपल्या मागण्यांना वाचा फोडली होती. हे मोर्चे शांततेत निघाले असताना शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये या मोर्चाची टिंगल उडवत आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रकाशीत करण्यात आले होते. त्यावरून मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी हे व्यंगचित्र काढले होते. सामनामध्ये हे व्यंगचित्र प्रकाशित होताच राज्यभर मराठा समाजात संतापाची लाट उसळली होती. ठिकठिकाणी मराठा समाजाने शिवसेनेच्या विरोधात जोरदार आंदोलन सुरू केले होते. याच व्यंगचित्राविरोधात पुसद येथील अॅड. दत्ता सूर्यवंशी यांनी २६ सप्टेंबर २०१६ रोजी पुसद येथील न्यायालयात तक्रार दाखल करून ‘सामना’मधील व्यंगचित्रामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. तक्रारीनुसार व्यंगचित्रामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्याचे दिसून येताच प्रथम श्रेणी न्यायाधीश अनंत बाजड यांनी भादंवीच्या ५०१ व ५०६ अंतर्गत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कार्यकारी संपादक संजय राऊत, राजेंद्र भागवत व व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई या चौघांविरुद्ध समन्स बजावला आहे.
समन्सनुसार चौघांनाही १९ डिसेंबर रोजी पुसद न्यायालयात हजर व्हायचे आहे. पुरावे व साक्षीवरूॐन चौघांना दोषी ठरवून न्यायालयाने समन्स पाठविले असल्याचे फिर्यादींचे वकिल अॅड. आशिष देशमुख यांनी सांगितले.