आसाममध्ये पत्रकारांसाठी पेन्शन योजना
पेन्शन देणारे देशातले सतरावे राज्य
महाराष्ट्राने आसामपासून बोध घ्यावा
देशातील 16 राज्यांमध्ये पत्रकारांना अगोदरच पेन्शन दिले जाते.आज आसाम सरकारने देखील पत्रकारांसाठी पेन्शन आणि अन्य कल्याणकारी योजना जाहीर करून आपण लोकशाहीचा आधारस्तंभ मजबूत करण्याच्या कामात महाराष्ट्राच्या पुढे आहोत हे दाखवून दिले आहे.महाराष्ठ्रातील भाजप सरकारनं आपल्या जाहिरनाम्यात दोन वर्षांपूर्वी पत्रकारांना पेन्शन देण्याचं आश्वासन दिलं होतं.मात्र दोन वर्षानंतरही सरकारनं आश्वासन पूर्तता केलेली नाही.कदाचित विधानसभेच्या वेळचा जाहिरनामा बॉन्डपेपरवर काढलेला नसल्यानं सरकारला त्याचं स्मरण नसावं.मात्र आसाम सारख्या एका छोटया राज्यानं पत्रकारांची काळजी घेत आज सादर केलेल्या बजेटमध्ये पेन्शनची घोषणा तर केली आहेच त्याचबरोबर जर्नालिस्ट फॅमिली बेनिफिट फन्डस नावाची योजना जाहिर करून पत्रकाराच्या मृत्यूनंतरही कुटुंबाला मदत देण्याची पूर्ण दर्शविली आहे.त्याच बरोबर पत्रकारांसाठी मिडिया फेलोशिप जाहीर करून उच्च शिक्षणासाठी 50 हजार रूपये पत्रकाराला देण्याची घोषणा देखील आज केली आहे.आसामचे अर्थमंत्री हिमंता बिश्व सरमा यांनी सादर केलेल्या 2017-18च्या अर्थसंकल्पात पत्रकारांसाठी विविध घोषणा केल्या आहेत.आसाममध्ये पत्रकारांना नेमके किती पेन्शन मिळेल,त्याचे निकष काय आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही.आसाममधील पत्रकार संघटनांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषदेने आसाम सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून महाराष्ट्र सरकारनेही आसाम सरकारच्या या निर्णयापासून काही बोध घेत महाराष्ट्रातील पत्रकारांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.