आम्ही केवळ बोलत नाही..

आम्ही करून दाखवितो..

दोन वर्षात परिषदेने सोडविले पत्रकारांच्या जिव्हाळ्याचे 2१ प्रश्‍न 

मराठी पत्रकार परिषद ही मराठी पत्रकारांची पहिली आणि हक्काची संघटना आहे.परिषदेच्या स्थापनेपासून विविध लढाया लढत परिषदेने देशातील मराठी पत्रकारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.परिषद आपले हे उत्तरदायीत्व निष्ठेने आणि तेवढ्याच धडाडीने अलिकडच्या काळात ही  पार पाडत आहे. माध्यमातील प्रत्येक घटकांचे प्रश्‍न घेऊन परिषद आक्रमकपणे ते मांडताना दिसत आहे.त्यासाठी संवाद आणि संघर्ष अशा दोन्ही मार्गाचा उपयोग करीत परिषदेने गेल्या दोन वर्षात  राज्यातील पत्रकारांच्या जिव्हाळ्याचे अनेक विषय मार्गी लावले आहेत.सलग आणि अथकपणे बारा वर्षे पत्रकार संरक्षण कायद्यासाठी लढाई लढल्यानंतर 7 एप्रिल 2017 रोजी पत्रकार संरक्षण कायदा मंजूर झाला आहे.ही लढाई पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली लढली असली तरी मराठी पत्रकार परिषदेचा त्यात सिंहाचा वाटा होता हे सर्वज्ञात आहे. पेन्शनचा  प्रश्‍न सोडविण्याची सरकारची मानसिकता तयार झाली असून आगामी काळात  त्यावरील निर्णय अपेक्षित आहे.त्यासाठीची सारी तयारी सरकारने पूर्ण केली आहे.त्याचबरोबर प्रश्‍न पत्रकारांच्या आरोग्याचा असो,पत्रकार गृहनिर्माणचा असो किंवा छोटया आणि मध्यम वृत्तपत्रांच्या अस्तित्वाचा असो  परिषदेने प्रत्येक प्रश्‍न अभ्यासपूर्ण भूमिका घेत मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे.असे अनेक प्रश्‍न परिषदेने गेल्या वर्ष -दीड वर्षात मार्गी लावत आपली पत्रकारांप्रतीची बांधिलकी जपली आहे.मजिठियासाठीची लढाई देखील परिषद अन्य संघटनांच्या माध्यमातून लढत आहे.त्यासाठी एक दबावगट तयार करून सरकारला काही निर्णय घेण्यास भाग पाडले गेले आहे.परिषदेचे एक प्रभावी संघटन आहे,त्याचा विस्तार तालुका आणि ग्रामस्तरापर्यंत झालेला असल्याने संघटनेच्या दबावापुढे सरकारला काही निर्णय घेणे भाग पडले आहे.म्हणजे परिषदेच्या पदाधिकार्‍यांना आज जे यश प्राप्त झालेले आहे त्याचं सारं श्रेय आमच्या हजारो पत्रकार सहकार्‍यांनाच आहे.परिषदेने आंदोलनाची हाक दिल्यानंतर त्यांला तालुकास्तरापर्यंत मिळत गेलेला प्रतिसाद,जवळपास दीडशे आमदारांची पाठिंबा पत्रे मिळविण्यात राज्यातील पत्रकारांनी दिलेले योगदान आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळेच पत्रकारांचे अनेक प्रश्‍न सोडविण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत याचा आनंद आणि अभिमान आम्हाला आहे.या निमित्तानं देवेंद्र फडणवीस सरकारलाही आम्ही मनापासून धन्यवाद देतो.पत्रकारांच्या प्रश्‍नांची सहानुभुतीपूर्वक त्यांनी उकल केलेली आहे…हे सर्व प्रश्‍न मार्गी लावून  केवळ बोलणारे,फुकटचे श्रेय लाटणारे आम्ही नाहीत तर करून दाखविणारे आणि प्रसंगी भिडणारे आहोत हे परिषदेने दाखवून दिले आहे.आपल्याला अनेक प्रश्‍न मार्गी लावता आले त्याबद्दल आनंद आहे.राज्यातील सर्व पत्रकारांचे त्या निमित्तानं अभिनंदन.आणि आभार .-

 रिषदेमुळे मार्गी लागलेले प्रश्‍न 

१)  पत्रकार संरक्षण कायदा व्हावा अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने सर्वप्रथम 2005 मध्ये केली आणि नंतर तब्बल बारा वर्षे अथकपणे त्याचा पाठपुरावा केला.नंतर पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती स्थापन झाली तरी या समितीचे नेतृत्व एस.एम.देशमुख यांच्या रूपाने परिषदेकडेच होते.सततचा पाठपुरावा,आंदोलनातलं सातत्य आणि संवाद आणि संघर्ष अशा दोन्ही पातळ्यावर सुरू असलेला प्रयत्न यामुळे सरकारला अखेर पत्रकारांच्या या मागणीची दखल घेत पत्रकार संरक्षण कायदा करावा लागला.7 एप्रिल 2017 रोजी हा कायदा झाला.अशा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले आणि एकमेव राज्य ठरले आहे.या कायद्याचं मोठ श्रेय परिषदेचे आहे हे कोणी अमान्य करू शकत नाही.

2) मराठी पत्रकार परिषद गेली वीस वर्षे पत्रकार पेन्शनसाठी प्रयत्न करीत आहेत.सरकारला अखेर या मागणीची दखल घ्यावी लागली असून पत्रकार पेन्शनची घोषणाही सरकार आगामी काळात  करू शकते.त्यासाठी सरकारने राज्यातील पेन्शन पात्र पत्रकारांची नेमकी संख्या किती आहे?,अशा पत्रकारांचे उत्पन्न आणि अन्य माहिती जमा केली आहे.हा  देखील एक महत्वाचा निर्णय परिषदेमुळे सरकारला घ्यावा लागला. नागपूर येथील परिषदेच्या पुरस्कार वितऱण समारंभात मागच्या माहिन्यातच मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी पेन्शनचा विषय मार्गी लावण्यात येईल असे आश्‍वासन दिले आहे.

३) सहा वर्षांपासून अस्तित्वात नसलेल्या अधिस्वीकृती समितीचे पुनर्गठण करावे ही मागणी परिषदेने सातत्यानं लावून धरली होती.त्याला अखेर यश आले.मुख्यमंत्र्यांनी परिषदेच्या पिंपरी-चिंचवड येथील  अधिवेशनात पंधरा दिवसात अधिस्वीकृती समिती अस्तित्वात आणण्याची घोषणा केली.त्यानुसार समितीचे पुनर्रचना केली गेली.हे परिषदेचे मोठे यश होते.

४) अधिस्वीकृती देताना 20 वर्षे पत्रकारिता केलेल्या आणि 50 वर्षे वय असलेल्या पत्रकारांना ज्येष्ठ पत्रकार म्हणून अधिस्वीकृती देण्याचा निर्णय सरकारने घेतला.त्यासाठी  परिषद 2012 पासून पाठपुरावा करीत होती.( शासन निर्णय क्रमांक अधिस्वि-2016 / प्र.क. /127 /34 ,दिनांक 28 मार्च 2016)मात्र यामध्ये नंतर अशी मखलाशी केली गेली आहे की,या बदलाचा लाभ केवळ श्रमिक पत्रकारांनाच होईल.याविरोधात समितीमध्ये परिषदेचे सदस्य सातत्यानं लढा देत आहेत.सरकारकडंही हे गार्‍हाणं मांडलं गेलं आहे.कुळल्याही परिस्थितीत मुक्त पत्रकार आणि 20- 50 श्रेणीतील पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी परिषद यापुढेही लढत राहणार आहे.

५) रेल्वे प्रवासात अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना पन्नास टक्के सवलत आहे.मात्र प्रवासाचं बुकींग करायला रेल्वे स्टेशनवर जावं लागायचं.बुकींगची व्यवस्था ऑनलाईन उपलब्ध करून द्यावी अशी परिषदेची जुनी मागणी होती.ती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पात मान्य केली.आता अधिस्वीकृतीधारक पत्रकार ऑनलाईन बुकींग करू शकतात.

६) पत्रकारांच्या गृहनिर्माण सोसायट्यांची मागणी परिषदेने केलेली होती.त्यासंबधीची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी पिंपरी अधिवेशनात केली होती.नंतर वीस ऑगस्ट 2015 रोजी पत्रकार गृहनिर्माण सोसायटयांना जागा देण्याचा जीआऱ निघाला. त्यानुसार आता पत्रकारांनी एकत्र येत एखादी गृहनिर्माण सोसायटी स्थापन केली तर सरकार त्यासाठी प्राधान्यानं जागा उपलब्ध करून देते.तसे आदेश सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले गेले आहेत.

) पत्रकारांना आरोग्य विषयक उपचारासाठी तातडीची मदत देता यावी यासाठी एखादा निधी निर्माण करावा अशी मागणी परिषदेने वर्षावर तत्कालिन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली होती.त्यानुसार त्यांनी स्व.शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीची स्थापना केली.त्यात दोन कोटी रूपये ठेवले.या ठेवीतून मिळणार्‍या व्याजातून गरजू पत्रकारांना मदत दिली जाऊ लागली.मात्र ही रक्कम अपुरी असल्याने ठेवीच्या रक्कमेत वाढ करावी अशी मागणी परिषदेने पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली.त्यांनी ही रक्कम पाच कोटी केली.त्यानंतर पुन्हा परिषदेच्या पिंपरी अधिवेशनात निधीच्या ठवीत वाढ करावी आणि जास्तीत जास्त पत्रकारांना मदत दिली जावी अशी मागणी  केली.त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवीची रक्कम 10 कोटी रूपये केली आहे.त्याच प्रमाणे पत्रकारांना दिल्या जाणार्‍या मदत रक्कमेतही गरजेनुसार 3 लाख रूपयांपर्यत वाढ केली आहे.यापुर्वी जास्तीत जास्त एक लाख रूपयेच मदत दिली जायची राज्यातील असंख्य पत्रकारांनी याचा लाभ घेतला आहे.. अधिस्वीकृती नसलेल्या  पत्रकारांनाही या निधीचा लाभ दिला जावा ही परिषदेची मागणी आहे .नागपूर येथील कार्यक्रमातही एस.एम.देशमुख यांनी या मागणीचा पुनरूच्चार केला आहे.( शासनादेशा ः मावज 2016 / प्र.क्र./ 81/ 34 दिनांक 29 मार्च 2016 )

८) छोटया वृत्तपत्रांच्या जाहिरात धोरणात बदल करावा,जाहिरातीचे दर वाढवून द्यावेत ही परिषदेची मागणी आहे.ती अद्याप मान्य झालेली नसली तरी. दैनिकांप्रमाणेच त्या वर्गातील साप्ताहिकांना त्या प्रमाणात जाहिराती दिल्या जाव्यात हा महत्वाचा निर्णय झालेला आहे.(शासन निर्णय संकीर्णः 2015 प्र.क्र. 274 34 दिनांक 30 मे 2016 )अन्य एका निर्णयानुसार शासकीय मंडळं महामंडळं,प्राधिकरणं,आयोगाच्या जाहिराती या माहिती आणि जनसंपर्कच्या माध्यमातूनच गेल्या पाहिजेत असंही सरकारनं म्हटलेलं असल्यानं या जाहिराती देखील आता साप्ताहिक तसेच छोटया पत्रांना मिळतील.(30March 2016 ,मावज 2016 प्र.क्र.56 34 )

९) सरकारी यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पुर्वी दिवाळी,26 जानेवारी वगैरेसाठी जास्तीत जास्त 2 हजार रूपयांची जाहिरात दिली जायची.परिषदेच्या प्रयत्नानं त्यात वाढ केली गेली असून आता कमीत कमी 5 हजारांची जाहिरात दिली जाते.याचाही लाभ अनेक पत्रकारांना झाला आहे.

१०) मजिठिया आयोगाच्या शिफारशींची राज्यात अंमलबजावणी केली जावी यासाठी मुंबई युनियन ऑफ  जर्नालिस्ट ने पुढाकार घेतला आहे.त्यांच्या खादयाला खांदा लाऊन परिषद ही लढाई लढत असून त्याला यशही येत आहे.कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी त्यासंदर्भात नुकतीच मंत्रालयात बैठक लावली होती.त्यात त्यानी एक समिती नेमण्याचा निर्णय घेतला असून विभागवार माहिती संकलित करायला सुरूवात केली आहे.त्यासाठीची पाहणी सुरू झाली आहे.इंटरिम रिलिफ ,कर्मचार्‍यांना दिले जाणारे वेतन,आणि कंपन्यांचे बॅलेन्ससिटही तपासले जात आहे.परिषद आणि जॉइंट अ‍ॅक्शन कमिटीचे हे मोठे यश आहे.राज्यात बहुतेक दैनिकांनी अद्याप मजेठियाची अंमलबजावणी केली नाही हे जरी खरं असलं तरी परिषद याचा पाठपुरावा करीतच राहणार आहे.परिषद मजिठियाची लढाई शेवटपर्यत लढत राहणार आहे.

११) आपला अंक पास्टाने पाठविण्यासाठी पोस्ट परवाना दिला जातोे. मात्र मध्यंतरी पोस्टाने अचानक विदाऊट तिकीट परवाना रद्द केला होता.त्यामुळं साप्ताहिकचे संपादक,मालकांची मोठी अडचण झाली होती.त्याविरोधात परिषदेने आवाज उठविला होता.धुळे येथील परिषदेचे गो.पी.लांडगे आणि दाणी यांनी उपोषणही केले होते.त्याचा पाठपुरावा दिल्लीपर्यंत केला गेला.त्यानंतर पुन्हा विदाऊट तिकीट परवाना पध्दत सुरू झाली आहे.

१२) आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री  जांभेकर यांचं महाराष्ट्रात स्मारक नाही याची खंत परिषदेला होती.त्यासाठी मराठी पत्रकार परिषद आणि परिषदेशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचा सातत्यानं पाठपुरावा सुरू होता.अखेर त्याला यश आले असून फडणवीस सरकारने या स्मारकासाठी दीड कोटी रूपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.सिधुंदुर्ग जिल्हयाच्या मुख्यालयात म्हणजे ओरोस येथे आता बाळशास्त्रींचे भव्य स्मारक उभे राहणार आहे.स्मारकासाठी लागणारी जमिन सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या ताब्यात आली असून त्या जागेची नुकतीच परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख,विश्‍वस्त किरण नाईक,कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर आणि कोल्हापूर विभागीय चिटणीस देशपांडे  आदिंनी सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक यांच्यासह पाहणी केली.

१३)  मराठी पत्रकार परिषदेच्या पत्रकार आरोग्य सेवा कक्षाच्यावतीने राज्यातील 11 पत्रकारांना मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्यात परिषदेला यश.त्यातील अनेक पत्रकार दुर्धर आजारातून परिषदेमुळे बरे झाले त्याबद्दल आम्ही नक्कीच आनंदी आहोत.

14) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना शासकीय रूग्णालयात मोफत उपचार केले जातात.त्यासाठीही परिषदेचे प्रयत्न होते.त्याला अखेर यश आले.

15) राज्य सरकार पत्रकारांना विविध पुरस्कार देते.वेब जर्नालिझमसाठी देखील सरकारने पुरस्कार द्यावेत ही मागणी सर्वप्रथम परिषदेने केली होती.ती दोन वर्षापुर्वी मान्य केली असून राज्य सरकार आता ऑनलाईन पत्रासाठीही 51 हजारांचा पुरस्कार दरवर्षी देऊ लागले आहे.

16) मराठी पत्रकार परिषदेने 25 एप्रिल 2016 रोजी केलेल्या आंदोलनामुळे सरकारने 113 नव्या वृत्तपत्रांचा जाहिरात यादीत समावेश केला तर 68 वृत्तपत्रांच्या जाहिरात दरात वाढ केली.परिषदेने जाहिरात दर वाढीच्या मागणीसाठी राज्यातील डीआयओ कार्यालयांसमोर निदर्शने केली होती.जाहिरात दर वाढीचा निर्णय सरकारने 18 जून 2016 रोजी घेतला ( .( शासन निर्णय ः पियूबी-2016/प्र.क्र.57/34 दिनांक 18 जून 2016 )

17)सरकार राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या जागेवर महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना 2 ऑक्टोबर 2016 पासून सुरू करीत असून या योजनेत अधिस्वीकृतीधारक पत्रकारांचा समावेश केला गेला आहे.त्यामुळे दोन लाखांपर्यतचे सर्व उपचार आता पत्रकारांना मोफत मिळणार आहेत.मराठी पत्रकार परिषदेच्या पाठपुराव्यामुळेच हे शक्य झाले आहे. ( जीआर.क्रमांक ः रागांयो-2016/प्र.क्र.64 /आरोग्य -6  दिनांक 8 जुलै 2016 )  मात्र या योजनेत अधिस्वीकृती नसलेल्या पत्रकारांनाही लाभ मिळाला पाहिजे अशी परिषदेची मागणी आहे.अधिस्वीकृती पत्रिका हा काही पत्रकारितेचा पासपोर्ट नाही,अधिस्वीकृती पत्रिकेचा जास्त बाऊ कऱण्याची गरज नाही असे परिषदेला वाटते.

18) सीमा भागातील पत्रकारांना सरकार जाहिराती देते मात्र अधिस्वीकृती देत नव्हते.हा विषय आम्ही अधिस्वीकृती समितीच्या बैठकीत प्रथम उपस्थित केला.त्यानंतर महासंचालकांशी भेट घेऊन या मुद्यावर त्यांच्याशी चर्चा केली.त्यानंतर आता एक समिती नेमली गेली असून ही समिती माहिती घेऊन अधिस्वीकृती द्यायची की नाही यावर शिफारस करणार आहे.(हा विषय प्रथम मराठी पत्रकार परिषदेने उपस्थित केल्याने सीमा भागातील पत्रकारांना अधिस्वीकृती मिळाली तर त्याचं श्रेय परिषदेलाच मिळेल या भितीने त्याना हे कार्ड मिळणार नाही,यासाठी जाणीवपूर्वक काही झारीतील शुक्राचार्य कालापव्यय करीत आहेत.) 

19)नगरपालिका निवडणुकांच्या वेळेस अनेक ठिकाणी पत्रकारांना मतमोजणी कक्षात प्रवेश नाकारला गेला.त्याबद्दल अनेकांनी परिषदेकडे संपर्क साधून तक्रार केली.या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगाशी संपर्क साधून मतमोजणी कक्षात पत्रकारांना बसू देण्यासंबंधात स्पष्ट सूचना देण्याची विनंती केली.निवडणूक आयोगाच्या नियमावलीत याबाबतचे स्पष्ट नियम आहेत.नंतर बहुतेक ठिकाणी पत्रकारांना काहीही अडचण आली नाही.

२०) छोटया वृत्तपत्रांचा आवाज बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.त्यासाठी व्दैवार्षिक पडताळणी अधिक जटील आणि क्लीष्ट करण्याचा प्रयत्न परिषदेने हाणून पाडला आहे.अर्थात अद्यापही हा विषय पूर्णपणे संपलेला नसला तरी परिषद हा विषय घेऊन लढणार आहे.जाहिरात दर वाढ देखील परिषदेची मागणी आहे.या विरोधात शेगाव अधिवेशनात ठोस निर्णय घेतला जाणार आहे.

20) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एस.टी.च्या साध्या गाडीतून आणि एशियाडमधून मोफत प्रवासाची सवलत दिली जाते.मात्र शिवशाही आल्यानंतर बहुतेक मार्गावरील एशियाड बंदच केल्या गेल्या.त्यामुळं पत्रकारांना सवलतीचा लाभ घेणे अवघड झाले.ही अडचण लक्षात घेऊन मराठी पत्रकार परिषदेच्या एका शिष्टमंडळाने 26 डिसेंबर 2017 रोजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेतली.त्यांना शिवशाही आणि शिवनेरीमधून पत्रकारांना मोफत प्रवासाची सवलत देण्याची विनंती केली.त्यांनी आश्‍वासन दिले.त्यानुसार 17 मे 2018 रोजी महाराष्ट्र राज्य एस.टी.महामंडळाच्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय घेऊन पत्रकारांना शिवशाही आणि शिवनेरीमधून मोफत प्रवासाची सवलत देण्याचे तत्वतः मान्य केले गेले.आता हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर जाईल तो मान्य होताच शिवशाही आणि शिवनेरीतून प्रवासाची सोय पत्रकारांना होईल.मराठी पत्रकार परिषदेचे हे यश आहे यात शंकाच नाही.

21)  महाराष्ट्र सरकारनं शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी सुरू केलेला आहे.त्याच धर्तीवर राज्यातील महापालिकांनी देखील असा निधी सुरू करून स्थानिक पातळीवर पत्रकारांना मदत करावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषद आणि स्थानिक जिल्हा संघांनी केल्यानंतर आणि त्याचा पाठपुरावा केल्यानंतर मुंबई.ठाणे,डोंबिवली,नवी मुंबई,अकोला,परभणी आदि ठिकाणी या संबंधीच्या तरतुदी बजेटमध्ये करण्यात आल्या.स्थानिक पातळीवर मदत मिळाली तर प्रत्येक वेळी पत्रकारांना मुंबईकडे आस लावून बसण्याची गरज भासणार नाही.

22 जोपर्यंत आपल्यावर वेळ येत नाही तोपर्यंत संघटनेची गरज आपल्याला वाटत नाही.वेळ आल्यावर संघटनेचं महत्व कळतं.ज्यांच्यावर हल्ले झाले असे अनेकजण अगोदर संघटनेपासून फटकून राहात असत मात्र हल्ल्यात सार्‍यांनी हात झटकले आणि परिषदेने मदत केली म्हणून अशी अनेकजण जवळ आले.परिषदेने गरजू पत्रकारांना मदत देताना जिवाचे रान केलेले आहे.परिषदेचे स्वतःची उत्पन्नाची अशी कोणतीही साधनं नसताना परिषद,जिल्हा संघाच्या मदतीने किंवा शासकीय योजनांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात 27 गरजू पत्रकारांना किंवा त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना जवळपास 30 लाख रूपयांची मदत केलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने शिवाजी क्षीरसागर ( परभणी) कल्पक  हातवळणे ( नगर) स्व,अरूण  देशमुख (सातारा) संजय पिसाळ ( सातारा)  स्व.प्रकाश काटदरे यांचे कुटुंबिय (रायगड) शंकर साळुंके (बीड) जगन्नाथ पवार ( पुणे) नानासाहेब सुरवाडे ( निफाड ) रामदास वारूंगसे (इगतपुरी) अमोल जंगम ( म्हसळा) प्रसादराव देशमुख जिंतूर ) बीडचे भास्कर चोपडे आदिंचा समावेश करता येईल.यापुढे मराठी पत्रकार परिषदेचा सदस्य असलेल्या पत्रकारालाच आर्थिक मदत करण्याचे परिषदेचे धोरण आहे.त्यासाठी कायम स्वरूपी तरतूद करण्याच आमचा प्रयत्न आहे.त्याबाबतचा निर्णयही शेगाव अधिवेशनात घेतला जाणार आहे.

 एस.एम.देशमुख

 विशेष सूचना 

(वरील सर्व प्रश्‍न परिषदेचा पाठपुरावा आणि परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच सुटले आहेत.तरीही या कामाचं श्रेय अन्य कोणी व्यक्ती किंवा संघटनेला घ्यायचे असेल तर परिषदेची  त्याला हरकत नाही.कारण परिषद श्रेयासाठी काम करीत नाही तर पत्रकारांचे सारे प्रश्‍न सुटले पाहिजेत याच एका तळमळीतून काम करीत असते.)

 






LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here