आम्ही.. आमच्यासाठी
आरोग्य शिबिरं यशस्वी करून दाखवा,एस.एम.देशमुख यांचं आवाहन
मित्रांनो,
पत्रकारांचे जीवन दगदगीचे, धावपळीचे असते.. जगाच्या उठाठेवी करताना आपले कुटुंबांकडे तर दुर्लक्ष होतेच त्याचबरोबर स्वतःच्या तब्येतीचीही आपण अक्षम्य हेळसांड करीत असतो .. तरूण असतो तेव्हा काही जाणवत नाही पण वय उताराकडे लागले की, तब्येतीकडे केलेल्या दुर्लक्षाचा पश्चाताप व्हायला लागतो.. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते..
पश्चात्तापाची वेळ कोणत्याही पत्रकारावर येऊ नये म्हणून गेली सहा वर्षे ३ डिसेंबर हा मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन आपण राज्यात पत्रकार आरोग्य तपासणी दिन म्हणून साजरा करतो.. या दिवशी स्थानिक पातळीवर डॉक्टरांचे सहकार्य घेऊन आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले जाते.. राज्यभर या आरोग्य शिबिरांना चांगला प्रतिसाद मिळतो..
यंदा देखील राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांनी ३ डिसेंबर रोजी पत्रकार आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने करण्यात येत आहे.. अनेक तालुके, जिल्ह्यात शिबिराची जय्यत तयारी सुरू असल्याच्या पोस्ट वाचण्यात आल्या.. ज्या ठिकाणी अद्याप नियोजन केले गेले नाही तेथे तातडीने नियोजन करून आरोग्य शिबिरं यशस्वी करून दाखवावीत.. आपण जगासाठी आयुष्यभर झिजत असतो.. थोडी काळजी आपण ही आपली करायला पाहिजे.. आम्ही, आमच्यासाठी हा परिषदेचा उपक्रम सर्व जिल्हा, तालुका संघांनी यशस्वी करून दाखवावा ही सर्वांना विनंती आहे..
एस.एम.देशमुख