आमदार-खासदारांसाठी अधिकार्‍यांना आता कराव्या लागणार उठाबश्या

0
1329

दोन बातम्या बघा.पहिली बातमी आहे लोकशाही दिनामध्ये ज्येष्ठ नागरिकाला बुटाने मारण्याची धमकी देणार्‍या उद्दाम अधिकार्‍याची.ही घटना पुण्यातली.पुणे महापालिकेच्या लोकशाही दिनाच्या वेळेस महापालिकेचे उपायुक्त मधुकांत गरड यांनी एका ज्येष्ठ नागरिकाला बुटानं मारण्याची धमकी दिली.याच्या बातम्या प्रसिध्द झाल्यानंतरही पुण्यातील एकाही लोकप्रतिनिधीने त्याची दखल घेउन अधिकार्‍यांनी आम जनतेशी सौजन्यानं आणि आदरानं वागावं असं आवाहन केलं नाही किंवा तशी तंबी दिली नाही.

दुसरी बातमी लोकप्रतिनिधीं आपल्या हक्कासाठी किती जागरूक असतात त्याची.लोकप्रतिनिधी ( विधानसभा,विधानपरिषद सदस्य किंवा खासदार ) जेव्हा एखादया अधिकार्‍याच्या केबिनमध्ये जातील तेव्हा संबंधित अधिकार्‍यानं खुर्चीवरून उठून त्याचं स्वागत केलं पाहिजे,तसेच ते परत जातानाही त्यांचा सन्मान राखण्यासाठी,आणि सौजन्याचा भाग म्हणून( Honour and Courtesy) खुर्चीतून उठून उभे राहून त्याना निरोप दिला पाहिजे .तसं पत्रकच आता सरकारनं काढलं असून असं जे अधिकारी करणार नाहीत त्यांच्यावरकडक कारवाई करण्यात येईल अशी तंबी सरकारनं दिली आहे.मध्यंतरी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी आमदारांना पोलिसांनी ते दिसताच सॅल्युट मारावा अशी मागणी केली होती.त्यांची ती मागणी मान्य झाली की नाही माहिती नाही पण आता वरिष्ठ अधिकार्‍यांसह सर्वानाच आमदार,खासदार आले की उठाबश्या काढाव्या लागणार आहेत.
आमदारांना आपला सन्मान राखला जावा असं वाटणं स्वाभाविक असलं तरी सरकार ज्यांच्या जिवावर चालते त्या आम आदमीच्या सन्मानाचं काय? त्याची काळजी कोणीच करीत नाही.एखादा उपायुक्त दर्जाचा अधिकारी ज्येष्ठ नागरिकांनी बुटानं मारण्याची भाषा बोलत असेल आणि तरीही त्यावर कारवाई होत नसेल तर ही लोकशाही फक्त लोकप्रतिनिधींसाठीच आहे असं म्हणणं भाग पडतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here