आभार कोणत्या शब्दात मानू ?

0
957

९० आमदारांची पत्रे मिळाली ,

आभार कोणत्या शब्दात मानू ?
 
पत्रकार पेन्शन आणि पत्रकार संरक्षण कायद्याच्या मागणीस पाठिंबा देणारी पत्रे आमदारांकडून घेण्याची विनंती राज्यातील पत्रकार मित्रांना आम्ही केली होती.सुरूवातील शंका अशी होती की,पंचवीस आमदारांची तरी पत्रं मिळतील की नाही.मात्र पहिल्या दोन दिवसांतच 35 आमदारांची पत्रं मिळाली .नंतर हा आकडा दिवसेंदिवस वाढत गेला.आज आपल्याकडं 90 आमदारांची पत्रं उपलब्ध झाली आहेत.अपेक्षेपेक्षा किती तरी पटीनं ही पत्रं मिळाल्यानं मी अत्यंत आनंदी आहे. राज्याच्या इतिहासात अशा पध्दतीचा प्रयत्न पहिल्यादाच झाला आहे हे देखील आपल्या या उपक्रमाचं वैशिष्टये आहे.या अनोख्या प्रयोगाची नक्कीच इतिहासात नोंद होणार आहे.
आमदारांची ही पत्रे मिळवून तुम्ही काय साधणार आहात ? असा प्रश्‍न काहीं मित्रांनी मला विचारला. त्या मागचं कारणही सांगतो.मागचं सरकार सत्तेवर असताना ते सांगायचे आमचा तुमच्या मागणीस पाठिबा आहे पण विरोधकांचा तुमच्या मागण्यांना विरोध आहे.कालचे विरोधक आज सत्ताधारी झालेत पण भाषा मात्र तीच आहे.म्हणजे आमची ना नाही पण तुम्ही विरोधकांचं तेव्हडं बघा असं सांगितलं जातंय. अशा स्थितीत सर्व पक्षीय आमदारांकडून लेखी पत्रं घेऊन त्यांची भूमिका जाणून घेणं आणि वारंवार केली जाणारी टोलवाटोलवी बंद कऱणं हे एक यामागंच कारण होतं.पाठिंब्याची पत्रं देणार्‍यांमध्ये सरकारमधील काही मंत्री आहेत,पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत,माजी मंत्री आहेत,विरोधी पक्ष नेते आणि गट नेते आहेत आणि आमदारही आहेत.90 आमदार एखादया मागणीला पाठिंबा देतात ही बाब नक्कीच दुर्लक्ष कऱण्यासारखी नाही.त्याचा दखल सरकारला घ्यावीच लागेल.समजा सरकारनं दखल घेतली नाही तर किमान ही पत्रं आपल्याला कोर्टात नक्कीच उपयोगी ठरणार आहेत.त्यामुळं आपल्या चळवळीसाठी ही पत्रं मैलाचा दगड ठरणार यात शंका नाही .
राज्याच्या वेगवेगळ्या भागातील आमदारांची ही पत्रं मिळविणं वाटतं तेवढं सोपं काम नव्हतं.त्यासाठी पाठपुरावा करावा लागणार होता.राज्यातील माझ्या जिगरबाज पत्रकार मित्रांनी हे आव्हान समजून पत्रं मिळविली ,त्यासाठी चकरा मारल्या,पायपीट केली . या बद्दल सर्व पत्रकार मित्रांचे कोणत्या शब्दात आभार व्यक्त करावेत ते मला समजत नाही.आपण दाखविलेली जिद्द,एकजूट यामुळंच हे शक्य झालं आहे याची नम्र जाणीव मला आहे.
एखादा प्रश्‍न मार्गी लागला की,त्याचं श्रेय लाटण्यासाठी ज्यांना प्रश्‍न काय होता हे ही माहिती नसते अशी मंडळीही पुढे येते आणि ‘माझ्यामुळंच हे शक्य झाल्याच्या’ आरोळ्या ठोकायला लागते.गेल्या काही दिवसांत हे ठळकपणे दिसून आलंय.ज्याला स्वतःची टिमकी वाजवून घ्यायचीय त्यांना घेऊ द्या पण मी नम्रपणे सांगेल ,आपला लढा सातत्यानं ,न थकता पुढं नेत राहिलेल्या राज्यातील तमाम पत्रकारांचं हे श्रेय आहे.आपण जी चिकाटी दाखविली,आपण प्रश्‍नाबद्दल जी तळमळ दाखविली त्याचंच हे फळ आहे असं मला वाटतं.पुण्या-मुंबईत बसून एखादी सूचना कऱणं सोपं असतं पण प्रत्यक्ष फिल्डवर काम करणं किती अवघड,जिकरीचं आहे याची मला जाणीव आहे.असं असतानाही आपण जिद्दीनं ही लढाई लढता आहात.आपण सार्‍यांनी मिळविलेली शंभरच्या आसपास पत्रं हे आपल्या जिद्दीच पतिक आहे.आपणा सर्वांना मी नम्रपणे सॅल्युट करतो.पेन्शन आणि कायद्याची मागणी मान्य होईस्तोवर हीच जिद्द आपणास कायम ठेवायची आहे.
आपल्या मागणीस पाठिंबा देणार्‍या आमदारांनाही मनापासून धन्यवाद.
तुमचा
एस.एम.
 
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here