आता श्रेयासाठी साठमारी…
पन्नास वर्षे वय आणि वीस वर्षांचा पत्रकारितेतील अनुभव असणार्यांना ज्येष्ठ पत्रकार म्हणून अधिस्वीकृती मिळावी यासाठी गेली पाच-सहा वर्षे मराठी पत्रकार परिषद पाठपुरावा करीत आहे.2013 मध्ये नागपूर अधिवेशनात तत्कालिन मुख्यमंत्री ,माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री तसेच माहिती संचालक श्रध्दा बेलसरे यांची भेट घेऊन या मागणीचं निवेदन आम्ही त्यांना सादर केलेलं होतं.त्यानंतरही परिषदेचा पाठपुरावा सुरू होता.अधिस्वीकृती समितीची बैठक पुण्यात झाली त्यावेळी समितीने एकमताने या संबंधीचा ठराव मंजूर केला.मात्र ही मुळ मागणी परिषदेची आहे आणि लगेच या ठरावाची अंमलबजावणी केली गेली तर त्याचं सारं श्रेय परिषदेला मिळेल म्हणून अधिस्वीकृतीच्या ठरावाची अंमलबजाव
णी होणार नाही याची काळजी घेतली जात होती.त्यामुळं आठ-दहा दिवसांपुर्वीच एक पोस्ट टाकली होती.’जीआरला आडवे येणारे झारीतील शुक्राचार्य कोण ‘?असा सवाल त्यामध्ये केला होता.ही पोस्ट अनेकांना झोंबली.त्यानंतर हालचालींना सुरूवात झाली.27 तारखेला ठाण्यात झालेल्या बैठकीतही सर्वप्रथम मी हा मुद्दा उपस्थित करून “झारीतील शुक्राचार्याचे नाव कळू द्या” अशी मागणी केली होती.जीआर कधी निघणार ? असा सवाल सदस्य सचिवांना केला होता.त्यांनी अध्यक्षांकडं बोट दाखवलं आणि अध्यक्षांनी” पाठपुरावा सुरू आहे” असं उत्तर दिलं.त्यानंतर काल हा जीआर निघाला.त्यानंतर श्रेयासाठी धावपळ सुरू झाली. जीआर ज्यांच्या हाती पडला त्यांनी तो आमच्यामुळंच निघाला म्हणत पाठ थोपटून घ्यायला सुरूवात केली.लढाई सुरू असताना कुठेच नसलेले श्रेय घेण्यासाठी बरोबर पुढं येतात हा इतिहास आहे..उद्या पेन्शन असेल,कायदा असेल, टोलमाफी असेल किंवा पत्रकारासांठी ज्या ज्या योजना सरकरा जाहीर करील त्याचं श्रेय घ्यायला अनेकजण पुढं येणार आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही.ज्यांनी एकच विषय वीस वीस वर्षे लाऊन धरला त्यांच्यामुळं काहीच झालेलं नाही आणि जे काल सक्रीय झाले त्याच्यामुळंच सारं घडतंय असं कुणी भासवत असेल तर आमचा त्याला विरोध नाही.श्रेय ज्याला घ्यायचंय त्यांनी घ्यावं आम्हाला पत्रकारांचे प्रश्न सुटण्यात रस आहे.श्रेयात नाही.कोण प्रामाणिकपणे प्रयत्न करतंय आणि कोण सत्तेच्या कच्छपी लागुन चमकोगिरी करतंय हे पत्रकारांना नक्कीच ठाऊक आहे.–