मुंबई : बनावट ओळखपत्राच्या आधारे हॉटेल चालकांकडून खंडणी उकळणा-या तोतया पत्रकारांना खार पोलिसांनी अटक केली. आठ जणांच्या या टोळीत एका महिलेचा देखील समावेश असून, त्यांनी कुलाब्यापासून दहिसरपर्यंत अनेक हॉटेलचालकांना तोतया पत्रकारांनी गंडा घातल्याचे पोलिसांनी सांगितले.
साप्ताहिक अथवा लोकल न्यूज वाहिनीचे ओळखपत्र तयार करून ही टोळी वर्षभरापासून शहरात सक्रिय आहे. खारमधील एका हॉटेलचालकाकडे या टोळीने ५० हजारांची खंडणी मागितली होती. त्याने ही रक्कम देण्यास नकार देताच या टोळीने त्याला एका निर्जन ठिकाणी नेऊन धमकावले होते. याबाबत त्याने खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी सापळा रचून आठ जणांना अटक केली. मात्र या टोळीचा मुख्य म्होरक्या सागर सिंह हा अद्याप फरार आहे. या टोळीने अनेक बारचालकांना लोकल पोलीस ठाणे आणि समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांच्या कारवाईची धमकी देत लाखोंना गंडा घातला.(प्रतिनिधी)