आज जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन. 17 डिसेंबर 1986 रोजी कंबोडियाचया बोगोटा इथे ‘एल स्पेक्टाडाॅर’ वर्तमानपत्राच्या गुलेर्मो कॅनो इसाझा या पत्रकाराची तयांच्या कार्यालयासमोरच ड्रग माफियांनी क्रूर हत्या केली. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत इसाझा अंमली पदार्थांच्या व्यापारा विरोधात लिहीत राहिला पण त्याने घाबरून तडजोड केली नाही.
तर याच इसाझाच्या नावे युनेस्कोकडून 1997 पासून वृत्तपत्रस्वातंत्र्या साठी, ते टिकवण्यासाठी अद्वितीय योगदान देणारया पत्रकारासाठी एक पुरस्कार दिला जातो.
याशिवाय 3 मे हा दिवस जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करताना जगातील सर्व देशांच्या सरकारांना वृत्तपत्र स्वातंत्र्याचं महत्व कायम लक्षात ठेवावं आणि तसं वागावं, याची आठवण यानिमित्ताने करून दिली जाते.
याशिवाय दर वर्षी या दिवशी वेगळ्या देशात वृत्तपत्र स्वातंत्र्य विषयक थीमवर परिषद भरवली जाते. यावर्षी ती घाना मधे होते आहे. तिची थीम आहे: ” सत्तेवर अंकुश ठेवण्यासाठी माध्यमं, कायदे आणि कायदेशीर नियम !”
आज या सगळ्याची आठवण येते आहे, कारण आपल्या देशातील माध्यमांची परिस्थिती! पत्रकारांऐवजी त्यांना हवेत “आशय वाहक” आणि संपादकां ऐवजी हवेत “आशय व्यवस्थापक”,
सर्वच माध्यमांवर नियंत्रण आणि समविचारी नियंत्रक !
पण चित्र मोठे विदारक ! तिकडे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन साजरा होताना आपल्याकडे आक्रसत चाललेली माध्यमं मरणासन्न होताहेत, खप कमी होताहेत, वाहिन्यांची दर्शक संख्या आणि विश्वासार्हता कमी होतेय ! अंकुश कोणाचा कोणावर आहे ? लोकशाहीचे चारहि स्तंभ एकमेकांशी भांडताहेत, आरोप प्रत्यारोप करताहेत, संशय व्यक्त करताहेत, जनसामान्य अवाक् , किंकर्तव्यमूढ आणि संभ्रमित असहाय अवस्थेत ! अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकवायचं तर कुठे, कुणी आणि कसं? हे मोठे प्रश्न माध्यम क्षेत्रात येऊ इच्छिणारया तरूण पिढी पुढेच नाहीत तर अनेक वर्षं काम करणारयांनाही पडले आहेत. सोशल मिडीयाद्वारे अजून तरी मुक्तपणे व्यक्त होता येतंय! चला तर मग आजचा दिवस तरी वृत्तपत्र स्वातंत्र्याचा जयघोष करायला काय हरकत आहे
समीरण वाळवेकर यांच्या वॉलवरून
?