रायगड जिल्हयातील प्रत्येक गाव वैशिष्टयपूर्ण आहे.प्रत्येक गावाचं ऐतिहासिक मह्त्व देखील आहे.आकाशाला गवसणी घालणारी अनेक उतुंग माणसं रायगडच्या छोटया-छोटया गावांनीच देशाला दिली.अलिबाग जवळच्या आक्षीची ख्याती आहे ती तेथील शिलालेखामुळं.मराठीतील पहिला शिलालेख या आक्षी गावात आहेअलिबागहून रेवदंडयाकडे जाताना खाडीचा पुल ओलांडला की उजव्या बाजुला आक्षी गाव लागतं.आक्षी गावात प्रवेश करतानाच डाव्या बाजुला उन,वारा,वादळ आणि पावसाचे तडाखे खात वर्षानुवर्षे हा ऐतिहासिक ठेवा धुळखात पडून आहे.आपलं पुरातत्व खातं एवढं कर्मदरिद्री आहे की,या विभागाला या दगडाचं मोल अजूनही कळलेलं नाही.शके 934 म्हमजे इस1012 मध्ये हा शिलालेख कोरला गेल्याचा उल्लेख त्यावर आहे.म्हमजे एक हजार वर्षांपुर्वीचा हा ऐतिहासिक ठेवा .आक्षी येथे खोदकाम करताना शिलालेख सापडला.मग कोणीतरी उचलून तो रस्त्याच्या कडेला ठेवला.बेवारस अवस्थेत..
..पश्चिम समुद्रपती श्री कोकण चक्रवर्ती यांचे महाप्रधान भरजू सेणुई यांनी हा शिलालेख कोरून घेतला.शिलालेखावर देवनागरीतल्या नऊ ओळी आहेत.त्या लिपीवर संस्कृतचा प्रभाव जाणवतो.अनेकांना असं वाटतं की,कर्नाटकातील श्रवण बेळगोळ येथील बाहुबली गोमटेश्वराच्या मूर्तीखाली लिहिलेला शिलालेख हा मराठीतील पहिला शिलालेख असावा.इस 1116 ते 17 या कालखंडातला तो शिलालेख असल्याचं सांगितलं जातं.तो तमिळ,कन्नड आणि मराठी भाषेतला आहे.आक्षीचा शिलालेख त्यापुर्वी जवळपास शंभर वर्षे अगोदरचा .मात्र या शिलालेखाची उपेक्षा झाल्यानं त्याची रायगडच्या बाहेर फारशी माहितीच झाली नाही.हजार वर्षांपुर्वीच्या या ऐतिहासिक ठेण्याची उपेक्षा पाहून अनेकांना संताप यायचा.पण या संतापाची तरी दखल घेणार कोण होते? .अखेर मराठी भाषा दिनी रायगड जिल्हा परिषदेेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी आक्षीला जाऊन शिलालेख पाहिला.तो जतन करण्याची ग्वाही दिली.आनंदाची गोष्ट अशी की,यंदाच्या अर्थसंंकल्पात शिलालेखाचं जतन करण्यासाठी तीन लाखांची तरतूद देखील केली.डॉ.किरण पाटील यांना माहिती होतं की,पुरातत्व विभाग खोडा घालू शकतो.त्यामुळे त्यांनी पुरातत्व विभागाचे अधिकारी राजेंद्र यादव यांच्याशी संपर्क साधला आणि शिलालेख जतन करण्याची कल्पना मांडली.सुदैवानं त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं आता हा शिलालेख आपल्याला सुस्थितीत पहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.डॉ.किरण पाटील याना त्याबद्दल धन्यवाद द्यावे लागतील.
मी अलिबागला असताना किती तरी वेळा शिलालेखाला भेट दिली.त्यावर बातम्या,स्टोरीज केल्या,कोमसापचं साहित्य संमेलन झालं तेव्हाही या शिलालेखाचं जतन करण्यासंबंधीचा आग्रह आम्ही धरला.मात्र काहीच झालं नाही.कोणाला याचं महत्वचं कळलं नाही.मराठी भाषेचं राजकारण करणार्यांना ही त्याची दखल घ्यावी असं कधी वाटलं नाही.दुदैव आहे मराठी भाषेचं दुसरं काय ? खैर उशिरा का होईना शिलालेखाचं भाग्य बदलतंय हे काही कमी नाही.. (छायाचित्र गुगलच्या सौजन्यानं )
..