कोकणातून पश्‍चिम महाराष्ट्रात यायचं असेल तर सहयाद्रीच्या रांगा पार करूनच देशावर यावं लागतं.त्यासाठी सध्या नऊ मार्ग उपलब्ध आहेत.ते असे

1) पुण्याहून कोकणात किंवा मुंबईला जाणारा बोरघाट

2) पुणे-माणगाव ताम्हिणी घाट

3) भोर-महाड वरंध घाट

4) महाबळेश्‍वर-महाड रणतोंडी घाट

5) कराड-चिपळूण कुंभोर्ली घाट 

6) रत्नागिरी – कोल्हापूर आंबाघाट

7) महाबळेश्‍वर -पोलादपूर आंबेनळी घाट

8) कोल्हपूर – सावंतवाडी आंबोली घाट 

9) कोल्हापूर -गोवा फोंडाघाट 

वरील पैकी पोलादपूरला महाबळेश्‍वरशी जोडणारा ( म्हणजे रायगड जिल्हयाला सातारा जिल्हयाशी जोडणारा )घाट म्हणजे आंबेनळी घाट.पोलादपूरपासून अगदी दोन किलो मिटर अंतरावर हा घाट सुरू होतो.इंग्रजांना थंड हवेच्या ठिकाणी म्हणजे महाबळेश्‍वरला जाता यावं यासाठी 1871 मध्ये या रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली.1876 मध्ये रस्त्याचं बांधकाम पूर्ण झालं.आज राज्यरस्ता क्रमांक 72 म्हणून हा मार्ग ओळखला जातो. पोलादपूर ते महाबळेश्‍वर हे अंतर चाळीस किलो मिटरचे असून हा संपूर्ण रस्ता घाट रस्ता आहे.एका बाजुला उंचच उंच डोंगर आणि दुसर्‍या बाजुला खोलच खोल दर्‍या, वेडीवाकडी आणि अगदी जवळ जवळ वळणं,असलेला हा घाट धोकादायक म्हणूनच ओळखला जातो.निसर्गाची विविध आणि नयन मनोहरी रूपं आपल्याला या घाटात अनुभवता येतात.उंच डोंगरांवरून कोसळणारे पाण्याचे खळाळ,आणि त्यामुळं हिरव्यागार वातावरणात दिसणारे हे स्फटिकासारखे धबधबे हे सारं चित्र आपण कॅमेर्‍यात तर टिपत असतोच पण हा प्रवास कायमचा मनाच्या कप्प्यातही कायम घर करून राहतो.

साधारणतः जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत या मार्गावरून प्रवास करणं हा अनोखा आनंद देणारा प्रवास असतो.मात्र  पावसाळ्यात हा घाट कमालीची धोकादायक बनलेला असतो.पावसाळ्यात धुक्याची झालर संपूर्ण घाटभर  पसरलेली असते.त्यामुळं सायंकाळी तर अगदी पाच फुटावरचंही काही दिसत नाही.अगदी दिवसा देखील सावधपणेच गाड्या चालविणे आवश्यक असते.शिवाय दरडी कोसळण्याचा कायमचा धोका या रस्त्यावर असतो.दरडी कोसळल्यामुळं यंदाही किमान दोन वेळा हा पोलादपूर-महाबळेश्‍वर रस्ता  बंद पडला होता.महाबळेश्‍वरला कोकणाशी जोडणारा हा एकमेव रस्ता असल्यानं कोकणातील मंडळी तर याच मार्गाचा उपयोग करीत असते त्याचबरोबर मुंबईकडून येणार्‍या बसेसही याच मार्गानं महाबळेश्‍वरला जात असल्यानं हा रस्ता कायम गजबजलेला असतो.त्यामानाने रस्त्याची निगा मात्र राखली जात नाही.आजही हा रस्ता अनेक ठिकाणी फुटलेला आहे.साईड पट्ट्या मारलेल्या नाहीत आणि जेथे दरडी कोसळण्याचा धोका असतो तेथेही प्रतिबंधात्मक उपाययोजना केली गेलेली नाही.त्यामुळं येथे सात्तत्यानं अपघात होत असतात.दर्‍यांच्या बाजुनं लावलेले कठडे अनेक ठिकाणी तुटलेले असल्यानं जर अपघात झाला तर कपाळमोक्ष ठरलेला असतो.विशेषतः घाटावरून जे प्रवासी प्रथमच कोकणात जात असतात त्यांना वळणांचा अंदाज येत नाही.त्यातूनही अपघात होतात.

आज एका खासगी बसला ज्या दाभोळ टोक येथे अपघात झाला तेथे यापुर्वी देखील अपघात झालेले आहेत.आजचा अपघात नेमका कश्यामुळं झाला त्याचं कारण मात्र समजू शकलेले नाही.देशावरून खाली कोकणात पर्यटनासाठी जाणार्‍या पर्यटकांची संख्या अलिकडं लक्षणीय वाढलेली आहे.मराठवाडा,विदर्भातून येणार्‍या पर्यटकांपैकी बहुतेक पर्यटक समुद्राबद्दल जसे अनभिज्ञ असतात तव्दतच ते कोकणातील घाट आणि रस्ते याबद्दल देखील अनभिज्ञ असतात.त्यामुळं कोकणात जात असताना या सार्‍या गोष्टीची माहिती घेऊनच जाणं अधिक श्रेयस्कर होईल.पर्यटकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे.

आबंनळी घाटातील अपघात टाळण्यासाठी काय करता येईल ?
1) रस्ता रूंद करावा लागेल
2) रस्ता दुरूस्त करावा लागेल
3) धोकादायक वळणं काढावी लागतील
4) जवळ जवळ असलेली वळणंही हटवावी लागलती.
5) सुरक्षा कठडे लावावे लागतील.
6) या भागात सतत पाऊस कोसळत असतो..राडारोडा रस्त्यावर वाहून येऊन रस्ता घसरडा होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल
7) साईट पट्ट्या आवश्यक
8) सूचना फलक आवश्यक
9) निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी अनेकदा वळणावरही वाहनं थांबतात त्यांना रोखावं लागेल
10) दरडी कोसळू नयेत यासाठी बारघाटाच्या धर्तीवर उपाययोजना कराव्या लागतील.

( एस।एम )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here