दिनांक 20 डिसेंबर.शहर मेरठ.एका वार्ताहराला एसएमएस येतो,’समाजकंटकांनी हिंसाचार सुरू केला आहे..मोठ्या प्रमाणावर जाळपोळ सुरूय’.स्वाभाविकपणे रिपोर्टर खुर्शिद अहमद घटनास्थळी पोहोचतो.समोर घडत असलेल्या घटनेचा व्हिडीओ तयार करू लागतो.एवढयात जमाव त्याच्या दिशेने येऊ लागतो. ‘मिडिया वाला है,ये मोदी का मिडिया है,हमारे बाते नही दिखाता’ असे म्हणत खुर्शीदवर रॉड आणि विटांनी हल्ले केले जातात.रिपोर्टर कशी तरी स्वतःची सुटका करून घेत तेथून जीव वाचवून पळून जातो.खुर्शीद हा ‘इटीव्ही भारत’साठी काम करतो.ही एक घटना..
रिपोर्टरवर हल्ला होण्याची ही देशातली पहिली घटना नाही.महाराष्ट्रात यंदा 26 वार्ताहरांवर असे हल्ले झालेत.देशभरताील अशा हल्ल्यांची संख्या 200 च्यावरती आहे.देशात 2014 ते 2019 या काळात 40 पत्रकारांच्या हत्त्या झाल्यात.त्यातील 21 हत्त्या पत्रकारितेच्या कारणांवरून झाल्यात.ज्यांच्यावर हल्ले होतात ते रिपोर्टर किंवा फोटोग्राफर असतात.मात्र ते ज्या माध्यम समुहासाठी काम करतात त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे संरक्षण वार्ताहरांना मिळत नाही.त्यामुळं दंगलीचे,नैसर्गिक आपत्तीचे,सीमेवरील तणावाचे वार्तांकन करणार्या वार्ताहरांसाठी माध्यम समुहांनी विम्याचं संरक्षण द्यावं अशी मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची मागणी आहे.
का होतात हे हल्ले..? यावर प्रत्येक जण वेगवेगळी कारणं देतोय.’गाव कनेक्शन’ या वेबसाईटनं याबाबतचा एक रिपोर्ट प्रसिध्द केलाय.त्यामध्ये वरिष्ठ पत्रकारांच्या प्रतिक्रिया दिल्या गेल्या आहेत.वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई म्हणतात, ‘हल्ले प्रामुख्यानं रिपोर्टर्सवरच होतात..याचं कारण स्टुडिओत बसून ज्या चर्चा होतात, केल्या जातात त्याचा राग रिपोर्टर्सवर निघतो. दुसरं कारण म्हणजे माध्यमांवर हल्ले केले की,त्याला प्रसिध्दी चांगली मिळते त्यामुळंही माध्यमांना टार्गेट केलं जातंय..
वरिष्ठ पत्रकार अजित अंजुम याचं वेगळं मतंय..ते म्हणतात,हल्ली मिडिया पक्षपाती झालाय.तो निष्पक्ष राहिला नाही.त्याचा फटका ऑन दी स्पॉट रिपोर्टिंग करणार्या वार्ताहरांना बसतो आहे.रिपोर्टरवर हल्ला होता कामा नये कारण माध्यमाची भूमिका ठरविण्याचा अधिकार त्याला नसतो.तो दिलेलं काम करीत असतो..अगर कोणाचा चॅनलवर राग असेल तर तो राग त्यांनी रिपोर्टरवर काढता कामा नये…सरकारच्या विरोधात मतप्रदर्शन करणार्यांना टुकडे टुकडे गँग घोषित करून त्यांच्या विरोधात मोहिम चालविली जाते.जेव्हा सरकाच्यावतीने काही मिडिया हे काम करतात तेव्हा जनतेचा राग संबंधित मिडियावर व्यक्त होतो.
ऑप इंडियाच्या संपादक नुपूर शर्मा म्हणतात,मिडिया आता तटस्थ राहिलेला नाही..विचाऱधारेनुसार तो विभागला गेलाय.त्याचा फटका फिल्डवर काम करणार्या रिपोर्टरला बसतो.नुपूर शर्मा म्हणतात,फिल्डवर काम करणाऱे स्ट्रिंजर हे माध्यमाचा पाठीचा कणा आहेत.मोठा धोका पत्करून ते बातमी पाठवतात,माझ्यामते 95 टक्के स्ट्रिंजर आपलं काम अत्यंत प्रामाणिकपणे करीत आहेत.खरे पत्रकार तेच..त्यांनी पाठविलेल्या बातमी मोड-तोड करण्याचं काम अँकर करतात.धोका पत्करून रिपोर्टरनं तयार केलेली स्टोरी जेव्हा टीव्हीवर दिसते तेव्हा ती मुळस्टोरीपेक्षा भलतीच वेगळी झालेली असते.त्याचा स्ट्रिंजरच्या मॉरलवर विपरित परिणाम होतो.संबंधित माध्यमांच्या विचारधारेत ती सत्य स्टोरी बसत नसेल तर ती उलटी-सुलटी करून दाखविली जाते..सत्य आणि स्टोरीतील वास्तव काय आहे याचा विचार न करता आपल्या धोरणानुसार स्टोरीचा कचरा केला जातो.लेफ्ट आणि राईट अशा दोन गटात मिडिया विभागला गेलाय.तटस्थ मिडियाचे आता दिवस संपले आहेत.त्या म्हणतात रवीशकुमार यांची विश्वासार्हता त्यांच्या दर्शकांसाठी शंभर टक्के आहे तर त्यांचे जे दर्शक नाहीत त्यांच्यासाठी ती तसी नाही .तेच अर्णव गोस्वामीच्या बाबतीत..त्यांच्या दर्शकांसाठी त्यांची विश्वासार्हता शंभर टक्के आहे मात्र जे डावे आहेत त्यांच्यादृष्टीने अर्णव गोस्वामीची तुलना मोदी मिडियात होते…या सर्व वादात सर्वात मोठा लूजर तो स्ट्रिंजर असतो जो फिल्डवर काम करतो..
जेएनयुच्या आंदोलनात अनेक रिपोर्टर्सना मारहाण,धक्काबुक्की झाली..जेएनयू आंदोलन कव्हर करणार्या एबीपी न्यूजच्या रिपोर्टर निवेदिता शांडिल्य सांगतात मला सर्वात वाईट अनुभव जेएनयूमध्ये आला..मी जेव्हा घटनास्थळावर पोहोचले तेव्हा आंदोलनककर्त्याचां समज असा झाला की,झी न्यूजवाली आली..त्यामुळं अनेक मुलं माझ्या दिशेनं धावू लागली.मात्र त्यातील काही जण मला ओळखत असल्याने त्यांनी इतरांना रोखले.मात्र आज तकच्या मुलीला या आंदोलनकारांची सामना करावा लागला.तीच्याशी अभद्र व्यवहार केला गेला.तिच्या खादयावर हात ठेऊन गो बॅक-गो बॅकच्या घोषणा दिल्या जात होत्या.निवेदिता ने फार महत्वाचा मुद्दा उपस्थित केला..ग्राऊंड वर आम्ही रिपोर्टरच चॅनलचे प्रतिनिधी असतो…त्यामुळं आम्हाला झळ पोहोचलविली तर त्याचा फटका थेट चॅनलला बसेल असं आंदोलनकर्त्यांना वाटत असतं.मात्र ते खरं नसतं..या शिवाय आंदोलनास प्रसिध्दी मिळत नसेल तर मिडियावाल्यांबरोबर अभद्र व्यवहार करायचा मग ते आंदोलन आपसूक लाईमलाईटमध्ये येत हा ट्रेंड घातक आहे..
गाव कनेक्शनचे फाऊंडर नीलेश मिसरा सांगतात की,पुर्वी एक लक्ष्मण रेषा होती..आंदोलनकारी आणि पोलीस देखील पत्रकारांना त्यांची डयुटी पार पाडताना त्रास होणार नाही याची काळजी दोन्ही बाजु घ्यायच्या..तुम्ही आपलं काम करता आहात याचा आदर दोन्ही बाजुंनी राखला जायचा..आता ती रेषा संपली आहे.आता रिपोर्टर दोन्ही बाजुचे शिकार होऊ शकतात..सध्या वार्ताहरांवर आंदोलनकर्ते आणि पोलीस अशा दोन्ही बाजुंनी कधीही हल्ले केले जाऊ शकतात.आपले कॅमेर तोडले जाऊ शकतात..पुर्वी कॅमेरा काढला तरी एक आद्रश्य लक्ष्मण रेषा तयार व्हायची..
पत्रकार एका विचारधारेचा वाहक असल्याचे सांगून आज पोलीस आणि जमावही पत्रकारांना टार्गेट करताना दिसत आहेत..मिडियाची विश्वासार्हता संपल्यामुळं जसं हे होतंय तसंच हिंसक जमावाला सुरक्षा व्यवस्थेची भितीच राहिली नाही हे देखील एक कारण असू शकते.जेएनयू आंदोलन असेल किंवा नागरी संशोधन कायद्याच्या विरोधात झालेल्या हिंसक आंदोलनाच्या घटना असतील दोन्ही वेळेस हिंसक जमावाने पत्रकारांवर जसे हल्ले केले तसेच पोलिसांच्या लाठ्यांचे प्रसादही पत्रकारांना मिळाले..विशेषतः उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात आंदोलनाचे रिपोर्टिंग करणार्या अनेक पत्रकारांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हेही दाखल केले.
(गाँव कनेक्शनच्या रिपोर्टचा स्वैर अनुवाद..)