12 सप्टेंबर : पेड न्यूज प्रकरणी अशोक चव्हाणांना दिल्ली हायकोर्टाने दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाने चव्हाणांना बजावलेली कारवाईची नोटीस चुकीची असल्याचं, दिल्ली हायकोर्टाने आपल्या निर्णयात म्हंटलं आहे.
2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पेड न्यूज छापून आणण्याचे आरोप अशोक चव्हाणांवर झाले होते. निवडणुकीचा खर्च अयोग्य पद्धतीने दाखवल्याबद्दल निवडणूक आयोगाने चव्हाणांना नोटीस बजावली होती. आयोगाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीला अशोक चव्हाण यांनी दिल्ली हायकोर्टात आव्हान दिलं होतं. या प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने आज (शुक्रवारी) अशोक चव्हाणांना दिलेली कारवाईची नोटीस चुकीची असल्याचे सांगत नोटीस रद्द केली आहे. त्यामुळे अशोक चव्हाणांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, ‘माझ्याविरोधात बिनबुडाचे आरोप करणार्या विरोधकांना या निर्णयातून चोख प्रत्युत्तर मिळाले असून अखेर सत्याचाच विजय झाला’ अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना दिली आहे.