तो दिवस मला आजही आठवतो.1991च्या ऑक्टोबरमधील 26 तारीख होती त्या दिवशी.वार होता शनिवार.रविवारी अग्रलेख लिहायचा नसल्यानं शनिवारी संपादकांसाठी काहीसा “निवांतवार” असतो.शुक्रवारी रात्री शहर आवृत्तीचं काम आटोपून नेहमी प्रमाणे मी पहाटे दोन अडीचला घरी गेलो .शनिवार असला तरी काहीजण भेटायला येणार असल्यानं शनिवारी सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास ऑफीसमध्ये आलो . माझ्या केबिन शेजारीच पीटीआय मशिन ठेवलेलं होतं.सहज नजर टाकली तेव्हा “मराठवाडा”कार अनंत भालेराव गेल्याची बीतमी येत होती.धक्का बसला.दुःखी झालो.कारण अनंत भालेराव हे मराठवाड्यातील तरूण पिढीतल्या पत्रकारांचे आदर्श होते.नंतरच्या काळात मराठवाड्यातील ज्या पत्रकारांनी राज्यभर जो नावलौकीक मिळविला त्यातील अनेक पत्रकार अण्णांच्या तालमीत तयार झालेले होते.अण्णांच्या हाताखाली काम करण्याची संधी मला मिळाली नसली तरी अण्णांना आम्ही सारेच गुरू मानत असू.त्यामुळं त्यांच्या निधनाची बातमी सर्व शिष्य परिवारावर आणि एकूणच मराठवाड्यावर डोंगर कोसळावा अशीच होती.काही क्षण स्तब्ध झालो.पण नंतर लगेच कर्तव्याची जाणीव झाली.रविवारच्या अंकाच्या तयारीला लागणे अनिवार्य होते .पुरेसा वेळ असल्यानं मजकुराची चिंता नव्हती.टेन्शन होतं ते अण्णांवर अग्रलेख लिहायचं.अण्णांवर मृत्यूलेख लिहायचं काम सोपं नव्हत.अण्णा आमच्या सर्वांच्या जवळचे.जवळच्या माणसावर लिहिणं आणखी कठीण.त्यामुळं तणावात होतो.अण्णा गेले तेव्हा लोकपत्रला कोणी संपादक नव्हते.संतोष महाजन हे व्यवस्थापनाशी काही मतभेद झाल्यानं लोकपत्र सोडून गेले होते.मी वृत्तसंपादक होतो.संपादकच नसल्यानं संपादकांची सारी कामं मलाच करावी लागायची.अग्रलेखही मीच लिहायचो.त्यामुळं अग्रलेख मलाच लिहावा लागणार याची जाणीव मला होतीच.तरीही हिमंत होत नव्हती. तेवढ्यात औरंगाबादहून लोकपत्रचे मुख्य संपादक कमल किशोर कदम यांचा फोन आला.मी अण्णांवर अग्रलेख लिहू शकेल की नाही अशी शंका त्यानाही असावी.अग्रलेखाचं काय करता ? असा सवाल त्यांनी केला.मी काय उत्तर देणार ? .म्हणालो “सर सांगा तुम्ही”.त्यावर क्षणभर विचार करीत ते म्हणाले,”असं करा,भुजंगवाडीकर सरांकडे जा आणि त्याच्याकडून अग्रलेख लिहून घ्या”.ओके म्हणालो,वाडीकरसरांच्या घरी गेलो.तीथंही सारं वातावरण अण्णांच्या निधनाच्या बातमीनं दुःखमय होतं.वाडीकरसरांना मी कमलबाबूंचा निरोप सागितलां.ते म्हणाले,”अण्णांच्या निधनाच्या बातमीनं माझी मनःस्थिती अशी आहे की,मी अग्रलेखच काय एक ओळही लिहू शकत नाही.पाहिजे तर उद्या वगैरे लेख लिहून देईल” त्यावेळी मोबाईल वगैरे नसल्यानं ऑफीसमध्ये आलो,पुन्हा कमलबाबूंना फोन केला.वाडीकरसर लिहित नाहीत असं सांगितलं.त्यावर मग त्यांनी दत्ता भगतसरांचं नाव सांगितलं.भगतसरांकडं गेलो.भगत सर म्हणाले,”मी अंत्ययात्रेसाठी औरंगाबादला निघालो आहे.मला आता अग्रलेख शक्य नाही”..हा निरोप परत मुख्य संपादकांना कळविला.त्यावर कमलबाबू हतबल होत म्हणाले,”लिहा मग आता तुम्हाला जसा जमेल तसा” .त्यामुळं मी आणखीनच तणावाखाली आलो.साधारणतः एक वाजता मी स्वतःला खोलीत कोंडून घेतलं.अग्रलेख विशेष संपादकीय म्हणून पहिल्याच पानावर छापायचा असल्यानं वेळेचं बंधन नव्हतं.किती तरी पानं लिहिली,फाडली.सुरूवातच जमत नव्हती.अखेर सूर गवसला आणि अग्रलेख पूर्ण झाला.. तेव्हा वाजले होते सायंकाळचे पाच.ऐरवी जेमतेम तासाभराचं काम असायचं अग्रलेख लिहायचं.त्या दिवशी चार तास लागले.अग्रलेख लिहून झाल्यावर मथळा दिला,” हे मृत्यो तुलाच अपवाद का नसावा” .एस.एम.जोशी गेले तेव्हा त्यांच्यावर मृत्यूलेख लिहिताना अण्णांनी हा मथळा वापरला होता.तोच मथळा देऊन मी अग्रलेख लिहिला दुसर्या दिवशी लोकपत्रच्या पहिल्या पानावर माझ्या नावासह हा अग्रलेख प्रसिध्द झाला..दुसर्या दिवशी रविवार असतानाही महाराष्ट्रातील बहुतेक दैनिकांनी पहिल्या पानावर अण्णांवर अग्रलेख लिहिले होते.आत्मस्तुतीचा दोष पत्करुनही मी सांगू इच्छितो की,त्या दिवशी माझा अण्णांवरचा मृत्यूलेख सर्वात सरस ठरला होता.मी तर माझ्या अग्रलेखावर खुष होतोच पण जिल्हयातलही अग्रलेखाचं सर्वत्र कौतूक झालं होतं.हे सारे खरे असले तरी सर्वात महत्वाचं असतं ते मालकांना काय वाटते ते.
सुदैवानं अग्रलेख वाचल्यावर सकाळी सकाळीच कमलबाबूंचा फोन आला.त्यांनी माझं अभिनंदन करीत मान्य केलं की,”मला वाटलं नव्हतं की तुम्ही एवढा चांगला अग्रलेख लिहू शकाल म्हणून”.कमलबाबू स्वतः लिहित नसले तरी ते चोखंदळ वाचक आहेत.राजकारणात असतानाही सकाळी घरी येणार्या बहुतेक वर्तमानपत्रांचे अग्रलेख ते नियमितपणे आणि बरकाइने वाचत.”महाराष्ट्र टाइम्स”मधील गोविंद तळवळकरांचे अग्रलेख त्यांना विशेष आवडायचे.लोकपत्रमध्ये गोविंदरावांच्या तोडीचा संपादक असावा (कदाचित माझ्यानंतर व्दा.भ.कर्णिक यांना संपादक म्हणून त्यासाठीच आणले गेले असावे.) आणि आपला अंकही महाराष्ट्र टाइम्ससारखाच निघाला पाहिजे असं त्यांना मनोमन वाटायचं.ते बोलूनही दाखवायचे.त्यामुळं अग्रलेखाबद्दलची कमलबाबूंचा प्रतिक्रिया केवळ एका मालकाची नव्हती तर जाणकार मुख्यसंपादक आणि चोखंदळ वाचकाची ती प्रतिक्रिया असल्यानं मी सुखावलो होतो. नांदेड हे शहर वाचक संस्कृती जपणारं.प्रत्येकाच्या घरी एक स्थानिक एक विभागीय आणि वृत्तपत्र येतेच येते. त्यामुळे दिवसभर अभिनंदनाचे अनेक फोन येत राहिले.वाडीकरसरांचाही फोन आला.भगतसरांनीही अभिनंदन केलं.नंतर आठ-दहा दिवसांत “अग्रलेख वाचून डोळ्यात पाणी आलं” असे अभिप्राय व्यक्त कऱणारे शंभरावर पत्रं आली.या घटनेला आता तेवीस -चोवीस वर्षे झालीत पण ही सारी पत्रं माझ्या कपाटात आणि हंदय्च्या कप्प्यात सुखरूप ठेवलेली आहेत.कधी वेळ असेल तर ती फाईल उघडून मी ती पत्रं वाचतही असतो त्यातून मिळणारा आनंद अवर्णनीय असतो..मला वाटतं अण्णांवरचा अग्रलेख वाचून कमलबाबूंनी नव्या संपादकांचा शोधही थांबविला असावा.ते तसं बोलले नाहीत पण त्यांनी मनोमन ठरविलेलं असावं की,मला संपादक करायचं.डिसेंबरची वीस वगैरे तारीख असावी.कमलबाबू आणि बाबूराव कदम यांनी मला आपल्या केबिनमध्ये बालावलं आणि सांगितलं,”देशमुख तुम्हाला एक जानेवारीपासून संपादक करायचं आहे “.मला हे सारं स्वाभाविकपणे अनपेक्षित होतं.संपादक होण्यासाठी माझी मानसिक तयारी देखील नव्हती.याची दोन कारणं होती.एक तर माझं वय तेव्हा 29-30 वर्षाचं होतं.तो काळ असा होता की,एवढ्या तरूण वयाचा संपादक स्वीकारण्याची कोणाची तयारी नसायची.संपादक म्हणजे किमान केस पांढरे झालेला,पोक्त आणि जाड भिंगाचा चष्मा लावलेला वगैरे अशी लोकांची कल्पना असायची.शिवाय मला आणखी अनुभव घ्यायचा होता,अभ्यास करायचा होता.दुसरं कारण असं होतं की,मी संपादक झालो आणि कोणत्याही कारणांनी व्यवस्थापनाशी बिनसलं तर मला अन्यत्र संपादक म्हणून कोण स्वीकारणार? एकदा संपादक झाल्यावर परतीचे दोरही कापले जाणार.म्हणजे एक तर संपादक व्हा किंवा घरी बसा अशी स्थिती येऊ शकते याची भिती वाटत होती. त्यामुळं निर्णय घेता येत नव्हता.मित्रांमध्येही दोन प्रवाह होते.”संधी आलीच आहे तर ती सोडू नकोस” असा काहींचा आग्रह होता तर “काही म्हणायचे धोका पत्करण्यात काही अर्थ नाही”.काय करावं समजत नव्हतं.चार दिवसांनी मला कमलबाबूंनी परत बोलावलं आणि काय निर्णय घेतलात ? म्हणून विचारणा केली. मी त्यांना माझी मनोवस्था,मनात निर्माण झालेलं द्वद्वं आणि वाटणारी भिती या सार्या गोष्टी विस्तारानं सांगितल्या.
.त्यावर कमलबाबू जे बोलले ते मी अजूनही विसरलो नाही.ते म्हणाले,”एस.एम.तुम्ही न पटण्याचं डोक्यातून काढून टाका तुम्ही लोकपत्रमध्येच रिटायर्ड व्हाल.” त्यांच्या या बोलण्यात दाभिकपणा नव्हता.ते मनापासून बोलत होते.”त्यावर मी ठीकय म्हटलं”.दुसर्या दिवशी बाबूराव कदम आले.त्यानी माझं अभिनंदन करून माझ्या पगारात पाचशेची वाढ करीत 1 तारखेपासून संपादक म्हणून माझं नाव अंकावर छापण्याची सूचना केली.अशा प्रकारे 1 जानेवारीला 1992 ला माझं नावं लोकपत्रच्या अंकावर संपादक म्हणून छापलं गेले .चुकत नसेल तर मी सांगू इच्छितो की,त्या काळात महाराष्ट्रातील सर्वात तरूण संपादक मीच असावा.नंचर मी संपादक म्हणून विविध दैनिकात कामं केली.पण कमलबाबूंनी माझ्यावर दाखविलेला विश्वास माझं आयुष्य आणि करिअर बदलून टाकणारा ठरला.अनेकाना वयाची साठी गाठल्यानंतरही संपादक होण्याचं भाग्य मिळत नाही.मी भाग्यवान असा की,वयाच्या तिसाव्या वर्षीच मी एका आठ पानी,आठवड्यातून तीन पुरवण्या असणार्या आणि सहा आवृत्या प्रसिध्द होणार्या दैनिकाचा संपादक झालो होतो.कमलबाबूंमुळंच मी संपादक झालो हे मान्य करताना मला कोणताही संकोच वाटत नाही.त्यांनी मला संधी दिली नसती तर माहिती नाही मी कधी संपादक झालो असतो ते.
संपादकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लोकपत्र एक चळवळ आहे अशा पध्दतीनं मी सामाजिक काम करीत राहिलो.लोकपत्रच्या माध्यमातून विविध सामाजिक,सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन केलं जायचं.लोकपत्रचा वर्धापन दिन 9 फेब्रुवारीला असायचा. तो आठवडा “लोकपत्र वर्धापन दिन सप्ताह” म्हणून साजरा केला जायचा.सर्व थरातील लोकांसाठी त्यावेळी वेगेवगेळे कार्यक्रम आयोजित केले जात असतं.शहरात लोकपत्रचं नाव विविध कारणांनी दुमदुमत असल्याचं पाहून कमलबाबू आनंदीत असायचे.ते बोलूनही दाखवायचे. अंकात अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग मी करीत राहायचो. लेखांपेक्षा बातम्यांवरच जोर असल्यानं अल्पावधीतच लोकपत्रचा खप नांदेड शहरात साडेआठ हजारच्या आसपास गेला होता.लोकमतला आम्ही बरंच मागं टाकल्यान लोकमतची मंडळी अस्वस्थ असायची.अंकावर स्वतः कमलबाबू बेहद खुष असायचे.ते अंकात काही बदल सुचवायचे . सूचनाही करायचे.आमचं ट्युनिंग चांगलं जमलं होतं.परंतू हे कमलबाबुंच्या जवळ असलेल्या अनेकांना खुपायचं नाही.ते माझ्या विरोधात कमलबाबुंचे कान भरण्याचा प्रयत्न करायचे.एका मथळ्यावरून असेच मालकांना भडकविण्याचा प्रयत्न झाला.”सद्दामने अमेरिकेपुढे गुडघे टेकले” असा मथळा एका बातमीला दिला होता.या मथळ्यात धर्माचा काही संबंध नाही.मात्र या मथळ्यामुळे विशिष्ठ धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याची तक्रार केली गेली.त्या दिवशी कमलबाबू अस्वस्थ झाल्याचं मला जाणवलं.परंतू मी देखील त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की,कोणाला काहीही वाटलं तरी माझ्या हेडिंगमध्ये काही चूक नाही.नंतर त्यांनी ते मान्यही केलं .अशीच कागाळी एका लेखाबद्दलही केली गेली.ब्राह्मण समाजावर टीका करणारा बी.व्ही.जोंधळे यांचा एक लेख छापला होता.त्यानंतर होळीवरच्या ब्राह्मण समाजाचं एक शिष्टमंडळ कमलबाबुंना भेटलं आणि त्यांनी लेखाबद्दल संताप व्यक्त केला.तेव्हा कमलबाबुनी त्यांच्यासमोरच मला फोन करून माझी बरीच कानउघडणी केली. “आमची मतं गमविता काय’? असा आरोपही त्यांनी माझ्यावर केला. लोक समोर असल्यानं मी शांतपणे सारं ऐकत राहिलो.खुलासा करायचा प्रयत्न केला नाही.पण मनातून मी देखील चिडलो होतो.कारण नसताना मालक आपणास बोलत आहेत हे मलाही आवडलेलं नव्हतं.त्यामुळे मी सायंकाळी कॉलेजमध्ये जाऊन कमलबाबुंना भेटलो आणि माझी नाराजी व्यक्त केली.”ज्यांच्यावर टीका झाली आहे त्यांनी त्याला उत्तर देणारा लेख द्यावा तो मी छापतो पण त्यांनी जी अंकाची जागो जागी जाळपोळ सुरू केलीय ती मला मान्य नाही असं मी स्पष्ट केलं.”.शिवाय शिष्टमंडळात जी मंडळी होती ती तुम्हाला कधीच मतं देणारी नाही,त्यामुळं आपण त्यांच्यासमोर मला असं छापणं योग्य नव्हतं असं मी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं.तेव्हा मनाचा मोठेपणा दाखवत त्यांनीही “मी आपणास असं बोलायला नको होतं हे मान्य केलं”.त्यांच्यातल्या एका दिलदार माणसाचं दर्शन मला तेव्हा झालं.पण मला वाटतं या दोन्ही घटना “आता परिस्थिती बदलत चाललीय याच्या निदर्शक होत्या”हे ही मला उमगले होते . नंतरच्या काळात अशा काही घटना घडल्या की,परिस्थिती कमलबाबूंच्याही हाती राहिली नसावी असं मला जाणवत होतं. पत्रकारितेसी संबंध नसलेली काही माणसं लोकपत्रमध्ये घुसल्यानंतर मग अनेक अडचणी उब्या राहू लागल्या.त्यातून मी ,अनिल कोकिळ आणि आम्हा सार्यांनाच बाहेर पडावं लागलं.त्याचा परिणाम अंकावर झालाच झाला.अंकालाही शहरात ओहोटी लागली. कमलबाबुंचाही अंकातला उत्साह कमी झाला आणि कालांतरानं लोकपत्र नांदेडवरून औरंगाबादला हलविला गेला. नंतर लोकपत्रच्या जागेत म्हशीचा गोठा उभारला गेल्याचे कळले .तो दिवस माझ्यासाठी सर्वात दुःखद होता.कारण कारण ज्या वास्तुतून सकस विचारांचे दुध निघायचे ती वास्तू गोठ्यासाठी वापरली जावी हा खरंच दैवदुर्विलास होता.दुदैवानं तसं घडलं होतं.आपण ज्या वास्तुत अनेक वर्षे वास्तव्य केलेलं असतं त्या वास्तूबद्दल एक आपुलकीची भावना आपोआपच निर्माण झालेली असते.तुम्ही ती वास्तु सोडून इतरत्र गेल्यानंतरही तेथील आठवणी,सुख,दुःखाचे प्रसंग कायम स्मरणात राहतात.माझंही असंच झालेलं होतं.त्यामुळं “दैनिकाचं कार्यालय ते गोठा” हा प्रवास नक्कीच क्लेश देणारा होता.त्यावर न राहून मी कमलबाबूंना पत्रही पाठविलं होतं.जे प्रसंग घडले त्यावर नाराजीही व्यक्त केली होती.अर्थात त्या पत्राला उत्तर आलं नाही.कारण दुःख त्यांनाही झालेलं असावं.”जे घडलं त्याबद्दल साहेबही नाराज आहेत “असं बोलणे झायालावर त्यांच्या जवळचे सांगायचे.
दिलदार माणूस
जाता जाता कमलबाबुंच्या मोकळ्या स्वभावाचे,माझ्याबद्द्लच्या त्याच्या आपलेपणाचे दोन अनुभव कथन करण्याचा मोह मला येथे आवरता येत नाही.माझा मुलगा सागरचा पहिला वाढदिवस 26 फेब्रुवारीला होता.त्यानिमित्त छोटेखानी समारंभही ठेवला होता.पण नेमकं त्याच दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सभा आणि पत्रकार परिषद होती.मी तिकडं अडकरणार असल्यानं मला वाढदिवसाचा कार्यक्रम स्थगित ठेवावा लागला.हे कमलबाबुंना कळलं.दुसर्या दिवशी सकाळी त्यांच्या पीएंचा फोन आला.”साहेब तुमच्या घरी येत आहेत.सोबत बाईसाहेबही येणार आहेत “असं त्यांनी सांगितलं.माझी एकच धांदल उडाली.कळेना काय करावं ते.थेट मालकच घरी येणार म्हटल्यावर स्वाभाविकपणे जे दडपण असतं ते माझ्या मनावरही होतं. ठरल्याप्रमाणं कमलबाबू माझ्या घरी बाईसाहेबांना घेऊन आले आणि सागरचं कोडकौतुक केलं.चांगल्या तासभर गप्पा मारल्या.आपल्या संपादकांबद्दलची ही आपुलकी,स्नेह नंतरच्या काळात मला कुठे दिसला नाही.त्या दिवसापासून कमलबाबू आमच्याही मनात कायमचे घर करून बसले.
आणखी एक प्रसंग कमलबाबुचं किती बारीक सारीक गोष्टींकडं लक्ष असायचं याची साक्ष देणारा आहे.मी संपादक असलो तरी सर्व आवृत्याचं पहिलं पान मीच लावायचो.शहर आवृत्तीचं काम रात्री 2 वाजता संपायचं.त्यानंतर मी चालत गणेशनगरमधील माझ्या घरी जायचो.तेव्हा गणेश नगर आजच्या सारखं गजबजलेलं नव्हतं.रस्ता निर्जन असायचा.अनेकदा भटकी कुत्री अंगावर यायची.हे कमलबाबूंना समजल्यावर त्यांनी मला बोलावून हिरो होंडा गाडी घेऊन दिली होती.एमएच26-4142 ही टु व्हिलर आजही माझ्याकडं आहे.संपादकांना आज फोरव्हिलर वगैरे असतात पण तो काळ तसा नव्हता.कार्पोरेट कल्चर अजून आलेलं नसल्यानं संपादकांनी “जमिनीवरच राहिलं पाहिजे” याकडं मालकवर्गाचा कटाक्ष होता.अशा काळत त्यानी मला टु व्हिलर का होईना दिली.त्याचं क ोण अप्रुप तेव्हा मला वाटलं होतं.
कमलबाबुंनी मला अमेरिकेतून पाठविलेलं एक पत्रही कायम माझ्या ह्रदयात घर करून राहिलं.पायपाससाठी कमलबाबू अमेरिकेला गेले होते.बायपास होण्यापुर्वी त्यांनी मला ते पत्र लिहिले होते.त्या पत्राच्या प्रत्येक ओळीतून आपलेपणा,त्यांच्या मनात असलेला माझ्याबद्दलचा जिव्हाळा जाणवत होता.”मी लवकरच परत येईल तेव्हा मला लोकपत्र अधिक वाचनीय झालेला दिसला पाहिजे” अशा भावना व्यक्त करतानाच अमेरिकेहून येताना तेथील न्यूयार्क टाइम्स,वॉशिंग्टन पोस्ट आणि अन्य काही वर्तमानपत्रांचे अंक घेऊन येतो असंही त्यांनी लिहिलं होतं.आपलेपणातून लिहिलेलं हे पत्र डोळ्याच्या कडा ओल्या करायला लावणारं नक्कीच होतं.”लोकपत्रची काळजी घ्या” अशी सूचनाही पत्रात त्यांनी केली होती.त्यातुन साहेबांचं लोकपत्रवर किती प्रेम होतं हे दिसत होतं.जीवघेणा आजार आणि सातासमुदापल्याड असलेल्या कमलबाबुंचा जीव आपल्या प्रिय लोकपत्रमध्ये गुंतला होता.पत्रातून ते जाणवत होतं. कमलबाबुंचं पत्र मला आल्याची बातमी बाहेर कळली तेव्हा कुतुहल आणि असुया अनेकांच्या मनात निर्माण झाल्या.एकट्या देशमुखलाच साहेबांचं कसं पत्र आलं याची चर्चा आसपास काही दिवस सुरू होती.हे पत्र आजही मी जपून ठेवलेलं आहे.
कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आमच्यामध्ये होते हे नक्की.दुर्दैवानं वरती म्हटल्याप्रमाणं नंतरच्या काळात अश्या काही घटना घडल्या की, माझ्यासह माझी सारी टीम लोकपत्रमधून बाहेर पडली.मी राजीनामा फॅक्सनंच कमलबाबुंकडं पाठविलेला असल्यानं त्यांची प्रतिक्रिया समजली नाही पण मला खात्रीय की,दुःख तर त्यांनाही नक्कीच झालं असलं पाहिजे.ते नंतर मला एका निमित्तानं दिसूनही आलं. मी मराठी पत्रकार परिषदेचा अध्यक्ष झालो,आणि सत्काराच्या निमित्तानं मी नांदेडला आलो तेव्हा कमलबाबुंनी मला घरी बोलावून माझा सत्कार केला होता.त्यावेळेस ते मला म्हणाले देखील,”एस.एम.परत या,आपण नव्यानं पुन्हा लोकपत्रची मांडणी,उभारणी करू”त्याचं हे वक्तव्य जे घडलं ते त्यांनाही आवडलेलं नव्हतं हे दाखवून देणारं होतं.मात्र .आता ते शक्य नव्हतं.
एक मनस्वी आणि संवेदनशील स्वभावाचा,चोखंदळ वाचक,रसिक मनाचा राजकारणी अशी कमलबाबुंची ओळख किमान माझ्या मनात तरी कायम आहे.कमलबाबू मनानं खरंच मोठा माणूस आहे यात शंकाच नाही पण ते लोकांच्या सांगण्यावर पटकण विश्वास ठेवतात.त्यांचा हा स्वभाव त्यांच्या राजकीय कारकीर्दीला पूर्णविराम देणारा ठरला असं माझं प्रांजळ मत आहे.कमलबाबुंनी मोठं विश्व निर्माण केलं असलं तरी का कोणास ठाऊक सातत्यानं जाणवत राहातं की,हा माणून स्नेहीजणांच्या गराड्यात असतानाही मनानं एकटा आहे.कदाचित राजकारणातलं अपयश त्याचं शल्य बनून राहिलं असावं.
एस एम देशमुख