अनंत बागाईतकर यांना भिडे पुरस्कार

0
877

ज्येष्ठ पत्रकार वरुणराज भिडे पत्रकारिता पुरस्कार दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांना जाहीर झाला आहे. तसेच, आश्वासक पुरस्कारासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’चे कोल्हापूरचे मुख्य बातमीदार गुरुबाळ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

पत्रकार वरुणराज भिडे मित्रमंडळाच्यावतीने दरवर्षी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यंदा पुरस्काराचे पंधरावे वर्ष आहे. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात येत्या २५ एप्रिलला होणाऱ्या समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भूषविणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यंदाचा मुख्य पुरस्कार दै. सकाळचे दिल्ली प्रतिनिधी अनंत बागाईतकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. २५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. आश्वासक पत्रकारितेचा पुरस्कार ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या कोल्हापूर आवृत्तीचे मुख्य बातमीदार गुरुबाळ माळी, सुनील राऊत (लोकमत, पुणे) आणि सरिता कौशिक (एबीपी माझा, नागपूर) यांना देण्यात येणार आहे. पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

ज्येष्ठ पत्रकार डॉ. एस. के. कुलकर्णी, एकनाथ बागूल, प्रकाश जोशी यांनी ट्रस्टच्यावतीने पुरस्कारार्थींची निवड केली. समितीचे समन्वयक म्हणून ज्येष्ठ पत्रकार जयराम देसाई यांनी काम पाहिले. या कार्यक्रमात दरवर्षीप्रमाणे पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यासह ‘चालू घडामोडी’ या विषयात विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली जाणार आहेत, अशी माहिती प्रमुख विश्वस्त प्रा. विलास जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. संस्थेचे विश्वस्त प्रा. प्रकाश भोंडे, चारुचंद्र भिडे, सूर्यकांत पाठक, डॉ. शैलेश गुजर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here