अधिस्वीकृती नाही…आता काही अडणार नाही,
महात्मा ज्योतीबा फुले योजनेचा लाभ
पूर्णवेळ पत्रकारांना मिळणार
महात्मा ज्योतीबा फुले आरोग्य जीवनदायी योजनेत अधिस्वीकृती धारक पत्रकारांचा समावेश केल्याचा जीआर मागच्या आठवडयात सरकारने काढला होता.या जीआरचा लाभ राज्यातील केवळ 2000 पत्रकारांनाच होणार असल्याने मराठी पत्रकार परिषदेने यास जोरदार हरकत घेत लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्र लिहून अधिस्वीकृती नसलेल्या पत्रकारांनाही या योजनेचा लाभ मिळावा अशी विनंती केली होती.त्यानुसार वित्तमंत्री मुनगंटीवर यांनी आज मंत्रालयात चर्चा करून त्यांची मतं जाणून घेतली.यावेळी किरण नाईक यांनी अधिस्वीकृती नसलेल्या पत्रकारांना तसेच ज्येष्ट आणि वयोवृध्द पत्रकारांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशी जोरदार मागणी केली.त्यानंतर मुनगंटीवार यांनी सुधारित जीआर त्वरित काढण्याचे उपस्थित अधिकार्यांना आदेश दिले.नवीन जीआरमध्ये उत्पन्नाची अट असता कामा नये असे आदेशही वित्तमंत्र्यांनी दिलेले आङेत.हा जीआर निघेल तेव्हा राज्यातील किमान पंधरा हजार पत्रकाराना याचा लाभ होणार आहे.राज्यातील पत्रकारांची संख्या पंचवीस हजारच्यावरती असली तरी अनेकजण अन्य व्यवसाय,शिक्षक,प्राध्यापक,वकिल म्हणून कार्य करत असतानाच पत्रकारिता करीत असतात.अशा पत्रकारांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असेही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.आजच्या बैठकीस मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने विश्वस्त किरण नाईक,चंद्रपूर जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश काकडे आणि त्यांचे सहकारी ,मंत्रालय वार्ताहर संघाचे विवेक भावसार,माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर,संचालक शिवाजी मानकर आदि उपस्थित होते.