मुळचे कावीर येथे राहणारे अन्वय नाईक हे मुंबईत व्यवसायानिमित्त राहतात. त्यांचा मुंबईत ‘कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड’ या नावाने अंतर्गत वास्तूरचना आणि सजावटीचा व्यवसाय आहे. शुक्रवारी ते कावीर येथील आपल्या घरी आले होते. शनिवारी सकाळी तेथील नोकरांना त्यांचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला. तर त्यांच्या आईचाही मृतदेह तिथेच होता. पोलिसांना त्याठिकाणी आत्महत्येपूर्वी लिहिलेली जी चिठ्ठी मिळाली, त्यात अर्णब गोस्वामीसह, आयकास्ट स्लॉशस्काय मिडियाचे फिरोज शेख, मगरपट्टा येथील ‘स्मार्ट वर्क्स ’चे नितेश सारडा या तिघांनी केलेल्या कामाचे पैसे थकवल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे. दरम्यान, नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अलिबाग पोलीस करीत आहेत.
पोलीस अधीक्षक अनिल परस्कार यांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला, नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत या तिघांची नावे लिहिली होती. तसेच नाईक यांच्या पत्नीनेही दिलेल्या तक्रारीवरून या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.