टीव्ही चॅनलवर चेहरा ओळखा आणि टाटा सफारी मिळवा… अशा प्रकारची जाहिरात दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या जाहिरातीत ‘अँकर’ असलेल्या सुशांतवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी नर्गिस नायर (वय ३६, रा. पुणे) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. नायर यांनी आपली ६२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. नायर या २५ मे रोजी टीव्ही पाहत असताना त्यांचे लक्ष ‘चेहरा ओळखा आणि बक्षीस मिळवा’, या जाहिरातीने वेधले. स्क्रीनवर दाखवलेला चेहरा त्यांनी ओळखला आणि दिलेल्या मोबाइल क्रमांकावर ‘एसएमएस’ केला. काही वेळातच जाहिरातीतील अँकर असल्याचा दावा केलेल्या सुशांत या व्यक्तीचा त्यांच्या मोबाइलवर फोन आला. त्याने त्यांना स्पर्धा जिंकल्याची खुषखबर देत दोन दिवसांनी पुन्हा फोन करणार असल्याचे सांगितले.
नायर यांना दोन दिवसांनी फोन आला. त्यात त्यांना १४ लाख ८० हजार रुपयांची टाटा सफारी गाडी बक्षीसात मिळाल्याचे सांगितले. नायर यांनी गाडीऐवजी पैसे देण्यास त्यांना सांगितले. या वेळी संबंधित आरोपीने नायर यांना करापोटी २० हजार रुपये भरायचे असल्याचे सांगितले. त्यांना बँकेत जाऊन दिलेल्या अकाउंटवर पैसे भरण्यास लावले. अशा प्रकारे विविध कारणांसाठी त्यांच्याकडून ६२ हजार रुपये घेतले. वारंवार पैसे मागण्याचे प्रकार सुरू असल्याने त्यांनी पैसे देण्यास नकार देत बक्षिसाची रक्कम नको असल्याचे सांगितले.
पैशांची आवश्यकता असल्याने दिलेले ६२ हजार रुपये परत करा, असे त्यांनी संबंधित आरोपीला सुनावले. मात्र, आरोपीने त्यांना पैसे देण्यास नकार दिला. पैशांसाठी त्यांना हैदराबाद येथे जाण्यास सांगितले आणि त्या व्यक्तीने नायर यांना एक पत्ता दिला. नायर दिलेल्या पत्त्यावर गेल्या असता तो बनावट असल्याचे लक्षात आले. पुण्यात परतल्यानंतर त्यांनी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
(मटावरून साभार)