जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारानंतर खरेदीदाराचे नाव सातबारा सदरी नोंदविण्यासाठी ५० हजारांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले पनवेलचे नायब तहसिलदार सुहास खामकर यांना अलिबाग सत्र न्यायालयाकडून २५ हजारांचा जामीन मंजूर झाला आहे. मंगळवारी सुहास खामकर आणि त्यांचा साथीदार गणेश भोगाडे यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
पनवेल तालुक्यातील कोयनावेळे येथे राहणारे कदम यांनी आपली पेंधर व कोयनावेळे येथील जमीन खारघर येथे राहणारे शरद वसंत सावंत यांना ६ सप्टेंबर २०१३ रोजी विकली आहे. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर शरद सावंत यांच्या नावाची नोंद व्हावी यासाठी कदम यांनी पेंधर तलाठी कार्यालयात १२ सप्टेंबर रोजी अर्ज केला होता . हे प्रकरण पनवेल तहसिल कार्यालयात आल्यानंतर नायब तहसिलदार सुहास खामकर यांनी या कामासाठी प्रथम १ लाख रूपये मागितले. त्यानंतर ५० हजारांवर तडजोड झाली.
याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडच्या पथकाने सापळा रचला. खामकर यांनी सोमवारी आपला सहकारी गणेश भोगाडे यांच्याकरवी ही ५० हजारांची लाच स्वीकारली होती.