सांप्रदायिक शक्ती देशाच्या भल्याच्या नसल्याने त्यांना पराभूत करा असे आवाहन राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
रायगड लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ आघाडीची सभा आज अलिबागेत झाली.त्यावेळी शरद पवार यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला.सभेला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,नारायण राणे,पतंगराव कदम,राष्ट्रवादीचे अध्यक्ष भास्कर जााधव आदि उपस्थित होते.
आपल्या भाषणात शरद पवार पुढे म्हणाले,अजून निवडणुका व्हायच्यात,बहुमत कोणाला मिळणार हे स्पष्ट व्हायचंय त्या अगोदरच नरेंद्र मोदी गुडघ्याला बाशिंग बांधून स्वतःला पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करीत आहेत,ही संत्तेसाठी चाललेली सांसदीय लोकशाहीची प्रतारणा आहे.देशाला कॉग्रेस मुक्त करा असे आ़वाहन करणारे मोदी हे विसरतात की,कॉगॅेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे.त्यांच्या पक्षाने किंवा त्याअगोदरच्या जनसंघाने स्वातंत्र्यासाठी काय केले याचे उत्तर दिले पाहिजे .
शरद पवार यांनी आपल्या भाषणात शेकापवरही जोरदार टीका केली.कधी शिवसेनेबरोबर तर कधी मनसे बरोबर जाणरा शेकाप आपल्या मूळ विचारधारेचीच प्रतारणा करीत असल्याने आजचा शेकाप पूर्वीचा राहिला नाही.विचारांनाच हरताळ फासणाऱ्या शेकापला दूर ठेवत सुनील तटकरे यांना दिल्लीला पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात भाजपने मनसेबरोबर गुप्त करार करून शिवसेनेच्या पाठित खंजीर खुपसला असल्याचा आरोप केला.तसेच अंतुले यांची आपण भेट घेऊन त्यांचे गैरसमज दूर केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.ज्या मतदार संघात आघाडीतील ज्या पक्षाचा उमेदवार प्रभावाी असेल त्या पक्षाला ती जागा साडण्याची भूमिका आघाडीने घेतल्यानेच हिंगोलीच्या बदल्यात रायगडची जागा राष्ट्रवादीला सोडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जाहीर सभेनंतर सुनील तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.तत्पुर्वी आजच सकाळी शेकापचे उमेदवार रमेश कदम यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून उद्या शिवसेना उमेदवार अनंत गीते आपला अर्ज दाखल करणार आहेत.