वीस वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी पत्रकार बरखा दत्त यांना काय म्हणाले होते ?

0
845

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या आत्मविश्वास आणि वक्तृत्व शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. परंतु त्यांची ही लकब जुनीच आहे. एनडीटीव्हीच्या पत्रकार बरखा दत्त यांनी १९९६ मध्ये घेतलेल्या मुलाखतीत मोदींचा हा आत्मविश्वास दिसून येतो. १९९६ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने गुजरातमधील २६ पैकी १६ जागांवर विजय मिळवला होता. निकालापूर्वी मतमोजणी दरम्यान पत्रकार बरखा दत्त यांनी भाजपच्या गुजरातमधील कामगिरीबद्दल मत विचारले होते. मोदी तेव्हा पक्षाचे राष्ट्रीय सचिव होते. या मुलाखतीचे वैशिष्ट्य म्हणजे मोदी तेव्हा आपल्या संभाषणादरम्यान मधे-मधे इंग्रजी बोलतानाही दिसतात.
कमी मतदानाबद्दल जेव्हा मोदींना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी निवडणुकीच्या रणांगणात काँग्रेस दुबळा असल्याचे म्हटले. जेव्हा प्रतिस्पर्धी पक्षात ताकद नसते तेव्हा त्या लढतीत मजा येत नाही. त्यामुळे लोकांमध्ये उत्साह नसतो. त्याचे मतात ही रूपांतर होत नाही. १९९६ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप आघाडीने १६१ तर काँग्रेसने १४० जागा मिळवल्या होत्या. तर डाव्या आघाडीला ५२ जागी यश मिळाले होते.
१९९५ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने १८२ पैकी १२१ जागांवर विजय मिळवला होता. त्यावेळी बहुतांश भाजप आमदारांना शंकर सिंह वाघेला यांना मुख्यमंत्री बनवायचे होते. पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने केशुभाई पटेल यांना मुख्यमंत्री पदासाठी निवडले. या निर्णयामागे नरेंद्र मोदी यांची भूमिका महत्वाची होती, अशी त्यावेळी चर्चा होती. त्यावेळी पटेल यांना मुख्यमंत्री बनवल्यामुळे नाराज वाघेला यांनी सप्टेंबर १९९५ मध्ये ४७ आमदारांसह बंडखोरी केली होती. त्यानंतर भाजपने माघार घेत वाघेला यांचे निकटवर्तीय सुरेश मेहता यांना मुख्यमंत्री बनवले. त्यामुळे १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये शकरसिंह वाघेला व केशुभाई पटेल असे दोन गट पडले होते. जेव्हा बरखा यांनी गुजरातमधील पक्षातंर्गत कलहाचा दाखला देऊन वाघेला यांच्या रॅलीवर झालेल्या दगडफेकीबद्दल मोदींना विचारले तेव्हा त्यांनी तुमची माहिती चुकीची असून मी गुजरात मधूनच येत आहे. पण कोणत्याच रॅलीवर दगडफेक झाली नाही. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेचे साधू नाहीत. परंतु संत नाराज असून वाघेला समर्थकांनी त्यांच्यावर आरोप करून त्यांना नाराज केले आहे, असे म्हटले होते. विशेष म्हणजे वाघेला ती निवडणूक पराभूत झाले होते. त्यानंतर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती.

लोकसत्तावरून साभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here