वर्तमानपत्र हेच सर्वश्रुत उपयुक्त माध्यम

    0
    945
    प्रताप पवार
    Sunday, April 22, 2012
    नवीन माध्यमं, जुनी माध्यमं यांच्याबाबतची चर्चा लोक चवीनं करत असतात; पण निदान आपल्या देशात तरी वर्तमानपत्रासारख्या माध्यमाला पुढची वीस वर्षं तरी सतत वाढत अपेक्षित आहे. जगामध्ये भारताइतकं स्वस्त वर्तमानपत्र कुठंही नाही. अगदी पाकिस्तान, श्रीलंकेतसुद्धा वर्तमानपत्राची किंमत सुमारे तीस रुपये आहे. यामुळं भारतामध्ये वर्तमानपत्र हे कुणालाही सहज परवडू शकतं, हे सिद्ध झालं आहे. याचाच परिणाम म्हणजे अनेक लोक, अनेक वर्तमानपत्रं घेऊन आपली ज्ञानाची आणि माहितीची भूक भागवतात.

    पंधराव्या शतकात प्रिटिंग प्रेसचा शोध लागला; त्यानंतर अर्थातच ज्ञानप्रसारात किंवा माहितीच्या क्षेत्रात एक नवीन युग अवतरलं. ही गोष्ट फक्त पुस्तकांपुरती किंवा धर्मग्रंथांपुरती मर्यादित राहिली नाही; तर 1605 मध्ये जगातील पहिलं वर्तमानपत्र लोकांसमोर आलं. त्यानंतर मुद्रितमाध्यमाचा हा प्रसार सर्व अंगांनी आजतागायत होतच राहिलेला आहे; पण विशेषतः वर्तमानपत्रं ही युरोपमध्ये सुमारे 400 वर्षं सातत्यानं वाढत गेली. 1990 च्या सुमाराला पाश्‍चिमात्य देशांतील वर्तमानपत्रखपाला थोडेसे अडथळे निर्माण झाले, असं म्हणता येईल. अर्थात पाश्‍चिमात्य किंवा विकसित देशांमध्ये वर्तमानपत्रांचा खप लोकसंख्येच्या जवळपास 90 टक्‍क्‍यांच्या आसपास पोचलेला होता; पण याविरुद्ध आशिया, दक्षिण अमेरिका, आफ्रिका येथे जगातील जवळपास 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त लोकसंख्या राहते, तिथं मात्र आजही वर्तमानपत्रं ही वाढत्या संख्येनं दिसतात. याच खंडांमध्ये काही वर्तमानपत्रं तर अठराव्या किंवा एकोणिसाव्या शतकात सुरू केलेली आहेत आणि आजही ती अस्तित्वात आहेत. वर्तमानपत्राच्या क्षेत्रात अर्थात आधुनिक तंत्रज्ञानामुळं आणि नवीनवीन क्षेत्र जी उदयास येत आहेत, त्यामुळं बदल झालेले आहेत आणि होत आहेत.

    अलेक्‍झांडर ग्रॅहम बेल, जो स्कॉटलंडमधला एक शास्त्रज्ञ होता, त्यानं 1875 मध्ये जगाला टेलिफोन दिला. अर्थातच टेलिफोनचं युग हे आजतागायत जगभर वाढतच राहिलं; पण आता मात्र टेलिफोनऐवजी लोक मोबाईल-सेवा अधिक स्वीकारू लागलेले आहेत. म्हणजे सुमारे 150 वर्षांनंतर दुसऱ्या क्रांतीमुळं मोबाईल फोन हे जास्त स्वीकारणीय झालेले आहेत आणि ज्या वेगानं टेलिफोनची वाढ झाली, त्याच्या कितीतरी पटींनी मोबाईलची वाढ झाली. याचं कारण प्रचंड सोय आणि अत्यंत वाजवी किंमत हे होय. अर्थात अशा तंत्रज्ञानात येत्या काळात खूप संशोधनं होणार आहेत आणि घड्याळ, कॅमेरा यांसारख्या गोष्टींची कदाचित गरजही वाटणार नाही, कारण या सर्व सुविधा मोबाईल फोनमधून मिळणार आहेत. अगदी गाण्यासारखी गोष्ट या प्रकारच्या मोबाईलमधून मिळू शकेल, असं कुणाला वाटलंही नव्हतं. त्यामुळं कल्पनेच्या भरारीबरोबर नवीन संशोधन होणार आहे आणि नवनवीन सोयी या मोबाईलमधून उपलब्ध होणार आहेत.

    आपण जर रेडिओचा विचार केला, तर 1892 ला निकोला टेल्स या माणसानं त्याचा शोध लावला आणि त्याचाही अर्थातच विस्तार झाला; पण त्याला काही मर्यादा जरूर होत्या. घरोघरी रेडिओ हे सर्वत्र झाले नाही; पण काही देशांमध्ये ते फक्त मर्यादित राहिले. 1970 नंतर त्याचाही विस्तार थांबल्यासारखा झाला आणि आता इंटरनेट रेडिओ किंवा म्युझिक डाऊनलोडिंगसारख्या गोष्टींमुळं रेडिओच्या विस्ताराला मर्यादा येऊ लागल्या आहेत. यानंतर आला टेलिव्हिजन. जॉन लॉगी बेअर्ड या दुसऱ्या स्कॉटमंडनं याला अस्तित्वात आणलं ते 1926 मध्ये. म्हणजे आजचं जे स्वरूप आहे, त्याची पहिली प्रतिकृती 1926 मध्ये अस्तित्वात आली. यामध्ये अर्थातच सातत्यानं प्रगती होत गेली आणि आज डिजिटल आणि रंगीत याच्याही पुढं थ्री डी या तंत्रज्ञानात आपण ते लवकर पाहणार आहोत. यामध्ये जगभरच काय; पण भारतातसुद्धा विविध प्रकारची, विविध विषयांवर शेकडो चॅनेल्स आलेली आहेत. याचा अंतिम उद्देश हा करमणूक, माहिती या स्वरूपात राहतो. हे होऊनसुद्धा आता सुधारलेल्या देशांमध्ये याची वाढ थांबल्यासारखी दिसते. आपण विकसित देशांतील वर्तमानपत्र आणि टीव्हीमधील वाढ पाहिली तर अजूनही वर्तमानपत्रांची वाढ अधिक आहे, असं दिसते. बीबीसी या संस्थेनं 1922 मध्ये रेडिओ सुरू केला; तर 1932 मध्ये टेलिव्हिजन सेवा सुरू केल्या. 1932 मध्येच ब्रिटिश पार्लमेंटने एक कायदा केला, की संध्याकाळी 5 वाजल्यानंतर रेडिओवर कुठलीही बातमी देता येणार नाही. याचं कारण आदल्या दिवशीच बातम्या समजल्यामुळं वर्तमानपत्र कोण वाचणार, हे होतं. आज आपल्याला 24 तास बातम्यांची शेकडो चॅनेल्स विविध देशांमध्ये दिसतात. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, की कुठल्याही माध्यमानं दुसऱ्या माध्यमाला संपवलेलं नाही; तर प्रत्येक माध्यमानं आपापली जागा घेतली, तिचा विस्तार झाला आणि काही काळानंतर तो विस्तार थांबला. काही वेळा त्याला उतरती कळाही लागली. 1989 मध्ये टीम बर्नर्स या शास्त्रज्ञानं थथथ (वर्ल्ड वाईड वेब) शोध लावला आणि कम्युनिकेशन क्रांतीत एक नवीन दालन उघडलं गेलं. 1993 मध्ये इंटरनेटनं एकंदर टेलिकम्यिुनिकेशन माहितीपैकी जेमतेम एक टक्का माहितीचा इंटरनेटच्या माध्यमातून वापर केला; परंतु 2007 पर्यंत म्हणजे 14 वर्षांनंतर हे प्रमाण सुधारित देशांमध्ये 90-95 टक्‍क्‍यांच्या पुढं जाऊन पोचलं. आपल्यासारख्या देशांमध्येसुद्धा याचा सातत्यानं वाढता वापर होत आहे. इंटरनेटचा परिणाम वर्तमानपत्रं आणि टीव्ही-माध्यमांवर जाहिरातींबाबत निश्‍चित झाला. जाहिरातींच्या वाढत्या उत्पन्नांना निश्‍चितपणे खीळ घालण्याचं काम इंटरनेट या माध्यमानं केलं. आपण पाहतो मायक्रोसॉफ्ट हे 1975 मध्ये, गुगल 1998 मध्ये , याहू 1994 मध्ये, एओएल 1994 मध्ये तर आता मायस्पेस, नेटस्केप किंवा फेसबुक यांसारख्या गोष्टी अत्यंत अल्पकाळात जगभर पसरल्या. इतकं असूनही ही माध्यमं एकमेकांचा उपयोग आपल्या प्रसारासाठी करू लागली आणि करतात. गुगलसारखी संस्था वर्तमानपत्रात जाहिराती देऊ लागली आहे. त्यांना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचायचे असेल, तर वर्तमानपत्र हेच सर्वश्रुत उपयुक्त माध्यम वाटतं. नवीन माध्यमं, जुनी माध्यमं यांच्याबाबत चर्चा लोक चवीनं करतात; पण निदान आपल्या देशात तरी वर्तमानपत्रासारख्या माध्यमाला पुढची वीस वर्षं तरी सतत वाढत अपेक्षित आहे. जगामध्ये भारताइतकं स्वस्त वर्तमानपत्र कुठंही नाही. अगदी पाकिस्तान, श्रीलंकेतसुद्धा वर्तमानपत्राची किंमत सुमारे तीस रुपये आहे. यामुळं भारतामध्ये वर्तमानपत्र हे कुणालाही सहज परवडू शकतं, हे सिद्ध झालं आहे. याचाच परिणाम म्हणजे अनेक लोक, अनेक वर्तमानपत्रं घेऊन आपली ज्ञानाची आणि माहितीची भूक भागवतात.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here