लोकमत वृत्तपत्र समूहाचे चेअरमन खा. विजय दर्डा यांनी प्रतिस्पर्धी वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर अग्रवाल यांना या कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून निमंत्रण देत एक निकोप पायंडा पाडला आहे. मी त्यांच्या या पुढाकाराचे स्वागत करतो, असे प्रतिपादन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले. विचारांचे मतभेद असू शकतात. मनभेद असू नये हे त्यांनी सिद्ध केले आहे. लोकमत समूह अभिनंदनाचा हक्कदार आहे, असेही ते म्हणाले. स्पर्धा ही वृत्तपत्रांमध्ये नव्हे तर बातम्यांमध्ये असायला हवी. वृत्तपत्र हे वाचकांमुळे चालते. त्यांचे विचार अंतभरूत होणार नाहीत तोपर्यंत एक चांगले वृत्तपत्र निघू शकत नाही, असे त्यावर खा. दर्डा यांनी स्पष्ट केले.
बुधवारी या समारंभाला माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह हे मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते. खा. दर्डा म्हणाले की, स्पर्धा असायला हवी हे मी मानतो पण ती निकोप असावी. स्पर्धा होणार नाही तोपर्यंत वृत्तपत्र चांगले होऊ शकत नाही.
एक वृत्तपत्र येत असेल तर दुसर्या वृत्तपत्राचे लोक येत नाहीत हे आज मी बघतो आहे. ही बाब समाजाच्या हिताची नाही. एक- दुसर्याचा सन्मान आवश्यक आहे. आम्ही सर्व मिळून समाजाला चांगले करण्याचा प्रयत्न करीत आहोत. खा. दर्डा यांनी हिंदी पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रयोगशीलतेबद्दल दैनिक भास्कर समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर अग्रवाल यांची प्रशंसा केली. त्यांनी स्व. राहुल बारपुते, राजेंद्र माथूर, प्रभाष जोशी यांचे स्मरण करतानाच ज्येष्ठ पत्रकार अभय छजलानी यांच्याशी राहिलेल्या मधुर संबंधांचा उल्लेख केला.
लोकमत समूहाचा मराठीशी संबंध राहिला आहे, त्याचवेळी लोकमत समूहाने मराठी भागात हिंदीच्या प्रचार- प्रसारात मुख्य भूमिका बजावली आहे.
माझे वडील स्वातंत्र्यसेनानी तसेच लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कार्यामुळे अतिशय प्रभावित झाले होते. हिंदी ही एकमेव भाषा देशाला जोडू शकते या गांधीजींच्या मताचे ते खंदे सर्मथक होते. मराठी प्रदेश असतानाही आम्ही बाबूजींच्या प्रेरणेने हिंदी वृत्तपत्राकडे पाऊल टाकले, असेही खा. दर्डा यांनी नमूद केले.