रायगड वार्तापत्रः

0
920


रायगडमध्ये महिला राज 

 रायगडच्या राजकारणात यापुढं महिलांचा दबदबा असणार आहे.मागच्या महिन्यात झालेल्या नऊ नगरपालिकांच्या निवडणुकांत सहा ठिकाणी महिला नगराध्यक्ष विराजमान झाल्या आहेत.त्यामध्ये उरणमध्ये सायली म्हात्रे,पेणमध्ये प्रितम पाटील,मुरूड जंजिरा येथे स्नेहा पाटील,महाडमध्ये स्नेहल जगताप,माथेरानमध्ये प्रेरणा सावंत,खोपोलीत सुमन अवसरमल  यांचा समावेश आहे.जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही महिलेसाठी राखीव असल्याने जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर खर्‍या अर्थानं महिला राज आले आहे असं म्हणता येईल.रायगड जिल्हयातील नऊ नगरपालिकांपैकी राष्ट्रवादीने सर्वाधिक म्हणजे रोहा,खोपोली आणि श्रीवर्धनमध्ये विजय संपादन केला आहे,शिवसेनेने माथेरान आणि मुरूडमध्ये ,कॉग्रेसने महाड आणि पेणमध्ये तर शेकापनं केवळ अलिबागमध्ये विजय संपादन केला आहे.उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुका काल म्हणजे 23 डिसेंबर रोजी होणार होत्या मात्र नवनिर्वाचित नगराध्यक्षांना अतिरिक्त अधिकार देण्याचा निर्णय सरकारनं घेतल्यानं उपनगराध्यक्ष निवडीच्या विशेष सभा पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत लांबणीवर टाकण्यात आलेल्या आहेत. नगरपालिका  निवडणुकामध्ये राष्ट्रवादी आणि शेकापची आघाडी होती तरीही दोन्ही पक्षांचं जिल्हयात मोठं नुकसान झालेलं आहे.शिवसेनेने जिल्हयात जोरदार यश संपादन केलं असून भाजपही चौथ्या स्थानावर गेला असला तरी या पक्षाला मिळालेलं यश तो पक्ष जिल्हयात आता अदखलपात्र नाही याची जाणीव सर्वाना झाली आहे.या पार्श्‍वभूमीवर आगामी जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी आता सुरू झाली आहे.सध्या जिल्हा परिषद राष्ट्रवादी आणि शेकाप आघाडीच्या ताब्यात आहे.येणार्‍या निवडणुका देखील हे दोन्ही पक्ष एकत्रित लढवतील असे संकेत आहेत.दुसरीकडं भाजप आणि शिवसेनेने निवडणुका स्वतंत्रपणे लढविण्याची तयारी चालविली आहे.नगरपालिकेतील यशामुळं शिवसेनेचा आत्मविश्‍वास दुणावला आहे.कॉग्रेसच्या नुकत्याच अलिबाग येथे झालेल्या बैठकीत कोणाशीही आघाडी न करता निवडणुका लढविण्याचा मानस पक्षानं व्यक्त केल्यानं सर्वत्र बहुरंगी सामने होतील असे संकेत आहेत.मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ग्रामीण मतदार कोणाबरोबर आहे याचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.–

 रायगडमधील 67 गावं होणार कॅशलेस 

रायगड जिल्हयातील 67 गावं पहिल्या टप्प्यात कॅशलेस करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने सोडला असून त्यादृष्टीनं यंत्रणा कामाला लागली आहे.प्रातांधिकारी यांनी निवडलेली 8,तहसिलदारांनी निवडलेली पंधरा,गटविकास अधिकार्‍यांनी निवडलेली 15 आणि जिल्हयातील बँकांनी निवडलेल्या 29 गावांचा समावेश आहे.पहिल्या टप्प्यासाठी जी गावं निवडली गेली आहेत त्या गावातील ग्रामसभा परवा म्हणजे प्रजासत्ताक दिनी होणार असून या ग्रामसभेत नागरिकांना कॅशलेस व्यवहार कसे करता येतील,त्यासाठी कोणते पर्याय निवडता येतील,याची माहिती दिली जाणार आहे.कॅशलेस व्यवहाराची प्रात्यक्षिक करून दाखवत जनतेत जागृती निर्माण करण्याचाही प्रयत्न होणार आहे.ज्या ग्रामस्थांचे बॅकेत खाते नाही अशांचे खाते लगेच उघडून घ्यावे,त्यांना रूपी कार्ड देऊन ते लगेच अ‍ॅक्टीव्हेट करून घ्यावे आणि कॅशलेस व्यवहारासंबंधी उपस्थित होणार्‍या प्रत्येक शंकांचं निरसन केले जाणार आहे.याच वेळेस गावातील महाविद्यालयीन तरण,एनएसएसचे विद्यार्थी यांच्या मार्फतही जनतेत जागृती करण्याचा प्रयत्न होणार आहे.प्रजासत्ताक दिनी होणार्‍या ग्रामसभेबाबतच्या कार्यवाहीसंबधीची आढावा बैठक नुकतीच जिल्हाधिकारी शितल तेली -उगले यांनी अलिबाग येथे घेऊन संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत..-

 माथेरानची महाराणी पुन्हा धावणार. 

 पर्यटकांचं आकर्षण असलेली माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा सुरू होणार आहे असे संकेत मिळत असल्यानं सध्या माथेरानमध्ये आनंदाचं वातावरण आहे.मे च्या पहिल्या आठवडयात माथेरान ट्रेनला सलग दोन अपघात झाल्यानं 9 मे पासून माथेरानची झुकझुक गाडी अनिश्‍चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला.याचा मोठा फटका माथेरानच्या पर्यटन व्यवसायाला बसला.माथेरान थंड हवेचं ठिकाण म्हणून जगविख्यात असलं तरी निसर्गाचा आनंद घेण्याबरोबरच नेरळ ते माथेरान अशी मिनी ट्रेनच्या प्रवासाचा आनंद घेण्यासाठीही पर्यटक माथेरानला येत असतात.मात्र अपघाताचं निमित्त करून 110 वर्षाची परंपरा असलेली रेल्वेच बंद केल्यानं माथेरानकरांमध्ये मोठी नाराजी होती.त्यासाठी विविध पातळ्यांवर माथेरानकर पाठपुरावा करीत होते.काही दिवसांपुर्वी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतल्यानंतर आता अमन लॉज ते माथेरान या तीन किलो मिटरच्या रूळाच्या दुरूस्तीचे तसेच माथेरान स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाल्यानं आठ -नऊ महिने बंद असलेली रेल्वे पुन्हा सुरू होणार असे संकेत मिळू लागले आहेत.माथेरानच्या पर्यटनाचा हंगाम समोर असतानाच माथेरानची महाराणी पुन्हा नेरळ माथेरान धावणार या जाणिवेनं माथेरानमधील वातावरण सध्या आनंदी आहे..

रायगडात पर्यटन महोत्सवाची धूम

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रायगड जिल्हयातील विविध शहरात सध्या पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले जात आहे.अलिबागनजिक तीनविरा येथे सध्या खारेपाट महोत्सव सुरू असून तो उद्यापर्यंत चालणार आहे.या महोत्सवाचे उद्घाटना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते 21 डिसेंबर रोजी झाले.खारेपाटातील संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न या महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.शरद पवार यांनी उद्घघाटनपर भाषणात ऐतिहासिक,सास्कृतिकदृष्टया रायगडला असलेले महत्वा आपल्या भाषणात स्पष्ट केले.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.मुरूड जंजीरा येथेही 28 डिसेंबर ते 1 जानेवारी या काळात मुरूड-जंजीरा पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.केंद्रीय मंत्री अनंत गीते या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.पर्यटन महोत्सवाच्या काळात विविध सास्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी दिली.जिल्हयातील अन्य शहरातही पर्यटन महोत्सव आयोजित करून पर्यटकांना आकर्षित केले जात आहे.

शोभना देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here