रायगडात होतोय अन्नदात्यांचा सन्मान,पत्रकारांचा उपक्रम…

0
992

शेतकर्‍यांचा सन्मान अन तो ही त्यांच्या बांधावर जाऊन,

रायगड प्रेस क्लबच्या उपक्रमास चळवळीचे स्वरूप 

कंपन्यांचे आक्रमण,वाढते शहरीकरण,गुंठ्याचा भाव आकाशाला गवसणी घालत असल्याने शेतीत राबण्याऐवजी शेती विकून मोकळं होण्याकडं असलेला नव्या पिढीचा कल,शेती क्षेत्रासमोरील हजार अडचणी यामुळे रायगड जिल्हयातीलच नव्हे तर कोकणातील  शेतीचे क्षेत्र कमी होत आहे.दोन-चार वर्षांपूर्वी जवळपास सव्वा लाख क्षेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड व्हायची आज हे क्षेत्र किमान दहा हजार हेक्टरनं कमी झालंय.त्याचा पीक उत्पादनावर नक्कीच दूरगामी  परिणाम होतोय.कधी काळी रायगडला भाताचे कोठार म्हटलं जायचं.आज रायगडची ही ओळख नामशेष होत चाललीय.याची खंत काळ्या आईवर प्रेम करणार्‍या रायगडमधील अनेक शेतकर्‍यांना नक्कीच आहे.त्यामुळे जिल्हयात असे काही शेतकरी आहेत की,ते अनेक संकटांवर मात करीत शेतीत राबत तर आहेतच त्याचबरोबर नव नवे प्रयोग करून शेती टिकविण्यात आपला वाटाही  उचलतच आहेत , शेती उत्पन्नात भर घालून राष्ट्राची सेवाही करीत आहेत.रायगडमधील काही शेतकर्‍यांनी कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेती किफायतशीर ठरू शक ते हे सिद्ध करून दाखविले आहे,तर काही शेतकर्‍यांनी नवे तंत्रज्ञान वापरून शेतीतून मोती पिकविले आहेत.या सर्व कर्तत्ववान ,उपक्रमशील,प्रगतीशील शेतकर्यांचे खरं तर  समाजाचं कौतूक करायला हवं.मात्र तेवढा वेळ आहे कुणाकडं?त्यामुळं असं काही घडत नव्हतं,नाही.त्याची खंत रायगडमधील पत्रकारांना होतीच होती.त्यातूनच रायगडमधील पत्रकारांनी शेतीनिष्ठ शेतकर्‍यांचे कौतूक सोहळे आयोजित करण्याचं ठरविलं. त्यानुसार  रायगड प्रेस क्लबनं गेली तीन-चार वर्षे जिल्हयातील प्रगतीशील शेतकर्र्‍यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला सलाम ठोकण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे.या कार्यक्रमाचं वैशिष्टय असं की,पंधरा जिल्हयातून प्रत्येकी तीन शेतकरी निवडले जातात.अशा शेतकर्‍यांचा त्यांच्या बांधावर जाऊन शाल,श्रीफळ,स्मृती चिन्ह आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला जातो.एकाच दिवशी पंधरा तालुक्यात होणारा हा कार्यक्रम लक्ष्यवेधी असतो.महाराष्ट्र सरकार शेतकर्‍यांना शेती मित्र,कृषीभूषण आदि पुरस्कार देऊन राजभवनात शेतकर्‍यांचा सत्कार करते.मात्र शेतकरी जिथं राबतो,जिथं घाम गाळतो त्या ठिकाणी जाऊन शेतकर्‍यांचा सत्कार कऱण्याची अभिनव योजना केवळ रायगडात आणि रायगड प्रेस क्लबतर्फेच राबविली जाते.शेतकर्‍यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत,त्यांच्या कामाचं कौतूक करण्याची रायगड प्रेस क्लबची कल्पना खरोखरच अफलातून आहे.पत्रकारांची हा उपक्रम  रायगडमध्ये सातत्यानं सुरू असल्याने या उपक्रमाला  आता लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होताना दिसत आहे.जिल्हयात यंदा कोणत्या शेतकर्यांचा रायगड प्रेस क्लब सत्कार करणार हा देखील चर्चेचा आणि उस्तुकतेचा विषय असतो.दरवर्षी जुलैमध्ये शेतकरी सन्मान सोहळा होत असतो.यंदा बारा जुलैला जिल्हाभर हे सोहळे होत असून मुख्य कार्यक्रम कर्जतला होणार आहे.यावेळी शेती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन शेतकर्यांचा सत्कार करणं’ हे काय पत्रकारांचं काम आहे काय ? असा प्रश्‍न  काही मित्र नक्कीच विचारतील.रायगड प्रेस क्लबचं म्हणणं आहे ‘अशा प्रश्‍नांना आपण उत्तर द्यायची नाहीत’.मुंबई-गोवा महामार्ग रूंदीकरणासाठी पत्रकार आंदोलनं करीत असतानाही हे प्रश्‍न काही जण मुद्दाम विचारत होते.तेव्हाही रायगड प्रेस क्लबनं अशा मित्रांच्या प्रश्‍नांची दखल घेतली नव्हती आताही दखल घेण्याचं कारण नाही.मात्र रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष पेरणे आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांनी सुरू ठेवलेला हा उपक्रम केवळ कौतूकास्पदच नाही तर अनुकरणीय देखील आहे.राज्यातील अन्य जिल्हयातील पत्रकार संघटनांनी असा उपक्रम राबविण्याची गरज आहे.रायगडमध्ये 1933 ते 1939 या काळात अलिबाग तालुक्यातील चरीचा ऐतिहासिक शेतकरी संप झाला होता.या संपात जिल्हयातील पत्रकारांनी  महत्वाची भूमिका पार पाडली होती.तेव्हापासून जिल्हयातील पत्रकार आणि शेतकरी यांची एकप्रकारे नाळ जुळलेली आहे.ती आजही कायम आहे हेच रायगड प्रेस क्लब दरवर्षी शेतकर्‍यांना सन्मानित करून दाखवून देत आहे.रायगड प्रेस क्लबचा सर्व पदाधिकर्‍यांचे आणि सदस्यांचे मनापासून आभार आणि सामाजिक बांधिलकी जपत सुरू असलेल्या कार्याला मनापासून शुभेच्छा.( एस.एम.) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here