सामाजिक बहिष्काराचे प्रकार वाढले

0
798

अलिबाग – सामाजिक बहिष्कार टाकणे हा कायद्यानं दखलपात्र गुन्हा असला आणि त्यासाठी दोन वर्षापासून जन्मठेपेपर्यतच्या शिक्षेची तरतूद असली तरी रायगडमध्ये सामाजिक बहिष्काराच्या घटना सातत्यानं घडत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.
म्हसळा तालुक्यातील कोंझरी येथील एका कुटुंबाला जातपंचायतीने वाळित टाकल्याचे प्रकऱण मागच्या आठवड्यातच समोर आलं असलं तरी जिल्हयातली ही काही पहिलीच घटना नाही.जिल्हयात यापुर्वी गेल्या अकरा महिन्यात सामाजिक बहिष्काराच्या तब्बल 15 घटना घडलेल्या आहेत.त्यात अलिबाग,श्रीवर्धन,आणि मुरूड या किनारपट्टी तालुक्यात प्रत्येकी चार,रोहा तालुक्यात दोन,आणि पालीमध्ये एक घटना घडलेली आहे.राजकीय किंवा शेतीच्या वादातूनच यातील बहुतेक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
जिल्हयात पोलिसांपर्यत न आलेल्या किंवा पोलिसांनी गुन्हे नोंदवून न घेतलेल्या घटनांची संख्याही मोठी आहे.अनेक प्रकरणात पोलिसांकडून गुन्हे नोंदविले गेले नाहीत .पोलिस कारवाईस टाळाटाळ करीत असल्याबद्दल मुरूड येथील गणेश आत्माराम आणि जगन्नाथ वाघिरे यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती.त्यात न्यायालयाने कारवाईचे आदेश पोलिसांना दिले होते हे येथे उल्लेखनिय आहे.
सामाजिक बहिष्काराचे वाढते प्रकार रोखण्यासाठी कठोर कायद्याबरोबरच समाजाचे वैचारिक आणि मानसिक प्रबोधन करण्याची आणि नियमबाह्य ठरलेल्या जातपंचायती आणि गावक्याचं समुळ उच्चाटन करण्याची खऱी गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here