एका प्रमोशनच्या कार्यक्रमात सलमान खानच्या अंगरक्षकांनी छायाचित्रकारांना धक्काबुक्की केली.या घटनेबद्दल सलमानने दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी छायाचित्रकारांनी केली मात्र त्यास सलमानने नकार दिला.त्यामुळे चिडलेल्या छायाचित्रकारांनी सलमानचे फोटो काढायचे नाहीत,त्याच्यावर बहिष्कार टाकायचा असा स्वागतार्ह निर्णय घेतला.या निर्णयाने अस्वस्थ झालेल्या सलमानने आता थेट छायाचित्रकारांना त्यांच्या नोकऱ्या घालविण्याच्या धमक्या दिल्या आहेत.
एखाद्या नेत्याच्या विरोधात बातमी आली तर तो नेता व्यवस्थापनाच्या कानी लागून संबंंधित पत्रकाराची नोकरी घालवतो असे प्रकार महाराष्ट्रात अनेक झालेले आहेत.त्याच मार्गाचा अवलंब करीत आता सलमान छायाचित्रकारांना धमक्या देत आहे.त्याने ट्विट करून म्हटलंय की,माझी छायाचित्रं काढा अन्यथा रोजगाराला मुकाल.तो म्हणतो,माझे फोटो न काढण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो पण त्यामुळे काही फोटोग्राफर्शना आपल्या रोजगार गमवावा लागेल.तो म्हणतो,कोणालाही धक्काबुक्की झालेली नाही.शिवाय आपण कसे वागतो याचे छायाचित्रकारांनी आत्मपरीक्षण करावे.फोटो न काढल्याने काही फरक पडणार नाही माझी छायाचित्रे मी सोशल मिडियावर टाकेल,माझे चाहते मला समजून घेतील अशीही भाषा सलमानने केली आहे.सलमानच्या या धमकीनंतर छायाचित्रकारांची संघटना काय निर्णय घेते ते बघावे लागेल.या लढ्यात पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती छायाचित्रकारंच्या संघटनेबरोबर आहे.