बॅेकेच्या दारात वृध्देचा मृत्यू

0
1431

बीड  जिल्हयातील वडवणी येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर एका वृध्द महिलेचा मृत्यू झालाय.पद्ममीनबाई ग्यानबा जावळे असं या महिलेचं नाव.वय वर्षे75.गाव तालुक्यातीलच खडकी देवळा.आपले निराधार योजनेचं मानधन खात्यावर जमा झालं की नाही ते पाहण्यासाठी 3 जुलै रोजी या आजीबाई देवळ्याहून वडवणीला  आलेल्या होत्या.सकाळीच घर सोडल्यानं पोटात अन्नाचा कण असण्याचं कारण नव्हतं.वडवणीतील बॅेंकेत आल्यातर तेथे मोठीच मोठी रांग.तब्बल चार तास ही महिला  उपाशीपोटी  रांगेत उभी राहिली.घश्याला कोरड पडली.बॅंक कर्मचाऱ्यांकडं पाणी मागितलं.कोणाला त्यांची दया येण्याचं कारण नव्हतं.बॅंकीतील गर्दी आणि चार तास उभ्या राहिल्यानं अखेर त्यांना चक्कर आली आणि त्यातच पद्मनीबाई गतप्राण झाल्या.

केवळ एक  दुर्दैवी मृत्यू  म्हणून या घटनेकडं पाहता येणार नाही.हा व्यवस्थेनं घेतलेला बळी आहे.बॅकेचा मस्तवालपणा,तेथील कर्मचाऱ्यांची अरेरावी आणि अमानवीवृत्तीचा हा परिपाक  आहे.मुळात ही बॅंक ज्या जागेत आणि ज्या अवस्थेत आहे ति थं धडधाकट  माणसाचाही जीव गुदमरतो.जुन्या वडवणीत एका कोपऱ्यात ही बॅंक आहे.तिथं फोर व्हिलर काय टू व्हिलर देखील पोहचत नाही.बॅकेची जागा एक -दीड हजार  स्वेअऱ फूट देखील नसेल.जुन्या पध्दतीचा एकच दरवाजा आणि तिथं खिडक्याही असून नसल्यासारख्याच.वडवणीत ही एकमेव राष्ट्रीयकृत बॅंक.निराधार योजना,पेन्शन,आणि शेतकऱ्यांसाठी कर्जपुरवठा या एकाच बॅंकेतून केला जात असल्यानं तिथं कोणत्याही वेळी गेलात तरी 200पेक्षा कमी लोक नसतात.हजार स्केअर फूट जागेत जर 200जणांचा जमाव जमला तर   तर काय अवस्था होऊ शकते याची आपण कल्पना करू शकतो.बरं कोणतंही नियोजन नाही,बॅेकत स्टाफ नाही,जो आहे तो परप्रंांतीय आणि कमालीचा उध्दट.महिलांसाठी वेगळी रांग,वृध्दांसाठी काही वेगळी सोय असावी अशी अपेक्षा वडवणी बॅेकेत फोल ठरते.व्यवस्थापकांनीच सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्वांना समान समजतो.समानतेची ही भाषा लोकांचा जीव घेणारी आहे.तो घेतला गेला.याची संपूर्ण चौकशी होऊन जबाबदार असलेल्यांना शासन झाल्याशिवाय पद्मीनीबाईना न्याय मिळणार नाही.लोकांच्या प्रश्नांची ज्यांना चाड आहे अशा पक्षांनी रस्तयावर उतरून यासाठी आंदोलन कऱण्याची गरज आहे असं मला वाटतं.

या घटनेतला दुसरा कंगोराही तेवढाच महत्वाचा आहे.वडवणी तालुका झाला त्याला दहा वर्षेलोटली आहेत.या दहा वर्षात सरकारनं तहसिलची इमारत सोडली तर अन्य काही व्यवस्था केलेल्या नाहीत.वडवणी अगोदर फार मोठी वस्ती नव्हती.जुन्या वळणाचं गाव.तशी कष्टकऱ्यांची वस्ती.हातमागाचा व्यवसाय इथं चालायचां.येथील कुशल कामगारांनी आपल्या कष्टातून आणि घामातून वडवणी टॅरिकॉटच्या निमित्तानं वडवणीला स्वतःची ओळख करून दिली होती.एक चांगली बाजारपेठ आणि आठवडी बाजारासाठी देखील वडवणी प्रसिध्द होतं.वडवणीला तालुक्याचा दर्जा मिळाला तर वडवणीच्या विकासाला चार चांद लागतील या कल्पनेनं वडवणीकरांनी त्यासाठी मोठं आंदोलन केलं.अनेकांना लाठ्या-काठ्या खाव्या लागल्या.तुरूंगवासही भोगावा लागला.अखेर जनरेटा आणि गरजेतून वडवणी तालुका झाला पण वडवणी आपलं पुर्वीचं वैभव आणि सुख शांती हरवून बसली.विकासाची स्वप्न पाहणाऱ्या वडवणीला अवैद्य धंद्यांचा विळखा पडला.वडवणी टेरिकॉट बंद पडले.त्या ऐवजी अनेक ” नवे  धंदे”   सुरू झाले.त्यातून एक बकालपणा वडवणीला आला.त्यात सरकारची उपेक्षावृत्ती आणि लोकप्रतिनिधींनी वडवणीला वाऱ्यावर सोडल्यानं वडवणीच्या विकासाल कुलूपच लागले.परिणामतः दहा हजारच्या आसपास लोकसंख्या असणाऱ्या वडवणीत केवळ एक स्टेट बॅंक ऑफ इंडिया,एक मराठवाडा ग्रामीण बॅंक आणि एक जिल्हा बॅकेची लुळी-पांगळी झालेली शाखा एवढ्याच बॅंका.वडवणी तालुका नव्हतं तेव्हाच सुरू झालेल्या या बॅंका आहेत.तालुका झाल्यावर वडवणीची लोकसंख्या तर वाढलीच त्याच बरोबर अन्य तालुक्यातील 70-80 खेडी नव्या वडवणी तालुक्याला जोडली गेली,त्याचा प्रचंड भार वडवणीवर पडला.लोकसंंख्या वाढली पण शहराच्या पायाभूत सुविधा वाढल्या नाहीत.नव्या  बँका  आल्या  नाहीत . तालुक्याच्या ठिकाणी असलेली अनेक कार्यालयं आजही खुराड्यातच आपला संसार थाटून आहेत.बहुतेक सरकारी कार्यालयं भाड्याच्या जागेत आहेत.जुन्या वळणाची ही बांधकामं असल्यानं त्याला व्हेन्टिलेशन वगैरे असावी लागतात हे कोणाच्या गावीही नसते.जागाच मिळत नसल्यानं आहे त्या स्थितीत सारीच कार्यालयं असल्यानं तिथंही जीव गुदमरून मरावं अशीच स्थिती आहे.या साऱ्याच्या विरोधात कोणा राजकीय पक्षानं आवाज उठवलाय किंवा रस्त्यावर उतरून आंदोलन केलंय असं किमान माझ्यातरी कानावर आलेलं नाही.विशेषतःजिथं आर्थिक विषयाचा संबंध येतो त्या बॅकांच्या कारभाराच्या बाबतीत तरी राजकीय पक्षांनी जागरूकता बाळगायला हवी होती. ती बाळगली गेली नाही ही वस्तिुस्थिती आहे. स्टेट बॅेकेच्या अनेक तक ्रारी तहसिलदारांकडं केल्या गेल्या असं सांगण्यात येतं.पण उपयोग झालेला नाही.

कारण वडवणीला तहसिलदारही असे पाठविले जातात की,जे निवृत्त व्हायला आलेले आहेत,किंवा ज्याना नुकतंच प्रमोशन मिळालेलं आहे.काहीजणांना  शिक्षा म्हणूनही वडवणीला पाठविले जाते.अशा प्रकारे केवळ नाईलाज म्हणून आलेले अधिकारी  दिवस काढत असतात.त्यामुळंच गेल्या दहा वर्षात पंचवीसच्या जवळपास तहसिलदार वडवणीनं पाहिले आहेत.बदलीच्या प्रतिक्षेत दिवस  काढणाऱ्या े तालुका दंडाधिकाऱ्यांकडून काही अपेक्षा कऱण्यासारखी स्थिती नव्हती आणि नाही.जनमताचा रेटा हेच त्यावरचं एकमेव रामबाण औषध आहे.अन्य राहू द्या पण बडवणी तालुक्यात आणखी किमान पाच बॅंकाची गरज आहे.देवडी या माझ्या गावी एखादी बॅंक सुरू करावी म्हणून मी गेली दोन वर्षे प्रयत्न करतो आहे.त्याला यश येत नाही.देवडीत बॅंक झाली तरी सभोवतालच्या पंधरा-वीस गावाचं वडवणीवर असलेलं प्रेशर कमी होईल.लोकांनाही पंधरा-वीस किलो मिटरची यातायात करावी लागणार नाही.पण एवढी संवेदनशीलत ना बॅंक व्यवस्थापन दाखवते ना,सरकार.यात जनतेची मात्र जीवघेणी ससेहोलपट होताना दिसते आहे.दोन लाखंाची लोकसंख्या आणि दोनच बॅंका असल्यानं लोकांची गैरसोय तर होणारच पण त्याचबरोबर मक्तेदारीमुळं तेथील कर्मचाऱ्यांमध्येही एक प्रकारची  अरेरावी आणि उन्मत्तपणा येणारच.बॅंक कर्मचाऱ्यांच्या या माजोरीपणाचा अनुभव आलेला नाही असा खातेदार भाग्यवानच म्हणावा लागेल.बॅकेतून पैसे काढायचे असोत,बॅेकत पैसे भरायचे असोत,कर्ज हवे असेल,कर्ज काढायचे असेल तरी प्रत्येक टप्पयावर या अरेरावीचा प्रत्यय येतोच येतो.

बॅकेत  खातं उघडायचं असेल तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला खातं कशासाठी उघडायचंय या प्रश्नाला सामारं जावं लागतं. बॅकेत खातं कशासाठी उघडायचं याचं उत्तर खातेदारानं दिलं पाहिजे असा बॅकांचा नियम असल्याचं ऐकिवात नाही.खातं उघडायचं असलं तरी किमान तीन-चार चकरा मारायला लावल्या जातात,खातं उघडलं तर पासबुकसाठी अशाच फेऱ्या,अनेकदा पैसे काढायचे असतील तर पैशे शिल्लक नाहीत अशी मग्रुरीची उत्त्तर दिली जातात.आपले पैसे काढायचे असतील तर ही स्थिती.कर्ज काढायचे असेल तर ज्या अग्निदिव्यातून जावे लागते ते असह्य असते.अनेक चकरा मारायला लावल्या जातात.अशिक्षित ,गरीब,असहाय्य शेतक़ऱ्याची अडवून कशी करायची याचं प्रशिक्षण वडवणीच्या सर्वच बॅंकातून चांगलं मिळू शक ते.एकीकडं सरकार शेतकऱ्यांना कर्जपुरवठा झालाच पाहिजे असा आग्रह धरताना दिसते तर दुसऱीकडे बॅका अशा पध्दतीची अमानविय वागणूक शेतकऱ्यांना देतात की, “नको ते कर्ज ” असं म्हणण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर येते.माझ्याच गावातील एका 80 वर्षाच्या शेतकऱ्याला कर्ज हवे होते.मागच्या वर्षीचे सारे कर्ज त्यानं फेडले होते.त्याला यावर्षी कर्ज देण्यासाठी वेगवेगळी कारणं सागून किमान आठ चकरा मारायला लावल्या गेल्या.हे एकाच शेतकऱ्यांच्या बाबतीत घडतंय किवा घडलं असं नाही बहुतेकांचा असाच अनुभव असतो.

अशा स्थितीत हे सारं थांबवायचं असेल आणि पुनच्च आणखी एखाद्या पद्माबाईचंा बळी जाऊ नये असं वाटत असेल तर तातडीनं वडवणी तालुक्यात आणखी कि मान पाच बॅका सुरू झाल्या पाहिजेत.उसाचे,कापसाची येणारी बिलं आणि अन्य वाढलेला व्यवहार आणि समाजाच्या शेवटच्या पायरीवरील माणसाचाही बॅंकेशी संबंध येत असताना येणाऱ्या प्रत्येक बॅंकेला  चांगला धदा मिळणारच आहे.तेव्हा अशा बॅका तातडीने सुरू झाल्या पाहिजेत.सध्या जे तहसिलदार आहेत त्यानी बॅकांच्या अभावामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ शक ते हे वास्तव सरकारच्या निदर्शनास आणून देत तातडीने त्यादृष्टीनं व्यवस्था केली पाहिजे.प्रारंभी म्हटल्याप्रमाणं जनतेनंही त्यासाठी दबाव वाढविला पाहिजे.तालुके जाहीर करायचे आणि मुलभूत सोयींची देखील व्यवस्था करायची नाही ही सरकारी नीती देखील बदलली पाहिजे.एखादा तालुका झाल्यानंतर तेथे किती दिवसात साऱ्या व्यवस्था व्हाव्यात याबाबतचे काही निकष सरकानं केले तर वडवणीत जे घडलं ते अन्यत्र किंवा पुनश्च घडणार नाही हे नक्की.

एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here