आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांचे सिंधुदुर्ग नगरीत भव्य स्मारक होणार
स्मारकासाठी 4 कोटी 55 लाखांचा निधी मंजूर
मुंबईः आनंदाची बातमी आहे.आद्य मराठी पत्रकार,दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर याचं भव्य स्मारक सिंधुदुर्ग नगरीत होत आहे.सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि मराठी पत्रकार परिषदेच्या सततच्या पाठपुराव्यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकासाठी 4 कोटी 55 लाख रूपयांच्या निधीस आज मंजुरी दिली.त्यामुळं आता स्मारकाच्या कामास गती येणार आहे.निधी मंजूर केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष गजानन नाईक,मराठी पत्रकार परिषदेेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख,विश्वस्त किरण नाईक,अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले आहेत.
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे सिंधुदुर्ग नगरीत भव्य स्मारक व्हावे ही राज्यातील पत्रकारांची जुनी मागणी होती.जिल्हा संघ आणि परिषदेने सातत्यानं त्याचा पाठपुरावा केला होता.अखेर विद्यमान सरकारने पत्रकारांच्या या मागणीची दखल घेऊन 2016 मध्ये स्मारकाच्या निधीस मान्यता दिली.अर्थसंकल्पात त्याची तरतूदही करण्यात आली .त्यानंतर आराखडे मंजूर झाल्यानंतर हा निधी प्रत्यक्ष जिल्हाधिकार्यांकडं वर्ग करण्याचा निर्णय झाला आङे.त्यामुळं सिंधुदुर्ग नगरीत बाळशास्त्रींचे भव्य स्मारक होत आहे.
मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज स्मारकाच्या शिखर समितीची व्हिडीओ कॉन्फरन्सीनव्दारे बैठक झाली.या बैठकीत जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे,कार्यकारी अभियंता श्री.व्हटकर,जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.जगताप,जिल्हा नियोजन अधिकारी हटकर,जिल्हा माहिती अधिकारी बांदिवडेकर,उपअभियंता विनायक जोशी,आर्किटेक्ट अमोल नष्टे,पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अशोक करंबळेकर आदि सहभागी झाले होत.स्मारकासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्हयातील,देवगड तालुक्यातील पोर्भुले या गावात झाला.प्राथमिक शिक्षण वडील गंगाधरशास्त्री जांभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाल्यानंतर ते मुंबईत आले. तेथे त्यानी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे नियतकालिक सुरू केले.या घटनेला आता 186 वर्षे झाली आहेत.प्रकांड पंडित आणि भाषाप्रभू असा लौकीक लाभलेल्या बाळाशास्त्री जांभेकर यांनी दर्पणच्या रूपानं लावलेल्या रोपटयाचा आता वटवृक्ष झाला असून मराठी वृत्तपत्रसृष्टीचा मोठाच विस्तार झाला आहे.अशा स्थितीत आज त्यांचे स्मारक होत आहे ही नक्कीच आनंदाची बाब म्हटली पाहिजे.स्मारक कसे असावे,या स्मारकामध्ये काय असावे याचा आराखडा सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सूचनेनुसार करण्यात आला आहे.लवकरच स्मारकाचा भूमीपूजन सोहळा होईल.हे स्मारक विनाव्यत्यय लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशीच तमाम मराठी पत्रकारांची इच्छा आहे.