मुंबई दिनांक 3 सप्टेंबर ः कोरोनाबाधित पत्रकारांची वाढती संख्या आणि विद्यमान व्यवस्थेत त्यांची होणारी हेळसांड टाऴण्यासाठी प्रत्येक शासकीय आणि धर्मदाय आयुक्तांच्या अखत्यारित येणार्‍या खासगी रूग्णालायत बाधित पत्रकारांसाठी राखीव बेडची व्यवस्था करावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांच्यावर वेळेत आणि योग्य उपचार न झाल्याने काल त्यांचे निधन झाले.रायकरांचे निधन हा अनास्थेचा बळी असल्याची संतप्त भावना राज्यातील माध्यम जगतात उमटली.रायकर यांना अ‍ॅम्बुलन्स मिळाली असती आणि त्यांना ऑक्सीजन मिळाला असता तर एक तरूण,उमदा पत्रकार आपणास सोडून गेला नसता ही प्रतिक्रिया राज्यभर उमटली.या पार्श्‍वभूमीवर मराठी पत्रकार परिषदेने तातडीने मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांना पत्र पाठवून पत्रकारांसाठी राखीव बेडची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.त्याच बरोबर ज्यांच्या हलगर्जीपणामुळे पांडुरंग रायकर यांचा बळी गेला त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा आणि आरोग्यमंत्र्यांनी बुलढाणा येथील कार्यक्रमात जाहीर केल्याप्रमाणे पाडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना 50 लाख रूपयांचे मदत दिली जावी ..यापुढे राज्यातील कोणत्याही पत्रकारावर अ‍ॅम्बुलन्स मिळाली नाही,ऑक्सीजन मिळाला नाही अशी वेळ येणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी अशी विनंती देखील या निवेदनात करण्यात आली आहे.पांडुरंगच्या निधनाची चौकशी करण्याचे आदेश आरोग्य मत्र्यांनी दिले आहेत त्याचे स्वागत असले तरी ही चौकशी त्वरित व्हावी आणि जबाबदरा लोकांना शासन देखील तात्काळ व्हावे अशी मागणी देखील निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर एस.एम.देशमुख,विश्‍वस्त किरण नाईक,अध्यक्ष गजानन नाईक,कार्याध्यक्ष शरद पाबळे,सरचिटणीस संजीव जोशी,कोषाध्यक्ष विजय जोशी,राज्य सोशल मिडिया सेलचे प्रमुख बापुसाहेब गोरे,राज्याचे प्रसिध्दी प्रमुख अनिल महाजन,राज्याच्या महिला संघटक जान्हवी पाटील आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here