महाराष्ट्रातील अनेक पत्रकार संघटनांचे अस्तित्व केवळ कागदोपत्रीच असताना किंवा अनेक संघटना अशा आहेत की,त्यामध्ये बारा बारा वर्षे निवडणुकाच ंझालेल्या नाहीत अशा स्थितीत मराठी पत्रकार परिषद आणि या संस्थेशी संलग्न संघांचा कारभार लोकशाही पध्दतीनं चालताना दिसतो आहे.पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या सध्या निवडणुका होत आहेत.संघटनेचे जिल्हयात चारशेच्या आसपास सदस्य आहेत.त्यांना पोस्टाने मतपत्रिका पाठविल्या जात आहेत.त्यांनी आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढे मतदान करून ती पत्रिका पोस्टाने परत पाठवायची आहे.पत्रिका मतदारांना पाठविण्याचा आणि मतदान झालेल्या पत्रिका परत पाठविण्याचा खर्च पुणे जिल्हा पत्रकार संघच करणार आहे.चार पदासाठी निवडणुका होत आहेत.कार्याध्यक्ष,उपाध्यक्ष, सरचिटणीस,आणि कोषाध्यक्ष.परिषदेच्या घटनेनुसार कार्याध्यक्ष हाच दोन वर्षांनी अध्यक्ष होत असल्याने अध्यक्षासाठी मतदान घेतले जात नाही.पुणे जिल्हयाचे विद्यमान अध्यक्ष आहेत बापुसाहेब गोरे तर या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहात आहेत श्रीराम कुमठेकर.कोषाध्यक्षपदी विनया कोरे या यापुर्वीच बिनविरोध निवडून आलेल्या असल्या तरी त्या उपाध्यक्षपदाचीही निवडणूक लढवत आहेत.राजेंद्र सांडभोर आणि विनायक कांबळे हे अन्य दोन उमेदवार उपाध्यक्षाच्या स्पर्धेत आहेत.कृष्णकांत कोबल आणि राजेंद्र कापसे कार्याध्यक्षपदाचे उमेदवार आहेत तर सरचिटणीस पदासाठी प्रभाकर क्षीरसागर आणि राजेंद्र कापसे यांच्यात सरळ लढत होत आहे.पाच तारखेला सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत मतपत्रिका पोस्टात टाकल्या जाणार आहेत.त्या 20 ऑक्टोबर पर्यत परत मागविण्यात आल्या असून 21 तारखेला सर्व उमेदवारांसमोर त्या पत्रिका पोस्टातून ताब्यात घेण्यात येतील आणि नंतर मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येईल.संपूर्ण लोकशाही पध्दतीनं होत असलेल्या या निवडणुकांसाठी सर्व उमेदवारांना शुभेच्छा.-