पुणेकर जिंकले…

0
828

बरं झालं सरकारला लवकर अक्कल सूचली अन पुणे आकाशवाणीचा प्रादेशिक विभाग बंद करण्याचा निर्णय मागे घेतला ते .अर्थात यातून सरकारचा पुण्याबद्दलचा आकस मात्र जगासमोर आला.मागे आयआयटीची चर्चा झाली तेव्हा नागपूरला झुकते माप मिळाले.काही दिवसांपुर्वी पुण्यातील पीआयबीचे कार्यालय बंद करण्याचा मनमानी हुकूम निघाला,आता पुणे आकाशवाणीवर संक्रांत.हा काय प्रकार सुरूय ? तुलनेनं नवे आणि कमी महत्वाचे औरंगाबाद,नागपूर विभाग सुरू ठेवले गेले ( अर्थात औरंगाबाद नागपूरही सुरूच राहिले पाहिजेत ) अन पुण्याचा विभाग बंद करण्याचं ठरलं.हा तुघलकी निर्णय ज्या अधिकार्‍यानं घेतला त्याची मानसिकता जरा तपासावी लागेल.कारण मन की बात सांगायला पंतप्रधान आकाशवाणीचं वापरतात.पुणे आकाशवाणीही त्यांच्या मनकी बात चे सहक्षेपण करीत असतं.तरीही हळूहळू महत्वाची आकाशवाणी केंद्रंच बंद करायची असतील तर हा मोदी विरोधी पक्षांतर्गत कटाचा तर भाग नाही ना ? अशीच शंका येते.पुण्याचा प्रादेशिक विभाग बंद करण्याचा  निर्णय का झाला ? याचा खुलासा अजून झालेला नाही.खर्चात कपात करायची हेच कारण असेल तर असे अनेक विभाग आहेत की,ज्याचं काही काम नाही ते बंद करायला हवेत.जिथं पब्लिकचा आणि पंतप्रधानांचा थेट संबंध येतोय ते आकाशवाणीचंच युनिट बंद करून कसली डोंबल्याची बचत होणार आहे काय ? कदाचित हा पुणेकरांना डिवचण्याचा किंवा पुणेकरांची एकी तपासण्याचाही डाव असू शकतो.तसं असेलच तर त्यात पुणेकर कुणाला हार जाणार नाहीत हे दिल्लीश्‍वरांनी लक्षात घ्यावं.आकाशवाणी संबंधीची बातमी येताच सारेच पक्षभेद विसरून कामाला लागले.काही जण रस्त्यावर उतरले काही जणांनी थेट मंत्र्याना जाब विचारला.मग पुणेकर जावडेकर समोर आले आणि त्यांनी घोषणा केली ‘नाही होणार बंद’ म्हणून.हे पाहून सर्वानीच सुटकेचा निःश्‍वास सोडला.कारण पुणे आकाशवाणी हे केवळ एक आकाशवाणी केंद्र नाही.

ते पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाचं प्रतिक आहे.अनेक कलावंतांना त्यांच्या आरंभीच्या काळात पुणे आकाशवाणीनंच व्यासपीठ उपलब्ध करून दिलं होतं.नंतर ते नावरुपाला आलेले आहेत याकडं कसं काय दुर्लक्ष केलं जाऊ शकतं ?.बातम्यांच्या बाबतीत म्हणाल तर सर्वाधिक ऐकल्या जाणार्‍या पुणे आकाशवाणीच्या सकाळच्या बातम्या आहेत.रेडिओच्या बातम्या ऐकतो कोण ? असा प्रश्‍न दिल्लीकर शहाण्यांना पडला असेल तर त्यांनी सकाळी 7.०५  नंतरची पुणे आकाशवाणीची ट्यून ऑन करून पहावी म्हणजे त्याला अंदाज येईल की बातम्यांची लोकप्रियता किती आहे ते .केवळ स्थानिकच नव्हे तर जगभरातील बातम्या सकाळी सकाळी आपल्या मातृभाषेत ऐकण्याची संधी पुणे आकाशवाणी देते.बातम्याचं सादरीकरण आणि अन्य बाबी देखील नेहमीच सरस असतात हा देखील अनुभव आहे.हेसारे  माहिती आणि नभोवाणी मंत्रालयातील अधिकार्‍यांना माहिती नसेल की काय ? सारं काही माहिती असलं तरी डिवचण्याचा हा प्रयत्न होता हे नक्की.तो सर्वांनी मिळून हाणून पाडला हे चांगलं झालं.पीआयबीबाबत फार तीव्र प्रतिक्रिया उमटली नाही.चार बातम्या आल्या आणि तो विषय संपला.त्यामुळं कदाचित पुणेकर व्देषींची भिड चेपली असेल आणि त्यानी हा निर्णय घेतला असेल.पण पीआयबी आणि आकाशवाणी यात मोठा फरक आहे. पीआयबीशी तसा सामांन्यांचा संबंध कमी येतो.पण आकाशवाणीचं तसं नाही.कोट्यवधी मराठी माणस आजच्या जमान्यातही आकाशवाणीशी जोडले गेलेले आहेत हे कोणी विसरू नये.मध्यंतरी दिल्लीतला मराठी बातम्यांचा विभाग बंद करून त्या बातम्या पुण्याहून प्रक्षेपित करणार असल्याची बातमी आली होती.त्याचं काय झालं माहिती नाही पण तेही योग्य नाही.दिल्लीतही मराठीची पताका फडकत राहिली पाहिजे आणि पुणे आकाशवाणीचं वैभवही जपलं पाहिजे असं आम्हाला वाटतं,पुणेकरांना वाटतं.त्यासाठीच पुणेकर एकवटले.ते जिंकलेही.आता सरकार असा उफरटा निर्णय घेणार नाही अशी अपेक्षा करू यात ( एस.एम)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here