जळगाव जिल्हा पत्रकार संघ आणि जळगाव तरुण भारततर्फे दि. २३/२४/२५ एप्रिल २०१५ अशी ३ दिवस पत्रकार, लेखक, जाहिरातदार आदींसाठी मोफत कार्यशाळा झाली. यात मुख्य मार्गदर्शक म्हणून तरुण भारतचे मुख्य संपादक दिलीप तिवारी यांनी भाषा, शुध्द लेखन, वृत्तलेखन व पद्धती आणि लेखन कार्याशी संबंधित साधने यावर मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी ४५, दुसऱ्या दिवशी ३९ आणि समारोपाच्या दिवशी ४६ जणांनी सहभाग घेतला. तिवारी यांनी पहिल्या दिवशी गरजेपुरते शुद्ध लेखन, व्याकरण लक्षात ठेवण्याच्या सोप्या पध्दती, दुसऱ्या दिवशी वृत्तलेखनातील महत्त्वपूर्ण बाबी आणि तिसऱ्या दिवशी लेखन साधने, कैमेरा, मोबाइल, संगणक, पूरक साधने पेनड्राईव्ह, नेट कनेक्टर, यूएसबी क्वाड आदी विषयी माहिती दिली.
या वर्गात दुसऱ्या दिवशी दैनिक भास्कर जळगावचे संपादकिय प्रमुख विशाल चढ्ढा यांनी बातमी मूल्य, महत्त्व आणि पाठपुरावा या विषयी माहिती दिली.
समारोपाच्या दिवशी चार चाँद लागले. दैनिक सकाळचे संपादक भालचंद्र पिंपळवाडकर, आशा फौंडेशनचे प्रमुख गिरीश कुळकर्णी, दैनिक लोकशाहीचे संपादक राजेश यावलकर, पत्रकार संघाचे विश्वस्त विजयबापू पाटील, श्रीकृष्ण जळूकर, अशोक भाटीया, दिलीप शिरोळे उपस्थित होते. पिंपळवाडकर आणि कुळकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.
इतरांचाही पुढाकार सुरू
कुळकर्णी यांनी दि. ५/६/७ मे २०१५ ला मोफत व्यक्तिमत्व विकास शाळा घेण्याचे जाहीर केले. पिंपळवाडकर यांनी त्याच्या पुढे वर्ग घेण्याचे घोषित केले. चढ्ढा यांनी सूचना केली की, दर रविवारी चर्चात्मक वर्ग घ्यावा. त्यास विजयबापू आणि भाटीया यांनी मंजुरी दिली. शेवटी सर्वांनी फिडबैक दिला. कार्यशाळेत सहभागी सर्वांना पत्रकार संघ आणि शिरोळे यांच्याकडून स्मृतीचिन्ह देण्यात आले.
या कार्यशाळा आयोजनात योगेश शुक्ल, धन्यकुमार जैन, अशोक भाटीया आणि रितेश भाटीया यांनी रोज लक्ष घातले. सहभागी झालेल्या सर्वांनी फिडबैक मोबाइलवरून दिला. हे वेगळे वैशिष्ट्य राहिले. सहभागी झालेल्यांपैकी डा. गोपी सोरडे यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी गृप फोटो घेवून समारोप झाला.