पत्रकारांवरील हल्ले पुन्हा वाढले

0
498

पोलीस, राजकारणी, वाळू माफिया कडून
पत्रकारांवरील हल्ले पुन्हा वाढले


मुंबई :मुंबईत अभिषेक मुठाळ नावाच्या पत्रकारास पोलीस निरिक्षक संजय निकम यांनी केलेली धक्काबुक्की, श्रीगोंदा तालुक्यात प्रमोद आहेर नावाच्या पत्रकारास वाळु माफियांनी केलेली मारहाण आणि लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे आमदाराच्या विरोधात बातमी दिली म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विकास स्वामी यांच्या कार्यालयासमोर घातलेला धुडगूस… महाराष्ट्रात दोन दिवसात पत्रकारांवरील अत्याचाराच्या घडलेल्या या तीन घटना,राज्यात पत्रकारिता करणे किती कठीण झाले आहे हे दाखविणारया आहेत.. या तिन्ही घटनांचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी निषेध केला आहे..
मुंबईतील लालबागचा राजा येथे बंदोबस्तासाठी असलेले पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी धक्काबुक्की करत पत्रकार पत्रकार अभिषेक मुठाळ यांना मांडवातून बाहेर काढले.. तोंडाला मास्क न लावता कोरोना नियमांचे उल्लंघन करणारे संजय निकम हे महाशय तुला हात नाही तर पाय ही लावतो अशा धमक्या देत असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओ वरून दिसत आहे.. या घटनेची राज्य सरकारने दखल घेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने केली आहे..
दुसरी घटना श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील आहे.. वाळू तस्करीच्या बातम्या छापतो, पोलिसांना लोकेशन देतो म्हणून वाळू माफियाने पत्रकार प्रमोद आहेर यांना लाठ्या काठयांनी, बिअरच्या बाटलयांनी मारहाण केली आहे.. माफियांनी रिव्हॉल्वर देखील आहेर यांच्या कानशिलावर लावत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.. या प़करणी बेलवंडी पोलिसात पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
तिसरी घटना लातूर तालुक्यातील चाकूरची.. देशोन्नतीचे पत्रकार विकास स्वामी यांनी आमदारांच्या संदर्भात बातमी दिल्याने काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते स्वामी यांच्या कार्यालयाजवळ जमले, त्यांनी स्वामी यांना अर्वाच्च शिविगाळ केली आणि देशोन्नतीच्या अंकाची होळी करीत शहरात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण केली.. पोलिसात तक़ार दिलीय पण आमदारांच्या माणसांवर पोलीस गुन्हे दाखल करायला तयार नाहीत.. उलट तक़ार मागे घ्या म्हणूनच पोलीस दबाव आणत आहेत.. लातूरचे पोलीस अधीक्षक काय करतात हे समजत नाही..
पत्रकारांवर हल्ले करणारयांच्या विरोधात पोलीस गुन्हेच दाखल करीत नसल्याने पत्रकारांवर हल्ले वाढले आहेत.. वाळू माफिया, राजकारणी आणि पोलीस या घटकांकडून पत्रकारांचा सर्वाधिक छळ होत असल्याचे सातत्याने समोर येत आहे…
वरील तीनही घटनांचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, आदिंनी निषेध केला आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here